सुश्री त्रिशला शहा
विविधा
☆ २१मे… आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त –☕ चहा ☕- अमृततुल्य पेय – भाग-१ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
“काय बाई तरी, त्या मालतीबाईंच्या घरी गेले, तर साधा चहासुध्दा विचारला नाही “, ” चहाला या बरं का घरी, ” ” पावणं चला जरा च्या घेऊ”, ” झालं का चहापाणी?”, मालक, जरा च्या-पान्याच बघा की ” मंडळी या सगळ्या बोलण्यातून एकच शब्द वारंवार येतोय आणि तो म्हणजे ‘ चहा’. या सगळ्यामध्ये महत्वाचे जाणवते ते म्हणजे आपुलकीची जाणीव. एकमेकांच्या मैत्रीतला दुवाच जणू या चहाने जपलाय. या चहामुळे अनेक नाती जोडली जातात, शिवाय अनेक कार्यक्रम, मिटींग यांची सांगता चहापानाने होते.
भारत आणि आता काही प्रमाणात परदेशात सुध्दा ‘चहा’ एक अनमोल पेयच बनून राहिले आहे. कोणत्याही ऋतुमध्ये, कोणत्याही वेळी चहा प्यायला चालतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आजारी व्यक्ती, स्त्री-पुरुष, देशविदेशातील व्यक्ती यातील कुणालाही चहा पिणं वर्ज्य नाही. झोपून उठल्यावर, कामाचा शीण जावा म्हणून, मित्रांनी आग्रह केला म्हणून, अभ्यास करताना, ड्रायव्हिंग करतान झोप येऊ नये म्हणून, खूप थंडी आहे म्हणून, डोक दुखतयं म्हणून, टाईमपास, पाहुणचार म्हणून यातील कोणतेही कारण चहा पिण्यास पुरेसे आहे.
पूर्वी चहा पावडरची एक जाहीरात रेडिओ वर लागायची ” अवं सुवासिनीनं कुकवाला आन् मर्दानं चहाला नगं म्हणू नये”. म्हणजे इथेसुध्दा चहाला एक मानाचं पेय म्हणून प्रसिध्दी, दर्जा मिळवून दिला गेलाय हे लक्षात येत. तस अगदी साध वाटणारं चहा नावाच हे पेय म्हणजे पाणी, दूध, साखर आणि चहापावडर भांड्यात एकत्र करुन गँसवर उकळलेल एक पेय आणि ते गरम पिण्याचीच मजा. यामध्ये मग काहीजण आलं, वेलची, गवती चहा, चाँकलेट पावडर, चहाचा मसाला असे आपल्या आवडीनुसार चहात घालतात, तर काहीजण कच्चे दूध घालतात, काहीजण पाणी न घालता नुसते दूध वापरतात. दुधाऐवजी लिंबू टाकून काहीजण पितात. अशा कितीतरी प्रकारे चहा प्याला जातो. काही हाँटेल्स किंवा टपऱ्या, गाडे या निव्वळ चहासाठी प्रसिद्ध आहेत. तिथे तर चहाचे अजून वेगळे प्रकार पहायला मिळतात. विशेषतः टक्कर चहा, कटिंग चहा, स्पेशल चहा, साधा चहा, गुळाचा चहा इत्यादी.
प्रत्येकाच्या चहा पिण्याच्या पध्दती पण वेगवेगळ्या. कुणाला जास्त साखरेचा गोड चहा लागतो तर कुणाला चहापावडर जास्त टाकलेला, कुणाला एकदम फिक्का तर कुणाला बिन दुधाचा, कुणाला फक्त दुधाचा तर कुणाला मसाल्याचा. प्रत्येकाची चहा पिण्याची पध्दत वेगळी काहींना एकदम गरम चहा लागतो, काहींना थोडा थंड आवडतो, काहींना चहात दुधाची साय घातलेली आवडते. अर्थात चहा पिण्याच्या कितीही वेगळ्या पध्दती असल्या तरी चहा पिण्याची एक तल्लफ असते आणि तो त्याचवेळी प्याला तर त्याची लज्जतही वाढते हे खरचं.
चहा बनविण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या चहा पावडरमध्येसुध्दा खूप प्रकार आहेत. त्यामध्ये सध्या प्रसिद्ध असलेले म्हणजे जी. एस् चहा, रेड लेबल, ब्रुकबाँड, सोसायटी, ताजमहल, गिरनार, वाघ बकरी, सरस्वती, अग्नी, लाँयन, मगदूम चहा, फँमिली मिक्श्चर चहा असे कितीतरी प्रकार उपलब्ध आहेत. त्यात परत अजून गोळी चहा, डस्ट, चाँकलेट, ग्रीनटी, लेमनटी हेही उप प्रकार आहेतच.
क्रमशः…
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈