श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ हरवले ते…. ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

सतत पूर्वीचे दिवस आठवणे,त्या आठवणीत गुंतून पडणे,वर्तमानातल्या सगळ्याच गोष्टीना सतत नावे ठेवणे हे खरंतर माझ्या स्वभावाचा भाग कधीच नव्हते. पण…..!

पण गेलं वर्षभर ठाण  मांडून बसलेला आणि अद्यापही जायचं नाव न घेणारा कोरोना, त्याचा विषारी प्रसार, आणि त्यामुळे झालेली जीवघेणी पडझड, परके होऊन गेलेले आपलेच जगणे, प्रत्येकाच्या मनावरचं भितीचं सावट, आणि अपरिहार्यतेमुळे मनात भरुन राहिलेली अस्वस्थता हे वास्तव स्विकारायला आणि पचायलाही जसजसं जड होत चाललं तसतसं वर्तमानात जगणारं माझं मन हरवलेल्या भूतकाळाचा वेध घेऊ लागलं. हे असं सार्वत्रिक, तीव्रतर हताशपण यापूर्वीच्या आयुष्यात मी कधी अनुभवलंच नव्हतं. आजची ही आपल्या आस्तित्वाचीच अनिश्चितता मला विचार करायला प्रवृत्त करणारी ठरलीय.

माझं बालपण, कॉलेज जीवन, नंतरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सगळं कित्येक वर्षांपूर्वीचं, पण कालपरवाच घडून गेल्यासारखं मला लख्ख आठवतंय. तेव्हाचा मी आणि आजचा मी कोणीतरी वेगळ्याच दोन व्यक्ती असल्यासारखी दोघांचीही जीवनशैली दोन ध्रुवांवरची वाटावी एवढी परस्पर भिन्न असल्याचं अगदी ठळकपणे जाणवतं आणि त्याचं आश्चर्यही वाटतं रहातं. अर्थात माझ्यापुरतं सांगायचं तर जीवनशैलीतले हळूहळू होत गेलेले हे सगळे बदल मी त्या त्या वेळी डोळसपणे स्वीकारलेले असल्यामुळे पूर्वीच्या जीवनशैलीची महत्वाची तत्त्वं आजही मी दुर्लक्षित केलेली नाहीयत.त्यामुळे त्याबद्दल स्वतःचं काही चुकल्याची रुखरुख नाही आणि समाधानवृत्तीतही काही फरक पडलेला नाही. पण तरीही आजूबाजूचे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही ही बोच मात्र मनात सलते आहेच.

तेव्हा ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ आणि ‘ऋण काढून सण साजरे करू नयेत’हीच वृत्ती प्रत्येक घराचा, संसाराचा भक्कम पाया असे. कारणपरत्वे कुणाकडून नाईलाज म्हणून हात उसने पैसे घ्यायला लागलेच तर ते दिलेल्या वेळेत परत करता यावेत म्हणून हजार काटकसरी आणि तडजोडी करून आधी ते पैसे परत करायला प्राधान्य दिले जाई. तोवर जीवाला घोर असेच आणि शांत झोपही नसेच. अखेरचा श्वास घेताना कुणाचं ‘पै’चंही देणं नसावं म्हणजे तो जिंकला’ हा विचार आयुष्यभर प्राणापलिकडे जपला जाई. कर्ज काढून सण साजरे करणं तर खूप दूरची गोष्ट٫ पण नित्योपयोगी वस्तूंची खरेदीसुद्धा काटकसर करून पै पै साठवून मगच केली जाई. सुवर्णालंकार घालून मिरवण्याची हौस दर गुरूपुष्याला गूंजभर सोनं विकत घेऊन, ते विकत घेता आल्याच्या आनंदातच परस्पर भागवली जाई.

खरं तर हे सगळं कालबाह्य कधी झालं हे जगण्याच्या व्यापात कधी लक्षातच नाही आलं. बदल हळूहळू घडत गेले पण बहुतांश जणांनी ते फारसा विचार न करता सरसकट स्वीकारले. या बदलांना ठळकपणे सुरुवात झाली ती जागतिकीकरणानंतर बाजारयुग अवतरलं त्या क्षणापासून. या बाजारयुगाने निर्माण केलेला उपभोगाचा रंगीबेरंगी भुलभुलैय्या आणि ऐष आरामाचा हव्यास यांनी एक वेगळेच गारुड समाजमनावर निर्माण केलं. मग पूर्वीच्या काळातल्या चैनी गरजा केव्हा होऊन बसल्या समजलंच नाही. त्यामुळे पाय पसरायला अंथरूण खूपच कमी पडतंय असं वाटू लागलं. त्या अंथरुणाची लांबी वाढवण्यासाठी सहज उपलब्ध असणारी कर्जं काढून सुख आणि समाधान शोधण्याचा सहजसोपा मार्ग बिनदिक्कतपणे अनुसरला जाऊ लागला. ‘मूर्ख माणसं घरं बांधतात आणि शहाणी माणसं त्यात भाड्याने रहातात’ असं पूर्वी म्हणायचे. आता कर्ज काढून घर बांधणारे सूज्ञ आणि कर्जं न काढणारे मूर्ख समजले जाऊ लागले. कोरोना हे एक निमित्त, पण ती कर्जं आणि परतफेडीचे हप्ते म्हणजे ‘घी देखा लेकीन बडगा  नही देखा’ या उक्तीचा प्रत्यय देणारे ठरले. त्याक्षणी झालेला तूप-रोटी मिळाल्याचा क्षणिक आनंद कोरोना काळात काळवंडूनच गेला.आणि मग दरमहा मानगुटीवर बसलेलं हप्त्यांचं ओझं तथाकथित समाधानावर बसलेल्या बडग्यासारखंच वाटायला लागलं.

या सगळ्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रवेश झाला आणि कर्जांच्या हप्त्यांचं ओझं वाहणारं गाढव ठरला तो ‘सामान्य माणूस’, पूर्वीच्या काळी स्वतःच स्वतःभोवती आखून घेतलेल्या वर्तुळात समाधानी रहायचा. त्या सामान्य पण सुखी माणसाच्या सदऱ्याला या कर्जांच्या हप्त्यांमुळे जागोजागी ठिगळं लावावी लागल्याचं तीव्रपणे जाणवू लागलं.

पूर्वीच्या काळीही जीवघेणी संकटं येत होतीच. पण जगण्यातल्या अनपेक्षित अडचणींनी निर्माण केलेल्या त्या गंभीर परिस्थितीतही तग धरून रहाता येईल असं नीटनेटकं नियोजन वैयक्तिक पातळीवरच असायचं. सध्याच्या जीवनशैलीत ते नियोजनच गृहीत न धरल्यामुळे घेताना किरकोळ वाटणारे कर्जाचे हप्ते आता फेडताना मात्र डोईजड होऊन बसलेत.

आजच्या जगण्याला प्रचंड वेग आहे ते खरंच.पण किती आणि कुठवर धावायचं आणि तेही किती वेगानं हे स्वतःच योग्य वेळी ठरवण्याचं भान जीवघेण्या स्पर्धेत होणाऱ्या दमणूकीमुळे असं हरवूनच जातंय ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्यासाठी जगायचं तो जगण्यातला आनंद हरवून आपला जगण्याशीच झगडा सुरू होतो आहे.

अशा परिस्थितीत जगण्याचं नेमकं भान न हरवता स्वतःचे प्राधान्यक्रम पुन्हा एकदा नीट तपासून पहाणं अगत्याचं आहे. हे झालं तरच हरवलेले आपले मोकळे श्वास पुन्हा अलगद गवसतील अन्यथा त्या श्वासांसारखाच जगण्याचा आनंदही हरवूनच नाही फक्त,तर विरुनच जाईल.

————————

अरविंद लिमये,सांगली.

(9823738288)

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments