डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…5 – वासवदत्ता ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

संस्कृत नाटककार ‛भास’ याने एकूण तेरा नाटके लिहिली. त्याला संस्कृत साहित्यात ‛भासनाटकचक्राणि’ असे म्हणतात. त्यातील ‛प्रतिज्ञायौगंधरायणम्’ आणि ‛स्वप्नवासवदत्तम्’ ही दोन नाटके राजा उदयन आणि अवंतीराजकुमारी वासवदत्ता यांच्या जीवनावर आधारित आहेत.

वासवदत्ता उज्जैनचा राजा प्रद्योत याची कन्या असते. उदयन एका छोट्या राज्याचा राजा असतो. त्याच्याकडे ‛घोषवती’ नावाची एक अद्भुत वीणा असते आणि तो उत्तम वीणावादन करत असतो. त्याची ती ख्याती ऐकून वासवदत्ताला त्याच्याकडून वीणा शिकण्याची इच्छा उत्पन्न होते. ती वडिलांजवळ तसा हट्ट करते. राजा उदयन हे सहज मान्य करणार नाही हे प्रद्योतला माहीत असल्याने तो कपटाने उदयनाला कैद करतो आणि आपल्या वाड्यात आणून ठेवतो आणि त्याला आपल्या कन्येला वीणा शिकवण्यास सांगतो.

उदयन आणि वासवदत्ता त्या निमित्ताने एकमेकांना भेटत राहतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांचे लग्न होते. त्याचवेळी उदयनाचा मंत्री यौगंधरायण आपल्या राजाला सोडवून आणण्यासाठी एक उपाययोजना करतो आणि उदयन- वासवदत्ताना सोडवून आणतो. पुन्हा आपल्या राज्यात परत आला तरी उदयन आपल्या पत्नीच्या प्रेमापुढे राज्याकडे दुर्लक्ष करू लागतो. त्यामुळे अरुणी नावाचा राजा त्याचे राज्य हस्तगत करतो. ते परत मिळवण्यासाठी एखाद्या मोठ्या राजाच्या मदतीची गरज असते. मगध राजाची बहीण पद्मावतीशी उदयनाने विवाह केला तर हे शक्य होणार असते. म्हणून यौगंधरायण वासवदत्ताशी सल्लामसलत करून एक योजना आखतो. त्यामध्ये उदयनाला वासवदत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मेली असे भासवण्यात येते व तिला पद्मावतीची दासी म्हणून ठेवण्यात येते. अशाप्रकारे अनेक नाट्यमय वळणे घेत या नाटकांचा सुखांत होतो.

ही एक दंतकथा असली तरी एक प्रकारे त्या काळातील समाजाचे प्रतिबिंब या नाटकांमधून निदर्शनास येते असे मला वाटते.

पहिल्या भागात वडिलांकडे वीणावादन शिकण्यासाठी हट्ट करणारी अल्लड वासवदत्ता चित्रित केली गेली आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उदयन भेटल्यावर त्याच्या प्रेमात पडलेली प्रेमिका दिसते. आपल्याला अशी तिची दोन्ही रूपे भावून जातात. याशिवाय संगीत- चित्रकला अशा कलांमध्ये स्त्रियांना प्राविण्य मिळवण्याची मुभा होती हेही लक्षात येते.

त्यानंतर पतीच्या घरी गेल्यावर जेव्हा उदयन पत्नीच्या प्रेमात रममाण होऊन राज्य गमावून बसतो आणि त्याचे मंत्री जेव्हा वासवदत्तेला याची जाणीव करून देतात तेव्हा तिच्यातील कर्तव्यदक्ष पत्नी जागी होते. तीसुद्धा एका राजाची मुलगी असते आणि राज्य टिकवून ठेवण्यासाठी काय काय करावे लागते याची तिला पूर्ण कल्पना असते. म्हणूनच आपल्या पतीच्या व प्रजेच्या हितासाठी ती यौगंधरायणाच्या योजनेला पूर्ण मान्यता देते आणि राजाचा विवाह पद्मावतीशी करून देण्यासाठी राजी होते. त्या काळी राजांनी अशा पद्धतीने विवाह करण्याची सर्रास प्रथा होती. शिवाजीमहाराजांनीही राज्यविस्ताराच्या दृष्टकोनातूनच आठ विवाह केले होते असे इतिहास सांगतो. म्हणूनच इथेही वासवदत्तामधील चाणाक्ष राजकारणी दिसून येते.

वासवदत्ता इतकेच करत नाही. तर राजाचे आपल्यावर किती प्रेम आहे हे माहीत असल्याने तिच्या मृत्यूची खोटी कहाणी रचल्याशिवाय राजा दुसऱ्या लग्नाला तयार होणार नाही हे लक्षात येते तेव्हा ती सहजपणे ही योजना स्वीकारते. वास्तविक आपल्याच मृत्यूची बतावणी करणे कितीही अवघड असले तरी ते स्वीकारणारी वासवदत्ता एक कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष स्त्रीच्या रुपात समोर येते.

जेव्हा ती पद्मावतीची दासी म्हणून राहू लागते त्यावेळी सर्व सुखासीन आयुष्य सोडून देते. वास्तविक असे जीवन जगणे एखाद्या राजघराण्यातील स्त्रीला किती अवघड जात असेल याची कल्पनाच केलेली बरी! त्यामुळे आपल्या ध्येयासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारी वासवदत्ता ही त्यागमूर्ती होती असे म्हणावे लागेल.

पद्मावतीशी उदयनाचा विवाह होतो आणि तिला वारंवार आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीबरोबर पाहावे लागत असले तरी आपल्या पतीच्या व राज्याच्या हितासाठी ते सर्व सहन करत असते. यातून तिच्यातील सहनशील नारी प्रत्ययास येते.

असे सर्व असले तरी शेवटी ती एक स्त्री असल्यामुळे साहजिकच कुठे तरी तिला आपल्या पतीकडून प्रेमाची अपेक्षा असतेच. त्यामुळे एका प्रसंगात विदूषक राजाला विचारतो की त्याचे “सर्वात जास्त कोणावर प्रेम आहे?” तेव्हा तो वासवदत्तेचेच नाव घेतो. हा संवाद नकळत वासवदत्तेच्या कानावर पडतो आणि ती अतिशय आनंदित होते. कारण शेवटी तिचेसुद्धा आपल्या पतीवर तितकेच उत्कट प्रेम असते. शिवाय एकदा नकळत झोपेत राजाला स्वप्न पडते आणि तो वासवदत्तेलाच हाक मारत असतो. त्यावेळी पण वासवदत्ता तिथेच असते.

या दोन्ही प्रसंगातून वासवदत्तामधील पत्नी अतिशय सुखावते. कारण जरी आपल्या राज्यासाठी तिने एकप्रकारे हे व्रत स्वीकारलेले असले तरी तीसुद्धा एक माणूसच असते. 

अशाप्रकारे प्रेमिका, पत्नी, उत्तम कलाकार, कर्तव्यदक्ष राणी अशा वेगवेगळ्या रुपात भेटणारी ही वासवदत्ता काल्पनिक असली तरी त्या काळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रीचे एक आगळेच रूप होती.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments