श्रीमती सुधा भोगले
विविधा
☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-२] ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
त्यामुळे जमिनीत खोलवर तळघरासारखी खोली खोदली जायची व त्यात हळदीच्या हळकुंडाचा साठा केला जायचा. अशा ठेवलेल्या हळकुंडांना कीड लागत नसे. आणि काढल्यावर वजनात त्याचा उतारा जास्त पडे. २००५ सालचे पुरात पेवात पाणी शिरले. त्याचे स्फोट बरेच दिवस होत होते. त्यामुळे बरीचशी पेवात फारशी हळद साठवली जात नसावी. पेवे नष्ट झाली. हळदीच्या वायदेबाजारही इतरस्त्र स्थलांतरीत झाली.
पूर्वीपासूनच पूराचा धोका आहे. या हरिपूर गावचे वैशिष्ट म्हणजे कितीही पूर आला तरी गावाच्या दोन्ही देशीच्या आत पाणी येत नाही. २००५ साली सगळीकडे पाणी आले होते. पण वेशीच्या आत पाणी नव्हते.आयर्विन पूल बांधताना बागेतील गणपतीच्या उंचीवरून तो बांधला गेला की त्या उंचीपर्यंत पूराचे पाणी पोहचू शकत नाही.
पूर्वी नदीकाठी खूप वाळू होती. वरून पहाता माणसे त्यात अंगठ्याएवढी दिसत. ही वाळू लोह मिश्रित होती. त्याकाळी ती दूरवर घराचे बांधकामाला, पुलाचे बांधकामाला वापरत असत.
अशा या कृष्णाकाठी संगीत शारदा नाटकाचे लिखाण, नाटककार कै.गो.ब. देवल यांनी केले. घाटाच्या पारावर बसून त्यांना या नाटकाच्या संहितेची कल्पना स्फूरली. त्याकाळी समाजात जरठ -कुमारी विवाह होत असत. अशा समाजातील अनिष्ट रूढींवर टीकात्मक असे नाटक त्यांनी लिहिले. त्याचा पहिला प्रयोग १८९८ साली झाला. त्या
प्रयोगाच्या शताब्दी वर्षात म्हणजे १९९८ रोजी संगीत शारदाचा प्रयोग त्यांचे स्मरणार्थ पुन्हा (घाटावर ) मंच उभारून जोमात केला गेला, ‘रोटरी क्लब हरिपूर या संस्थेच्या सदस्य महिलांनी कै. गो. ब. देवलांचे घर सजविले. घाटावर त्यांची स्मरणीका म्हणून शीलान्यास बसविण्यात आला. देवलांप्रमाणेच इथले काव्यविहारी, गद्रे हे काव्यासाठी प्रसिद्ध होते.
ते गद्रेच्या घरात माडीवर बसून काव्य लिहीत. त्यांच्या कविता पाठ्य पुस्तकात आम्हाला अभ्यासण्यास होत्या. अलिकडल्या पिढीतील कै. अशोकजी परांजपे हे ही प्रतिभावान लेखक इथल्या मातीतीलच होते.
अशा संपन्न हरिपूरात १९२० साली इथले वैद्य कै. गो. ग, परांजपे यांनी वाचनालयाची स्थापना केली. त्याचे उद्घाटन करण्यास कै. लोकमान्य टिळक हरिपूरात आले होते. आजतागायत हे वाचनालय हरिपूर ग्रामपंचायतीकडून मोफत वाचनालय म्हणून चालविले जाते. सद्य स्थितीत हे वाचनालय रोटरी समाजदल हरिपूर यांच्या महिला सदस्या कार्यान्वित करत आहेत. रोटरीच्या माध्यमातून गावातील कचरा उचलण्यासाठी गाड्या देण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊन कचरा उचलला जातो. त्यामळे गावात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग नसतात.
इथला निसर्ग खरोखरच रम्य आहे. इथे प्राणवायू भरपूर प्रमाणात आहे. (oxygen zone ) त्यामुळे इथली हवा स्वच्छ, शुद्ध आहे.
नदीकाठामुळे इथे निरनिराळ्या पक्ष्यांचा वावर आहे. हरिपूरच्या घाटावर संध्याकाळी गेले असता, लाखो पोपट थव्यांनी आकाशात विहार करताना दिसतात. हे दृश्य विलोभनीय दिसते. मोरांचा ही इथे वास आहे.
माझे घराचे मागे नारळाची बाग आहे. एके दिवशी एक मोर इतक्या उंच झाडावर चढून बसला होता. आम्हाला अचंबाच वाटला. मोर काही उडणार पक्षी नाही. पण निरिक्षणानंतर रोज संध्याकाळी तो मोर, खालच्या झावळ्यातून हळूहळू एक एककरत वरच्या शेंड्यावर जाऊन झोपत असे. सकाळ होताच पुन्हा उतरून शेतात विहार करी. त्याचे लांडोरी सकट सगळे कुटुंबच इथे राहत होते.
आपण सांगलीच्या शास्त्री चौकातून हरिपूरच्या रस्त्याला लागलो की दूतर्फा चिंचेची मोठी मोठी झाडे फार काळापासून इथे आहेत. दरवर्षी त्या झाडांना विपूल चिंचा लगडतात. एप्रिल मे मध्ये चिंचा पिकल्यावर त्या ठेकेदार उतरवतात. चिंच हे फळ फलधारणा झाल्यापासून पूर्ण होण्यास १० ते ११ महिन्याचा कालावधी लागतो. हे मी इथल्या वास्तव्यात निरीक्षणातून पहात आहे. पक्कफळे काढल्यानंतर एप्रिल मे नंतर पानगळ होते. नवी पालवी फूटल्यावर लगेच काही दिवसात फुलोरा येतो. हळूहळू फलधारणा होऊन जुलै, ऑगस्ट मध्ये कोवळ्या चिंचा दिसू लागतात.
तुळशी विवाहापर्यंत पूर्ण चिंच कच्च्या स्वरूपात तयार होते. पुढे फळ पक्व होण्यास होळी नंतर सुरूवात होते. असे हे फळ दिर्घकाळी आहे. त्याकाळी एवढी झाडे मुद्दाम लावली असावीत.
२००५ चे पूरात, आम्ही होडीतून ४ ऑगस्टला बाहेर पडलो. पाण्याचा जोर एवढा होता की होडी पाण्याबरोबर ढकलली जात होती.
आमच्या बरोबरच्या जिगरबाज माणसांनी कासरा चिंचेच्या झाडाला बांधत बांधत होडी गुळवणी मठापर्यंत नेली व तेथून उजवीकडे वळून कोल्हापूर रस्त्यावरील दैवज्ञभवनसमोर बाहेर काढली. म्हणजे त्यावेळी आम्हाला ३५ माणसांना दोन शेळ्या, एक कुत्रा, एक दीड महिन्याचे बाळ, एक ९० वर्षाच्या आजी, चिंचेच्या झाडांनीच वाचविले व मदत केली. ज्यांनी लावली त्या राज्यकर्त्यांचे आभारच मानावे तेवढे कमी आहेत. सद्यस्थितीत हरिपूरचे रस्त्याकडच्या दुतर्फा शेतीचे, नागरिकरण होऊन अनेक वसाहती वसत आहेत. मागील भाग अंकलीपर्यंत खूप दाट शेतीच्या हिरवळीने नटलेलाच आहे. इथली वस्ती गावा पूरती मर्यादीत न राहता हरिपूर, सांगली रोडच्या दुतर्फा वाढते आहे.
अलिकडे त्याबरोबरच काही नवीन मंदीरेही झाली आहेत. नदीकाठी वसलेले म्हादबा मंदीर, त्याचे अलिकडे लहानसे स्वामी समर्थ मंदीर त्याचे समोरील बाजूस आत गेल्यावर श्रीकृष्ण नीलयम मंदीर आहे.
गजानन कॉलनीचे आतील बाजूस गोंदवलेकर महाराजांचे ध्यान धारणा मंदीर वसलेले आहे. हरिपूर म्हणजे हरिचेच गाव सार्थ होते. इथे अध्यात्माचा सतत सर्वकडे आराधना, उपासना भक्ति,प्रवचन, किर्तन या सर्व कार्याची मांदियाळी आहे. रम्य निसर्गात चराचरातून भरून राहिलेला परमात्म्याचा इथे खरोखरच प्रत्यय येतो. भक्तांच्या दुःखी, संसारात गांजलेल्या मनाला इथे उभारी मिळते. पुन्हा प्रसन्न होऊन उमेदीने वाटचाल करण्याची! हरिपूर तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील काही वर्षात योग्य त-हेने विकसीत झाली तर हरिपूर गाव जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसेल.
(क्रमशः)
© श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे ≈
खूप यथार्थ वर्णन