सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ हात… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

मला सांगा हात म्हणजे काय? हात तिच्या ••• एवढच?

हात एक अवयव आहे. शरीराचा महत्वाचा भाग आहे.हाताशिवाय काम करू शकत नाही. तरी कामात हात असणे म्हणजे ‘कामात’ हात ••• का कामात ‘हात’ •••हा प्रश्न पडल्याने हातातले काम तसेच राहू शकते.

असो पण आज मी तुम्हाला हाताची गोष्ट सांगणार आहे.

एका गावात एक कष्टाळू माणूस रहात होता. त्याचा हात चांगलाच चालायचा. त्यामुळे त्याच्या कामाच्या गतीसाठी कोणीच त्याचा हात धरू शकत नव्हते. यामुळेच तो आपली कामे तर आटोपायचाच पण सगळ्या गावकर्‍यांना हात द्यायचा.  त्याच्या याच स्वभावा मुळे तो ग्रामप्रमुखाचा उजवा हात बनला. त्याने असा हातात हात दिल्यामुळे ग्रामप्रमुखालाही कोणापुढे हात पसरायची किंवा हात जोडायची वेळच यायची नाही.

परंतु या कष्टाळू माणसाच्या मुलीचा हात एका धनाढ्य माणसाच्या मुलाने मागितला. तेव्हा ग्राम प्रमुखाच्या हातावर तुरी देऊन त्याला हातोहात फसवून स्वत: मुलीचे दोनाचे चार हात करण्यासाठी हातावर पाणी सोडून तिचे कन्यादानही केले.

त्यामुळे त्या ग्राम प्रमुखाचा हात अचानक सोडल्यामुळे हातच मोडला गेला. पण याला धडा शिकवण्यासाठी त्याने तयारी केली. तो म्हटला मी काही हातात बांगड्या भरल्या नाहीत.  मी असा हातावर हात धरूनही बसणार नाही. मी तुझ्याशी चार हात करायला तयार आहे.

या गरीब कष्टाळू माणसाला हात उचलणे शक्य नव्हते. त्याने पुन्हा त्याच्याशी हस्तांदोलन करणेही अशक्य होते. त्याच्या हातात काहीच राहिले नव्हते. यांच्यात फूट पाडण्याच्या कामात धनाढ्य माणसाचा हात असल्याचे उशीरा कळले.

जणू काही आयुष्याचे पत्ते खेळताना त्या धनाढ्याने याचा हात ओढला होता.

काय नशीबात आहे हे जाणण्यासाठी ज्योतिष्याला हात दाखवला. त्याचा हात बघून ज्योतिष्याने मात्र हात साफ केला.त्याच्या भावनांवर हात मारला.

हात उंचावून म्हणाला सारं काही त्याच्या हातात आहे. असे म्हणून हात हलवून तो गेला सुद्धा.

निराश अंत:करणाने तो हात हलवत रिकाम्या हाताने परत आला.

पण म्हणतात ना••• हातच्या कंकणाला आरसा कशाला? तसे ग्राम प्रमुखाला चांगल्या कामाच्या प्रचितीने कष्टाळू माणसाचा हातगुण चांगला असल्याचे लक्षात आले आणि रातोरात या हाताचे त्या हातालाही कळू न देता त्याच्याशी हात मिळवणी केली. गावाच्या भल्यासाठी असे करणे त्याच्या हातचा मळच होता.  त्यानंतर मात्र यांचे हात कधी सुटले नाहीत.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments