श्री संभाजी बबन गायके
विविधा
☆ हिंदुस्थानवालो, अब तो मुझे पहचानो ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
हिंदुस्तानवालों! अब तो मुझे पहचानो!
८१ वर्षांनंतरही हे शब्द अगदी समर्पक आहेत, असे म्हणावे लागेल. १९४३ ते २०२४ हा सुमारे ८१ वर्षांचा कालखंड. या सर्व वर्षांतला एकही दिवस असा नसेल की एक आवाज कुठे ऐकला गेला नसावा. मास्टर विनायक (अर्थात विनायक दामोदर कर्नाटकी. मागील काळातील प्रसिद्ध अभिनेत्री नंदा यांचे वडील) यांनी एक चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला होता ‘गजाभाऊ’. चित्रपट जरी मराठी भाषेत काढला जात असला तरी यातलं एक गाणं हिंदीत होतं…कवी होते पंडित नरेंद्र इंद्रा. आणि गाणं होतं या लेखाचं शीर्षक. दुर्दैवाने हा चित्रपट आणि गाणं कुठंही उपलब्ध नाही. या चित्रपटात लता दीनानाथ मंगेशकर ही चौदा पंधरा वर्षांची मुलगी निव्वळ आई,भावंडांचा उदरनिर्वाह होण्यास दोन पैसे मिळावेत म्हणून अभिनय करीत होती. त्याकाळी पार्श्वगायन फारसे प्रचलित झालेले नव्हते. कलाकार आपापली गाणी स्वत:च गात (खरे तर म्हणत!) असत. यासाठी अभिनयासोबत गाणंही येणं आवश्यक असे. आणि हा योग काही फारसा जुळून येत नसे. लतादीदींना आवडत नसतानाही अभिनय शिकावा लागला होता आणि गाणं आवडत असूनही तोपर्यंत तशी संधी मिळत नव्हती. त्यामुळेच लतादीदींनी हे गाणं अगदी पोटातून, अतिशय समरसून गायले असावे, यात शंका नाही.
लता दीनानाथ मंगेशकर नावाच्या एक अलौकिक व्यक्तिमत्वाचा १९४३ पासून सुरू झालेला जीवनप्रवास सुमारे आठ दशके सुरू राहिला. दीदींचा हा प्रवास म्हणजे एक इतिहासच म्हणाव. दुर्दैवाचे सर्व अवतार जवळून पाहिलेल्या या शूर स्त्रीने आपल्या उपजत गानकलेने गायन क्षेत्रातील सम्राज्ञीपदाला गवसणी घातली हाही इतिहासच.
गायन,अभिनयासोबतच ज्योतिषाचा उत्तम अभ्यास असलेल्या मास्टर दीनानाथांनी आपल्या या लेकीच्या गळ्यात जसा गायनाचा उज्ज्वल भविष्यकाळ पाहिला होता तसा तिच्या ललाटावरील कर्माचा लेखही वाचला होता. त्यांनी दीदींना त्यावेळी असे सांगितल्याचं वाचनात येतं की, “लता, तु फार मोठी गायिका होशील. तुझे हे यश पहायला मी या जगात नसेन. आणि तुझे लग्न होणार नाही!” पहिल्या दोन भविष्यवाणींप्रमाणेच तिसरीही भविष्यवाणी अप्रिय असली तरी खरी ठरली याला दैव असं नाव आहे! कदाचित दैवाला दीदींना त्यांच्या त्यावेळी खूप संकटात असलेल्या कुटुंबासाठी आणि कोट्यवधी कानांना तृप्त करण्याची अपार शक्ती असलेल्या गायनकलेसाठी अधिक वेळ द्यायचा असावा! तसंच तर झालं किंबहुना तसंच केलं दीदींनी…हा इतिहास आहे!
आयुष्यात खूप नंतरच्या काळात त्यांनी असं म्हटलं होतं…पुन्हा जन्म नाहीच मिळाला तर बरेच आहे…पण पुनर्जन्म मिळालाच तर तो लता मंगेशकर म्हणून नको! लता मंगेशकर बनना आसान नहीं!
अगदी कोवळ्या वयातच आपल्या आईची आणि चार भावंडाची आई होण्याची जबाबदारी स्वत:हून पत्करणं आणि ती अखेरपर्यंत निभावून नेणं हे जावे त्याच्या वंशा तेंव्हाच कळू शकेल! सामाजिक व्यवहारातला त्यांचा करारी बाणा त्यांनी भोगलेल्या परिस्थितीतून आला असावा असं समजण्यास पूर्ण वाव आहे. ‘बहोत लोगों ने मेरे पैसे खाये!” असं एका मुलाखतीत दीदींना हसत सांगितलं आहे. आणि या बुडव्यांची नावे न उघड करण्याचा दिलदारपणाही त्यांनी दाखवला!
गाण्याचं ध्वनिमुद्रण करायला कक्षात जाताना आपली पादत्राणे त्या बाहेरच काढीत असत हे सर्वांनी पाहिलं आहे. कला ही देवता आणि कलाकार भक्त हा विचार त्यामागे होताच शिवाय ज्यामुळे पोटाला दोन घास मिळतात त्या कलेप्रती आदर व्यक्त करण्याची त्यांची ती पद्धत होती. सार्वजनिक जीवनात एका प्रसिद्ध स्त्रीने,त्यातून अविवाहीत स्त्रीने कसे वागावे याचा वस्तुपाठ म्हणजे दीदी. व्यवसायानिमित्त पुरूषांच्या गराड्यात राहणे अपरिहार्य असताना त्यातील प्रत्येकला दीदी म्हणावंसं वाटावं यासाठी सर्वोत्तम चारित्र्य आणि प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते.
सामान्य माणूस म्हणूनच जन्माला आलेल्या व्यक्तीला त्याने असामान्यत्वाची पायरी गाठेपर्यंत अडचणी,समस्या,नैमित्तिक प्रलोभनं,मानवी स्वभावातील गुणदोष यांच्याशी संघर्ष करावा लागतोच. किंबहुना असामान्य होण्यापूर्वी माणूस सामान्यच असतो. या सर्वच अनुभवांतून तावून सुलाखून निघालेल्या दीदींनी स्वत:च्या वैय्यक्तिक आयुष्यात कुणालाही डोकावू दिले नाही. आणि यामुळे लोक काय आणि किती काय काय म्हणतील याची पर्वा केली नाही. जसा अंगभर पदर तसेच संपूर्ण आयुष्य नीटसपणे झाकून घेतलेले. एकतर गद्यात बोलणं अगदी नेमके आणि गाण्यासारखेच मधुर. शब्द अतिशय निगुतीने निवडलेले आणि उत्तरादाखल केलेल्या स्मितहास्यात माझे अबोलणेही विपरीत होत आहे अशी अवस्था अजिबातच नसे.
जगाच्या शब्दशस्त्राने क्लेश झाले नसतील असं नाही. पण जग होता वन्ही…संते आपण व्हावे पाणी हे त्यांनी माऊलींकडूनच शिकलेले असावे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात कुठेही आक्रस्ताळेपणा जाणवला नसावा. सत्य असत्यासी मन केले ग्वाही…नाही मानियेले बहुमता हे तुकोबारायांचे शब्दही त्या जगत राहिल्या. जगाला सातत्याने ऐंशी वर्षे तोंड देत राहणे हे सामान्य जीवाचे कामच नव्हे, हेच खरे! दीदींच्या मौनात सर्व मिटून गेले आणि आता तर त्याही अंतर्धान पावल्या आहेत.
हिंदी-इंग्लिश वृत्तपत्रे,हल्लीच्या दूरचित्रवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वच ब-यावाईट बाबींकडे दीदींनी अतिशय प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष केले. मराठी वृत्तपत्रे आणि दृकश्राव्य वाहिन्यांनी मात्र दीदींच्या बद्द्ल कधी वावगे लिहिले,बोलल्याचे आढळत नाही….याला दीदींचे असाधारण व्यक्तिमत्व कारणीभूत आहे! भगवदगीता ध्वनिमुद्रित करण्याआधी पहाटे लवकर शुचिर्भूत होऊन दोन तीन तास श्लोक बिनचूक म्हणण्याचा सराव करणा-या आणि मगच ध्वनिमुद्रणासाठी जाणा-या दीदी, अत्यंत पीडादायक शारीरिक व्याधी असतानाही संत मीराबाईंची भजने ध्वनिमुद्रित करण्यासाठी तासनतास उभे राहणा-या दीदी,परदेशात शेकडो कार्यक्रम करून भारताचे नाव जगभर पोहोचवणा-या दीदी, ऐ मेरे वतन के लोगों गाण्यातील भावना चिरंजीव करून ठेवणा-या दीदी, १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून आलेल्या खेळाडूंना मानधन देण्यासाठी गाण्यांचा कार्यक्रम करणा-या दीदी…अशा शेकडो गोष्टी आहेत आणि सामान्यांना अज्ञात अशा अनेक गोष्टीही असतीलच.
स्वत: कुठला मानसन्मान मिळवण्याचा प्रयत्न न करणा-या लतादीदींनी आपल्या वडिलांच्या मास्टर दीनानाथांच्या स्मृती जतन करण्याचा मनोभावे आणि यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या हयातीतच त्यांच्याच नावाचा पुरस्कार दिला जाणं हे ही मोठेपणाचंच द्योतक. असो. लिहावं तेवढं कमीच आहे आणि आजवर अक्षरश: शेकडो लोकांनी दीदींबद्दल लिहिले आहे.
गेल्या काहीवर्षांत प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट काढले गेले. आणि त्यात वावगे काहीच नाही. यामुळे या मोठ्या लोकांच्या आयुष्यात लोकांना डोकावता येते. परंतू, जेंव्हा जेंव्हा लतादीदींच्या आयुष्यावरील चित्रपटाचा विषय निघाला तेंव्हा तेंव्हा दीदींनी स्पष्ट नकार दिला. तरीही काही लोकांनी त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य असणा-या कथा लिहून त्यावर चित्रपट काढला. साज (साझ) नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात शबाना आझमी प्रमुख भूमिकेत होत्या. मेरी आवाजही पहचान है नावाची एक दूरदर्शन मालिकाही येऊन गेली. लतादीदींच्या आयुष्यावर (अनाधिकाराने) भाष्य करणारे युट्यूब विडीओज विशेषत: हिंदीत अनेक दिसतात. पण मंगेशकर कुटुंबियांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत या गोष्टींना अजिबात महत्त्व दिले नाही.
दीदींच्या हयातीत त्यांना त्यांच्या बायोपिक (चरित्रचित्रपट) विषयी अनेकांनी विचारणा केलेली होती. पण त्यांनी स्पष्ट शब्दांत नकारच दिला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तर याबाबत खूपच जोरात प्रयत्न झाले असतील. कारण लता मंगेशकर हा विषयच अत्यंत वेगळा आहे. पण एरव्ही काहीही माहित नसताना दीदींबद्दल विविध गोष्टी सांगत आणि पसरवत बसलेल्या व्यावसायिक लोकांकडून लता या विषयाला कितपत न्याय मिळाला असता हा ही प्रश्नच आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीने नुकत्याच घेतलेल्या एका मुलाखतीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही अशा चित्रपटास परवानगी देण्याचे स्वच्छ शब्दांत नाकारले आहे. दीदींच्या प्रतिमेला न्याय देऊ शकेल असं कुणी असावं असं त्यांना वाटत नाही. समाजानेही त्यांच्या या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. पण लतादीदींचे आयुष्यही लोकांना समजणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्यापेक्षा पात्र अन्य कुणी व्यक्ती नाही. आठ दशके हृदयनाथ आणि दीदी सातत्याने एकत्र राहिलेत. हृदयनाथ स्वत: दीदींबद्द्ल लिहित आहेत. इतर कोणत्याही लेखकापेक्षा त्यांचे लेखन जास्त विश्वसनीय आहे यात दुमत नसावं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजवर त्यांनी प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही साडे तीनशे पाने मजकूर लिहिला असून आणखी तितकीच पाने भरतील एवढ्या आठवणी,गोष्टी त्यांच्या स्मरणात आहेत. आणि हृदयनाथांची लेखनशैली सुद्धा अतिशय उच्चदर्जाची आहे. यापैकी आरंभीचे तीन लेख दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध झाले आहेत. कदाचित आणखीही होतील. बाळासाहेबांनी अर्थात हृदयनाथ मंगेशकर यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे,या लेखांचे पुस्तक निघावे अशीच रसिकांची इच्छा आहे. कारण तेच हे काम योग्य पद्धतीने पूर्ण करू शकतील! कारण हिंदुस्थानवालों, अब तो मुझे पहचानो असे सुरूवातीलाच म्हणून गेलेल्या लता मंगेशकर नावाच्या भारतरत्न स्वरचमत्काराला अजून हिंदुस्तानाने नेमके ‘पहचानलेले’ आहे, असे म्हणता येत नाही. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या या मनोवांच्छित कार्यास शुभेच्छा!
(मनातले सर्वच लिहिता येते असे नाही. अनेक बाबी निसटून जातात लिहिता लिहिता. पण तरीही एक प्रयत्न. संभाजी बबन गायके.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈