श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – आमचा शिमगा ….? ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
(जून्या लेख/ चारोळींची काही बदलांसह संग्रहित आहुती ?)
होळी म्हणले की ‘ बोंबलणे ‘ आणि ‘ टिमकी ‘ वाजवणे ( या दिवशी स्वत:ची सोडून) याचे बाळकडू आम्हाला घाटावरच (सांगली) मिळाले. मात्र मुंबईत आल्यावर या दोन्ही गोष्टींना मुकलो. दरवर्षी सोसयटीच्या आवारात अगदी पारंपारिक पध्दतीने होळी साजरी होते मात्र या दोन्ही गोष्टी बघायला ( करायला ) मिळत नाहीत.
मात्र या वर्षी होळी पेटली की ठरवलय ,प्रसादाचा नारळ होळीत सोडायचा आणि मग होळी भोवती प्रदक्षिणा मारत बोंब ठोकायची. ‘ (हा काय करतोय येड्यासासारखा ? ‘? असे सोसायटीतील लोकाना वाटले तरी चालेल .)
वर्ष भरात ज्या गोष्टींमुळे त्रास झाला/ होतो त्यांचा उध्दार करायचाच म्हणून यादी तयार करायला घेतली ती अशी…..
१) पहिली फेरी करोना विषाणूच्या नावे – ६ वर्षानंतर संधी आलेली बाहेर जायची. साडेसातीचा परिणाम …. ?
२) पर्यावरणवादी – या(ना) लायकांना फक्त होळी आणि दसरा या दिवशीच झाडे, पर्यावरण -हास यांची आठवण होते. ?
३) मुंबईकर – मराठी अस्मितेचा अभिमान बाळगत धुळवडीच्याच दिवशी रंगमंचमी साजरी करणा-या मुंबईकरांसाठी ( आणि यात आता सुसंस्कृत पुणेकर ही आले) तिसरी फेरी.
४) खास ‘ती’ च्या साठी – ती हो आमची , ८.२१ ची – ठाणे लोकल. एक दिवस जरी वेळेवर आली तर शप्पथ…। ?
५) आम्हाला खोट्या प्रकरणात अडकवून पोलीस चौकीची फेरी घडवून आणणाऱ्यांच्या नावे ?
६) समुहात राजकारणाच्या पोस्ट नको असा ‘शिमगा’ करुन इतरांच्या मजेशीर पोस्टवर स्वत: बोंब मारणाऱ्यांच्या नावे एक फेरी
७) गाण्यातील सूरांसह, लेखनाची ही वाट लावणाऱ्या सर्व आमच्या सारख्या फ्यूजन कलाकारांच्या नावेही एक फेरी
बास ! बास ! दमलो, याच्या पुढे फे-या मारता येणार नाहीत ( आणि जास्त बोंबलूनही उपयोग नाही ?)
अरे हो सोशल मिडिया सोडायचा असा सल्ला देणाऱ्यांसाठी? विसरलोच की.
नाही नाही हा मात्र सल्ला आपल्याला आवडला. आणि हा सल्ला यांच्यापर्यंतही पोहोचला , लगेच तयारीतच आल्या
नो व्हॅाट्स अप, नो फेसबुक
साजरी करू या होळी….
शब्दांना सोबत घेऊन लगेच
आल्या चार ओळी ?….बोंबला सौख्य भरे❗?
बोंब मारायची ही झाली माझी कारणे
काय तुमची टार्गेट्स तयार आहेत का ?
कळूदे आम्हाला ही ?
( टीपः वरील यादीत बुडणाऱ्या बँका, ऑफीस , महागाई , भ्रष्टाचार, ट्रॅफिक जाम यांना मुद्दाम स्थान दिले नाही. यांच्या नावाचा शिमगा रोजचाच आहे. त्यांच्या बद्दल बोंबलणे जाऊ दे त्यांच्या करामतीने आमची बोबडी वळु नये हीच ‘ होळी’ चरणी प्रार्थना ?)
? अमोल केळकर ?❗
© श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com