सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ हवा संवाद… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
काहीं मराठी मालिका मध्यंतरी बघण्यात आल्या. त्यात काही लहान मुले काम करीत होती म्हणजेच आपली भुमिका पार पाडीत होते. खरंतर लहान मूल म्हणजे देवाघरचे फुल. परंतु ह्या विरुद्ध ती आक्रस्ताळी, जे हवयं ते हातपाय आपटून मिळवणारी मुल बघीतली आणि मन विषण्ण झाले. त्यांचं ते ओरडून चिडून बोलणे ऐकले आणि आभासी असूनही हात शिवशिवत होते. मनात आले कुठून बरं शिकत असतील हे सगळं ?
पण एक विसरून पण चालणार नाही मुल ही कधीकधी अनुकरणातून शिकतात. मुलांना घडविण्यात काही हिस्सा हा पालकांचा, शिक्षकांचा पण असतो आणि ही तरं सगळी मोठी, सुज्ञ मंडळी असतात.
इतक्या लहान वयात प्रचंड इगोस्टिक मुल बघून मन काळजीत पडतं. कधी कधी मनात येतं ही आजकाल जी सुबत्ता, चंगळ सुरु आहे त्यामुळे मन ही कधी मारायला पण आलं पाहिजे हे पालक पण जणू विसरूनच गेले आहेत. जरा स्पष्ट बोलायचं तरं हा इगो मुल बघतात, शिकतात कुठून ?
ही मुलं शिकतात आपल्याकडून, समाजाकडून, सोशल मिडियामुळे, टीव्हीमधून.
आपल्या वेळेचा आणि आपल्या आधीच्या पिढीचा काळ बऱ्यापैकी सारखा होता. परंतु आताच्या पिढीसाठी सगळ्याच बाबतीत काळ खूप जास्त वेगाने बदललाय. मग हा काळ स्पर्धा, शिक्षण, प्रगती, अर्थार्जन, चंगळवाद, मोकळीक ह्या सगळया बाबतींत लागू पडतो. साधारण आपल्या पिढीपर्यंत आपण एकदा का एखाद्या नोकरीच्या तत्सम क्षेत्रात शिरलो की तेथून बाहेर पडण्याचा मार्ग थेट ५८ वा ६० व्या वर्षीच आपल्याला सापडायचा. नोकऱ्या बदलणे हा विचार फारसा कुणाच्या डोक्यात, मनात शिरतच नव्हता. पण आता काळ खरचं खूप बदलला, आपल्याला नविन पिढीतील भरपूर पगार चटकन डोळ्यात भरतात पण त्यामध्ये असणारी अस्थिरता आपल्याला फारशी जाणवत नाही. आजची पिढी आज जगायला शिकली आहे. त्यांना फारसा उद्याचा विचार करायचा नसतो. कारणं तो करुन फायदा नसतो असं ह्या पिढीच स्पष्ट मत.
आजच्या लेखात नविन पिढीचा स्ट्रगल, वाढती महागाई, निरनिराळी प्रलोभने, मोठया शहरातील बेसुमार खर्च आणि त्यामधील अस्थिरता समजावून सांगितली आहे. आपल्या पिढीला एवढे मोठे पगाराचे आकडे ऐकायची सवयच नव्हती त्यामुळे ते ऐकून आपले डोळेच फिरतात आणि त्या नादात आपण त्यातली अस्थिरता विसरून जातो. ह्या लेखामध्ये जी तरुण पिढीची घुसमट होते आहे ती सांगितली आहे. आपल्या पालकांना ताण येऊ नये, काळजी वाटू नये म्हणून हा तरुण वर्ग आई वडिलांच्या प्रेमापोटी त्यांच्या समस्या पालकांसमोर उघड करीत नाही.
पण ह्या लपाछपीच्या खेळात पालक आणि पाल्य ह्यांच्या दरम्यान गैरसंमजाची एक दरी तयार होते. त्यामूळे आपल्याला येणाऱ्या समस्या मुलांनी आईवडिलांना खुल्या दिल्याने सांगितल्या तर नक्कीच ह्यातून पालकांच्या अनुभवांच्या गाठोड्यातून हमखास नामी उपाय हा सापडून जाऊ शकतो. पाल्यांमध्ये पण आपण एकट नसून आपले पालक आपल्याबरोबर कुठल्याही परिस्थितित ठामपणे पाठीशी उभे असल्याचे बघून एक वेगळाच आत्मविश्वास तयार होईल जो निश्चितच त्यांना उत्कर्षाच्या वाटेवर आणून सोडेल. मात्र ह्यासाठी दोन्हीही पिढीमध्ये मोकळे बोलण्याची, संवाद कायम साधत राहण्याची, परस्परांना समजून घेण्याची सवय ही असायलाच हवी. म्हणजेच काय तर आधी पालकत्व शिकावं लागेल तरच पुढील दिवस शांततेत घालवू शकू.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈