श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

ही दरी कमी करूया !! ☆ श्री सुनील देशपांडे 

माणसाचं मन किती विचित्र असतं !  मृत्यू अटळ आहे हे समजायला लागल्यापासूनच माणसाला अमरत्वाची सुद्धा  स्वप्नं पडू लागली. अमरत्त्व ही अशक्य गोष्ट आहे हे माहीत असूनही मानव अमरत्वाच्या संकल्पनेकडे सरकण्याचा प्रयत्न करतोच आहे. अगदी हजारो वर्षापासून !  या प्रयत्नाचा एक महत्वाचा टप्पा मानवानं या शतकात मात्र गाठला आहे असे म्हणायला हरकत नाही. तो म्हणजे अवयव प्रत्यारोपण.

१९०५ साली तो म्हणाला ‘ मी मेलो तरी माझे नेत्र दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहतील‘

१९५४ साली तो म्हणाला ‘ मी मेलो तरी माझी मूत्रपिंडे  दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहतील ‘

असं करता करता तो आज  म्हणू शकतोय कि ‘ मी मरेन पण माझे हृदय, फुफ्फुसे, हाडं, कुर्च्या, मगज, यकृत, स्वादुपिंड, आतडी, प्लिहा हे सर्व अवयव कुणाच्या ना कुणाच्या शरीरात जिवंत राहू शकतील, मी मरेन पण अवयव रूपी उरेन !’

मानवाचा अमरत्वाच्या वाटेवरून  चाललेला हा प्रवास, वैद्यकशास्त्राच्या संशोधनातूनच या टप्प्यावर पोहोचला आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या जेवढ्या जास्तीत जास्त शस्त्रक्रिया होतील तेवढे हे संशोधन पुढे पुढे जाईल. तसेच वरील अवयवांच्या यादीत अधिकाधिक भर पडत जाईल आणि प्रत्यारोपणाच्या यशस्वितेची टक्केवारी वाढत जाईल हे नक्की.

पण हे सगळं घडण्यासाठी मुख्य गरज आहे ती हा विषय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची आणि हे शिवधनुष्य पेलण्याची.

२०१५ मध्ये जे जे हॉस्पिटल मध्ये  अवयवदान कार्यकर्त्यांची एक सभा वसईच्या देहमुक्ती मिशनचे प्रमुख श्री पुरुषोत्तम पवार यांच्या प्रयत्नाने आयोजित केली गेली होती. त्यावेळी श्री पवार यांनी असा प्रस्ताव मांडला की आपण सर्वच आपापल्या भागात उत्तम काम करत आहोत. परंतु आपण सगळे एक होऊन जर कामाला लागलो तर खूप मोठ्या प्रमाणावर हे कार्य राज्यभर उभे राहू शकेल.

आणि 

सर्वांच्या संमतीने एका मोठ्या महासंघाची स्थापना करण्याचा संकल्प झाला. त्यानुसार श्री पुरुषोत्तम पवार यांच्या बरोबर  दधिची देहदान समिती, मानव ज्योत, जीवन ज्योत, सुमती ग्रुप अशा प्रस्थापित सेवाभावी संस्थांच्या श्री सुधीर बागाईतकर, श्री विनोद हरिया, श्री. कुलीनकांत लुठीया, श्री. विनायक जोशी या कार्यकर्त्यांनी देखील या महासंघासाठी चंग बांधला.

या सर्वांच्या प्रयत्नातून २०१६ मध्ये महाराष्ट्रातील अवयवदान क्षेत्रातील अनेक सदस्यांशी संपर्क करून एक राज्यव्यापी कार्यकर्त्यांचे अधिवेशन मुंबई मुलुंड येथे, महाराष्ट्र सेवा संघ यांच्या सहकार्याने आयोजित केले. या अधिवेशनात डॉ. वत्सला त्रिवेदी, डॉ. प्रवीण शिनगारे, नागपूरचे चंद्रकांत मेहेर  इत्यादी मान्यवर मार्गदर्शनासाठी उपलब्ध झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतात ज्यांच्यावर २००३ मध्ये पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण झाले होते, असे नाशिक येथील डॉ. भाऊसाहेब मोरे यांना पाचारण करण्यात आले होते.

या अधिवेशनाच्या यशस्वीतेमुळे महाराष्ट्रातील विविध भागातील संस्था व कार्यकर्ते महासंघाशी जोडले गेले. सतत दोन वर्षांच्या यशस्वी कार्यकालानंतर दिनांक १७ मे २०१७ रोजी महासंघाची सरकार दरबारी नोंद होऊन नोंदणीकृत संस्था म्हणून कार्यरत झालेला हा महासंघ म्हणजे दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.

त्याच दरम्यान नाशिक येथून पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पालथा घालण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले आणि पहिली नाशिक ते आनंदवन अशी ११०० किलोमीटरची पदयात्रा आयोजित करणारे श्री सुनील देशपांडे यांच्याशी श्री पुरुषोत्तम पवार यांनी संपर्क साधला. श्री देशपांडे यांच्या उपक्रमाला फेडरेशनचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्या पदयात्रेच्या यशस्वीतेनंतर त्यांना फेडरेशनमध्ये सामील करून घेऊन ही पदयात्रां ची संकल्पना पुढे महासंघामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली गेली. चार पदयात्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातले जवळपास सर्व जिल्हे पादाक्रांत केले गेले.

महासंघाचे विविध कार्यकर्ते संलग्न संस्थांचे कार्यकर्ते आणि पदयात्रांच्या माध्यमातून हजारो कार्यक्रमांच्या आयोजनातून लाखो लोकांपर्यंत अवयवदानाचा विषय महासंघाने नेऊन पोहोचवला.

आज १७ मे २०२४ रोजी या संस्थेला सात वर्षे पूर्ण होत आहेत.

(अर्थात संस्थेचे कार्य नोंदणीपूर्वीच चालू झाले होते त्या दृष्टीने नऊ वर्षे म्हणता येतील. परंतु कोरोनाची दोन वर्षे सोडून देऊ. )  परंतु या सात वर्षात संस्थेने खूप मोठा पल्ला गाठला आहे.

वैद्यकीय संशोधनातून माणसाला मृत्यूच्या पाशातून सोडवण्यासाठी संशोधक झटत असले तरी त्याचा उपयोग व उपभोग माणसाला घेता यावा यासाठी समाज प्रबोधन व जनजागृतीची फार मोठ्या प्रमाणावर गरज असते. सामाजिक संस्था, रुग्णालये व प्रसिद्धी माध्यमांनाच यासाठी झटले पाहिजे.

ही गोष्ट वेळीच जाणून घेऊन दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन

ही संस्था या जनप्रबोधनाच्या कामामध्ये  कार्यरत होऊन राज्यभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आठ  वर्षे समाज प्रबोधन करत आहे.

प्रसिद्धी हे समाज प्रबोधनाचे अविभाज्य अंग आहे. यासाठी विविध प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्याचीही फेडरेशन ला गरज आहे. अनेक प्रसिद्धी माध्यमांनी हे सहकार्य दिले सुद्धा आहे.

महाराष्ट्र राज्या मध्ये अवयवदानाला समर्पित  आणि  अवयवदानाच्या समाज जागृती व प्रबोधन कार्याची मुहूर्तमेढ रोवणारी राज्यस्तरीय संस्था म्हणून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई. ही संस्था आज प्रामुख्याने  ओळखली जाते. महाराष्ट्र राज्यभर पसरलेल्या आपल्या विविध जिल्हा शाखांमार्फत ही संस्था कार्यरत आहे. अलीकडच्या काळात केंद्र व राज्य सरकारांनी सुद्धा या विषयात विशेष लक्ष घालण्याचे ठरवले असून तशा सूचना संबंधित कार्यालयांना दिल्या गेल्या आहेत. तरीही राज्यभर फेडरेशन मार्फत  या सर्व सरकारी संस्थांच्या समन्वयातून चालू असलेल्या कार्याला तोड नाही हे कबूल करावेच लागेल.

अनेक वर्षांपूर्वी तामिळनाडू सरकारमध्ये ना. सुश्री (कै) जयललिताजी मुख्यमंत्री असताना या चळवळीला तेथे सरकारी पाठबळ मिळालं आणि या  चळवळीने  तामिळनाडू राज्यात चांगलेच मूळ धरले.

भारत सरकारने सन १९९४ मध्ये अवयवदानाचा कायदा संमत केला. त्या नंतर आजपर्यंत सरकारी पातळीवर काही यंत्रणाही  निर्माण करण्यात आल्या आहेत.

अशा सर्व सरकारी यंत्रणांच्या समन्वयाने आणि त्यांना पूरक म्हणून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ही राज्यस्तरीय  संस्था आता राज्याबाहेर सुद्धा भरारी घेण्याच्या तयारीत आहेच, परंतु सध्या संपूर्ण भारत देशामध्ये विविध संस्थांच्या संपर्कात राहून फेडरेशन कार्याच्या कक्षा रुंदावत आहे.

कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यासाठी अधिकधिक  प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून फेडरेशन सध्या भारतभर प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी संपर्क साधून आहे. स्वतःच्या अनुभवांच्या फायद्याची देवाण-घेवाण  इतर संस्थांशी आणि कार्यकर्त्यांशी करण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षणाचे एक प्रारूप संस्थेने बनवले आहे. तीनस्तरीय महादान (नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान इत्यादी सर्व शारीरिक दाने)  प्रशिक्षणक्रमाचे हे प्रारूप संस्था राबवित आहे.

‌असे असले तरी जनजागृतीच्या बाबतीत आपण सगळेच अजून खूपच मागे आहोत हे पुढील आकडेवारीवरून लक्षात येईल. देशात प्रत्यारोपणासाठी दरवर्षी सर्वसाधारणपणे दोन लक्ष मूत्रपिंडांची  गरज असते त्यापैकी सध्या ६००० पेक्षा जास्त मूत्रपिंडे उपलब्ध होऊ शकत नाहीत. ३०००० पेक्षा जास्त यकृतांची गरज आहे पण फक्त १५०० च्या जवळपास यकृतेच उपलब्ध होऊ शकतात. साधारण ५०००० हृदयांची गरज आहे पण फक्त १०० च्या जवळपास हृदयेच उपलब्ध होऊ शकतात. १ लक्ष डोळ्यांच्या गरजे पैकी २५००० पेक्षा जास्त नेत्र उपलब्ध होऊ शकत नाहीत. सध्याची परिस्थिती पहाता व दिवसेंदिवस अवयवांच्या गरजेची वाढती संख्या पहाता दर वर्षी आवश्यकता व उपलब्धता या मधील दरी वाढतच आहे. ही वाढती दरी भरून काढायची असेल तर अवयवदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले पाहिजे. या सर्व परिस्थितीवर एकच उपाय म्हणजे जनजागृती !  आता ही जबाबदारी प्रामुख्याने सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था व प्रसिद्धी माध्यमांवरच येऊन पडते. म्हणूनच  दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेचे समन्वयाने प्रबोधन करण्याचे कार्य  आज सर्वांच्या डोळ्यात भरते आहे.

फेडरेशनला आज अनेकांच्या सक्रिय सहकार्याची आणि बरोबरीने वाटचाल करण्याची गरज आहे.

जनजागृती कार्यक्रमांना प्रसिद्धी माध्यमांकडून अधिक सहकार्य मिळावे. या  संबंधीच्या मजकुराला प्रसिद्धी माध्यमांमध्ये सुद्धा महत्वाचे स्थान मिळावे असे  वाटते. पण त्याच बरोबर प्रसिद्धी माध्यमांनी आणि विविध कंपन्या आणि व्यापारी संस्था यांनी सुद्धा स्वतःहून कांही उपक्रमांचे आयोजन करणे ही आज काळाची गरज आहे.

असे काही आयोजन कोणी करणार असल्यास फेडरेशन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. फेडरेशनला सामाजिक दायित्व उपक्रम ( सी. एस. आर. ) यासाठी मंजूरी असून ज्या कंपन्यांकडे सीएसआर साठी निधी उपलब्ध असेल त्यांचे बरोबर समन्वय करून चांगले प्रकल्प राबवण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध आहे.

फेडरेशन ला मिळणाऱ्या देणग्यांसाठी ८०जी कलमाखाली आयकराची सवलत प्राप्त आहे.

विविध खाजगी व सरकारी यंत्रणा, रुग्णालये, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व प्रसिध्दी माध्यमे यांनी एकमेकांना सहकार्य करून विविध उपक्रमांनी अवयवदानासाठी   लोक जागरणाची व्यापक मोहीम आखणे जरूर आहे. पण त्या नंतर सुद्धा सतत वरचेवर हा विषय व या विषयावरील चर्चा जागती ठेवली पाहिजे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीपत्रके (पोस्टर) स्पर्धा, पदयात्रा, सायकल रॅली, मोटारसायकल रॅली. चित्ररथ, घोषणा व फलकबाजी, पत्रके वाटप, पथनाट्ये, या विषयावरील कविता-गाणी, नाट्यछटा, एकांकिका, लेख, व्याख्याने वगैरे जे जे करता येईल त्या सर्व मार्गानी लोकांच्या पर्यंत या विषयाचे महत्व पोहोचवण्याची धडपड आज फेडरेशन करत आहे. हा विषय लोकांच्या डोक्यातून, कानातून मनात पोहोचला पाहिजे आणि मनामनात रुजला पाहिजे.

त्याही पुढे जाऊन मी म्हणतो, चांगले काम करायला औचित्य हवेच का ?   हवेच असेल तर

१७ मे हा महासंघाचा म्हणजेच फेडरेशनचा वर्धापन दिन आहे, हे औचित्य काय कमी आहे ?  

चला आपण जे कोणी सुजाण नागरिक आहोत, विचारवंत, समाज सुधारक जे कोणी आहोत त्या सर्वानी नक्की ठरवूया  की काळाचे हे आव्हान पेलण्यासाठी  आपण अवयवांची उपलब्धता व गरज या मधील दरी  कमी करण्या साठी झटून प्रयत्न करूया ! 

त्यासाठी आपण फेडरेशनशी संपर्क साधावा.

फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशन

६०१, कैलाशधाम , जी. व्ही. स्कीम रोड नंबर ४ मुलुंड, मुंबई  ४०००८१

ई-मेल : [email protected] [email protected]

www. organdonation.net.in

पत्रव्यवहारासाठी पत्ता:

श्रीकांत कुलकर्णी (सचिव) 

३, श्रीनिवास गौरव अपार्टमेंट, ऑफ मयूर कॉलनी डीपी रोड, कोथरूड, पुणे ४११०३८

© श्री सुनील देशपांडे

(उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.) 

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments