सुश्री सुनीता जोशी 

🌸 विविधा 🌸

☆ हॉस्पिटलचं बील कसं ठरतं ? – लेखक : डॉ. सचिन लांडगे ☆ सुश्री सुनिता जोशी ☆

सध्या जळगाव मधल्या एका बँकर असलेल्या व्यक्तीची हॉस्पिटल बिलाविषयीची पोस्ट, आणि त्याला एका डॉक्टरांनी दिलेले उत्तर व्हायरल होतेय.

त्या निमित्ताने माझ्या एका जुन्या लेखातला काही अंश –

समाजात एकच गोष्ट वेगवेगळ्या दर्जाची मिळत असते.. पैसे देऊन आपल्याला जास्त दर्जाच्या सेवा घेता येतात.. चहा पाच रुपयाला पण मिळतो, आणि पाचशे रुपयाला पण मिळतो..! आपण आपल्या ‘शौक’नुसार आणि ‘खिशा’नुसार ठरवायचे की टपरीवरचा चहा प्यायचा की “ताज हॉटेल” मधला प्यायचा..

जसं ‘ताज’ला चहा पिऊन तुम्ही ओरड करू शकत नाहीत की आम्हाला लुटले म्हणून.. तसंच, ब्रीचकँडी किंवा फोर्टीस मध्ये जाऊन तुम्ही ओरड करू शकत नाही की आम्हाला लुटले म्हणून..

कुठल्याही ठिकाणी संभाव्य बिलाची साधारण पूर्वकल्पना देतात.. तुमच्या खिशाला परवडत नसेल तर जाऊ नका.. इतकं साधं गणित आहे..!

सरकारी हॉस्पिटलमध्ये अगदी पाच रुपयांचा केसपेपर काढला की गोरगरिबांचे कसलेही ऑपरेशन होते.. इतरही सेवाभावी संस्था आणि ट्रस्टची अनेक हॉस्पिटल अत्यल्प दरात उपचार देतात.. तिथेही आपण जाऊ शकतो..

पण लोकांना १. डॉक्टरही अनुभवी आणि बेस्ट पाहिजे असतो.. २. तो सहज आणि हवा तेंव्हा उपलब्धही पाहिजे असतो.. ३. हॉस्पिटलमध्ये एसी पासून गरम पाण्यापर्यंत आणि नर्सपासून स्वीपरपर्यंत सगळ्या सोयी अपटुडेट हव्या असतात.. ४. सगळ्या मशिनरी आणि तपासण्यांच्या सोयी एकत्र पाहिजे असतात.. ५. आणि बिल मात्र कमी पाहिजे असतं..!! नाहीतर डॉक्टर लुटारू..!! कसं जुळणार हे गणित.?

डॉक्टरांच्या अनुभवानुसार किंवा उपलब्ध सोयीसुविधां नुसार खाजगी हॉस्पिटलचे दर ही कमी अधिक होत असतात.. त्यात अमुक कोणी लुटतो किंवा कुणी समाजसेवा करतं अशातला भाग नसतो.. ज्या डॉक्टरला जिथंपर्यंत परवडतं तेवढं कमी तो करू शकतो..

दहा बेडच्या हॉस्पिटलसाठी नियमाने अकरा सिस्टर लागतात.. (एका वेळी तीन, आणि तीन शिफ्टच्या नऊ, साप्ताहिक सुट्टी आणि रजा यासाठी अतिरिक्त दोन), पण अकरा ऐवजी तीनच सिस्टर ठेवल्या, चार ऐवजी दोनच वॉर्डबॉय ठेवले, नॉर्मस् प्रमाणे सगळ्या मशिन्स न घेता फक्त अति गरजेच्या मशिनरी घेतल्या, आणि बाकीच्या सुविधा पण जेमतेमच ठेवल्या तर पेशंट बिल खूपच कमी ठेवता येतं.. याचा अर्थ असा नसतो की जास्त बिलिंग असणारे बाकीचे हॉस्पिटल्स पेशंटला लुटतात.. तिथं सुविधा आणि मशिनरी जास्त असतील म्हणून त्यांना तितक्या कमी पैशात उपचार किंवा ऑपरेशन करणे शक्य नसेल.. हाच त्याचा अर्थ असतो.. तुमच्या पेशंटला लागो अथवा न लागो, कुठल्याही दुर्घटनेसाठीची जी बॅकअप सिस्टीम असते, ती तर ready ठेवावीच लागते ना..!! 

एक उदाहरण सांगतो, Defibrillator ही जीवरक्षक मशीन काही डॉक्टरच्या आयुष्यात एकदाही लागत नाही, पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ते ठेवणं कम्पल्सरी आहे, आणि त्याची किंमत 2 ते 6 लाख रुपये आहे!! ते रोज चार्ज-डिस्चार्ज करणं अपेक्षित असतं आणि त्याची वॉरंटी दोन वर्षे असते..

अशा कित्येक गोष्टी असतात ज्यापासून समाज अनभिज्ञ असतो.. पण त्या गोष्टी डॉक्टरांच्या खर्चात पडत असतात..

समजा, गर्भाशयाची पिशवी काढायच्या ऑपरेशनला सगळ्या सुविधा असलेल्या हॉस्पिटलला कमीतकमी वीस हजार लागत असतील उदाहरणार्थ.. पण तेच ऑपरेशन, एखाद्या अजिबात सोयी सुविधा उपलब्ध नसलेल्या, कसल्याच मशिनरी उपलब्ध नसणाऱ्या, कामगारवर्ग पण पुरेसा नसलेल्या, आणि ऑपरेशनसाठी लागणाऱ्या धाग्यांपासून ते अँटिबायोटिक पर्यंत सगळं non-branded वापरणाऱ्या एखाद्या हॉस्पिटलला तेच ऑपरेशन दहा हजारात देखील परवडते..!

आता समाज असं म्हणतो की, तिथं तर दहा हजारातच ऑपरेशन होतं, मग आमच्या इथले बाकीचे हॉस्पिटल्स किती लुटतात.!!

दोन हॉस्पिटल मधील बिलिंगच्या या तफावतीसाठी खूप गोष्टी कारणीभूत असतात.. त्याची कल्पना जनसामान्यांना येणं शक्य नाही.. मोक्याच्या ठिकाणी असलेला हॉस्पिटलचा प्लॉट, बिल्डिंग, मेंटेनन्स, वीज, पाणी, स्टाफ, सरकारी फी आणि टॅक्सेस यांपासून ते तिथल्या वैद्यकीय सुविधा, मशिनरी, आणि वापरत असलेल्या इतर गोष्टी त्यात समाविष्ट असतात.. यावर बिलिंग ठरते.. या गोष्टींची कॉस्ट कमी जास्त झाली की बिलिंगमध्ये पण तफावत दिसते.. (तरी यात डॉक्टरांची फिस आणि त्यांचा अनुभव याची कॉस्ट नाही धरली..)

म्हणून, माझ्या स्वतःच्या आईचे ऑपरेशन असेल तर मी ऑपरेशन कोणते आहे, त्यासाठी किमान कितपत सुविधा लागतात आणि डॉक्टर कोण आहे यावर हॉस्पिटल ठरवेल.. दहा हजाराकडेही जाणार नाही आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जाऊन अडीच लाखही घालणार नाही..

हॉस्पिटल म्हणजे एक “स्मॉल स्केल इंडस्ट्री” असते.. जी चालवणं अत्यंत जिकरीचं असतं..

उदाहरणादाखल सांगतो, आमच्या इथल्या एका 50 बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचा मेंटेनन्स 26लाख महिना आहे.. पेशंट येवो अथवा न येवो, ‘बेड ऍक्युपन्सी’ कितीही राहो, मेंटेनन्स, बिलं, टॅक्सेस, भाडे आणि स्टाफ व ड्युटी डॉक्टरांच्या पगारापोटी महिन्याच्या तीस तारखेला 26 लाख तयार ठेवावे लागतात! त्या डॉक्टर मित्रानं मला सांगितलं, महिन्याच्या साधारण 22-26 तारखेपासून त्याचा प्रॉफिट सुरू होतो..

म्हणूनच “मेडिकलचं सगळं तर आम्हीच आणलंय, मग तरी हॉस्पिटलचं बिल इतकं कसं झालं?” असं म्हणणाऱ्यांना तर मला परत पहिलीपासून शाळेत पाठवावं वाटतं..

असो..

अजून एक, मला एकाने प्रश्न विचारला की, इथं हॉस्पिटलला माझे अपेंडीक्स चे ऑपरेशन झाले, मला 15000 खर्च आला, पण सरकारच्या MJPJAY योजनेत आमच्या शेजाऱ्याचे ऑपरेशन झाले, त्यात हॉस्पिटलला शासनाकडून 10,000/- च मिळतात असे ऐकलेय, मग मला पाच हजारांना लुटले का?

असं वाटणं साहजिक आहे.. पण 

  1. अशा योजनेत डॉक्टरनी ऑपरेशन करणे हे केवळ चालत्या गाडीत प्रवासी घेण्यासारखे आहे.. त्या ऑपरेशन च्या निमित्ताने हॉस्पिटलचे नाव ही होते आणि भविष्यात त्या पेशन्टचे इतरही ओळखीचे लोक तेथे ट्रीटमेंट ला येऊ शकतात..
  2. अशा योजनांच्या ऑपरेशन च्या वेळी डॉक्टर औषधे आणि इतर साहित्य जरा कमी रेटचे वापरून (sub-standard म्हणत नाही मी) आपला”लागत खर्च” (investment cost) कमी करतात.. पण म्हणून सरसकट सगळ्यांसाठीच तसं करणं शक्य नसते..

गाडी चाललीच आहे तर एखादा प्रवासी फुकट नेणे किंवा कमी तिकिटात नेणे, हे जमू शकते.. पण सगळेच प्रवासी कमी तिकिटात नेणे जसे शक्य नसते, त्याप्रमाणेच एखादया योजनेतले ऑपरेशन्स कमीत करणे किंवा एखादे ओळखीतल्याचे किंवा गरीबाचे ऑपरेशन कमीत करणे डॉक्टरला जमते.. पण म्हणून सगळेच तसे करा म्हणत असतील तर ते शक्य नाही.. म्हणून अशा वेळी बाकीच्यांनी ‘लुटले’ वगैरे असं म्हणणं संयुक्तिक नाही.. एखाद्या खरेच गरीब असलेल्या पेशंटचे उपचार बरेच डॉक्टर maintenance cost च्या ही खाली, फक्त इन्व्हेस्टमेंट कॉस्ट विचारात घेऊन करत असतात, पण म्हणून सगळ्यांनाच डॉक्टरनी असं करावं असं जर समाजाचं म्हणणं असेल तर ते योग्य नाही.. 

एखादा बिल कमी करायला आला आणि तो खूपच गरीब वाटला तर डॉक्टर त्याचे काही बिल कमी करतात, याचा अर्थ त्यांनी ते आधीच वाढवून लावलेले नसते.. ते त्यांच्या नफ्यातून किंवा मेंटेनन्स कॉस्ट मधून पैसे कमी करत असतात.. पण सरसकट तसं करणं शक्य नाही, आणि आधीच पेशंट्स कमी असलेल्या हॉस्पिटलना तर ते शक्यच नाही..

बहुतेक सर्व डॉक्टर रोज काहीना काही रुग्ण फ्री तपासतात, किंवा पैसे नसतील तर ‘राहू दे राहू दे’ म्हणतात.. मला सांगा, समाजातला कुठला अन्य व्यावसायिक किंवा व्यापारी तुमची ओळखपाळख नसताना त्यांची फीस तुम्हाला ‘राहू दे, राहू दे’ म्हणतो बरं..?

माझ्या पाहण्यातले कितीतरी डॉक्टर्स फक्त औषधांच्या खर्चावर ऑपरेशन करून देतात, प्रसंगी औषधे सुध्दा आपल्या जवळची मोफत वापरतात.. खूपच गरीब असलेल्या पेशंटला स्वतःचे पैसे आणि क्रेडिट वापरून पुण्यामुंबईत ट्रीटमेंटची सोय करून देणारेही बरेच आहेत..

वैद्यकीय क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे, ज्यात डॉक्टरला समाजसेवा करण्यासाठी घरदार सोडण्याची किंवा वेगळं काही करण्याची गरज नसते.. 

त्यांनी स्वतःचा व्यवसाय जरी सचोटीने केला तरी ती समाजसेवाच असते..

अजून एक कायम गाऱ्हाणं ऐकू येतं, डॉक्टर जुन्या ठिकाणी होते तर बिल एवढं एवढं यायचं, नवीन बिल्डिंगमध्ये गेले तर लगेच त्यांनी लुटणं सुरू केलं, लगेच त्यांनी त्यांचं बिलिंग वाढवलं..

मला एक सांगा, नवीन प्लॉट किंवा बिल्डिंग डॉक्टरला कुणी भेट म्हणून दिलीय का हो? बरं बिल्डिंगचं जाऊ द्या, नविन ठिकाणी गेल्यावर त्याचं वीज बिल वाढलंय, नवीन मशिनरी घेतल्यात, सुविधा वाढविल्यात, स्टाफ वाढवलाय.. ह्या सगळ्यामुळं त्याचा मेंटेनन्स पण खूपच वाढलाय.. 

मग ही वाढीव मेंटेनन्स कॉस्ट त्यानं बिलिंग मधून नाही घ्यायची तर कुठून घ्यायची बरं.? काय अपेक्षा आहे लोकांची? कुठून ऍडजस्ट करावा त्यानं हा वाढीव खर्च? कुक्कुटपालन वगैरेचा जोडधंदा त्यानं हॉस्पिटलला चालू करावा की काय.!! (इतर कुठला व्यावसायिक त्याच्या व्यवसायातील इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आणि मेंटेनन्स कॉस्ट ग्राहकांकडून घेत नाही सांगा बरं!!)

लोकांच्या ह्या मानसिकतेमुळं नवीन ठिकाणी शिफ्ट झाल्यावर कितीतरी डॉक्टरांची प्रॅक्टिस कमी झालीये.. म्हणून, कितीतरी जण नवीन जागेत गेल्यावर वर्ष दोन वर्षे तरी ह्या भीतीपोटी बिलिंग वाढवत नाहीत, प्रसंगी तोटा सहन करतात..

माझे एक नातेवाईक मला म्हणाले, अरे त्या XYZ डॉक्टरनं मला तपासायला हात सुद्धा लावला नाही, माझे रिपोर्ट बघितले आणि गोळ्या लिहून दिल्या, आणि तपासणी फी शंभर रुपये घेतली..

मी त्यांना म्हणालो,

  1. ह्या शंभर रुपयात त्यांच्या ओपीडीचे भाडे, किंवा बांधकाम खर्च असतो, वीज पाणी एसी आणि विविध प्रकारच्या परवानग्या, रिसेप्शनिस्टचा पगार असा इतरही खर्च त्यात असतो..
  2. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या पेनाच्या शाईत एक विशिष्ट प्रकारची माती मिसळावी लागते..

मग ते आश्चर्याने म्हणाले, कसली माती..?

मी म्हणालो- दोन मिनिटात तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरून तुमचा आजार ओळखून त्यावर तुमच्या वय वजन आणि रिपोर्टनुसार योग्य ते औषध लिहून देण्यासाठी जे शिक्षण आणि अनुभव लागतो, तो मिळविण्यासाठी त्यांनी जी आपल्या आयुष्याची माती केली आहे, ती माती मिसळावी लागते, तिची किंमत असते ती..!! 

असो..

लोकांना वाटतं डॉक्टर खोऱ्याने ओढतात.. पण खोरे असण्याचे दिवस आता गेलेत.. प्रत्येक स्पेशालिटीत शंभरात दहाबारा जणच् चांगलं कमवित असतात, आणि समाजाच्या डोळ्यासमोर तेच येतात.. आणि मग जनरलाईझ्ड स्टेटमेंट होते की डॉक्टर लोक खोऱ्याने ओढतात म्हणून.. खरंतर निम्म्याहून अधिक जण हॉस्पिटलचा मेंटेनन्स आणि इन्कम याची सांगड घालायला झगडत असतात..

खरंतर महाविद्यालयीन मुलांच्या हॉस्पिटलला शैक्षणिक सहली काढायला हव्यात.. 

१. तिथलं कामकाज कसं चालतं, २.ट्रीटमेंट कशी असते, ३.डॉक्टर आणि स्टाफवर कसले ताण असतात, ४.तिथं मशिन्स कोणत्या कोणत्या असतात, ५.बिलिंग कसं असतं, ६.सगळी सिस्टीम कशी चालते.. हे पाहायला लावावं वाटतं.. 

… आणि निबंधाचे विषय पण “डॉक्टरसोबतचा एक दिवस” , “आयसीयु ड्युटीची एक रात्र” किंवा “मी डिलिव्हरीला मदत केली तेंव्हा..” अशा प्रकारचे असायला हवेत.. 

तरच जनता वैद्यक साक्षर होईल..

मित्रांनो, डॉक्टरांवर विश्वास ठेवा, त्यांना समजून घ्या.. तुम्ही ‘ग्राहक’ बनला, तर डाॅक्टर ‘दुकानदार’ बनतील.. तुम्ही “माणूस” समजून डॉक्टरांशी बोला, मग डाॅक्टर अवश्य “देवमाणूस” बनतील..!!

धन्यवाद..

लेखक :  डॉ सचिन लांडगे, भुलतज्ञ, अहमदनगर.

© सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments