सुश्री तृप्ती कुलकर्णी
विविधा
☆ चैत्रांगण … ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
‘चैत्रांगण’…
झुंजूमुंजू झालंय… पाखरांचा चिवचिवाट चालू झालाय… हवेत सुखद गारवा आहे. आणि वातावरणात एक शांत प्रसन्न नाद भरून राहिलाय. सगळीकडे सडासंमार्जन चालुये, लगबग चालू झालीय. मधुनच स्त्रोत्र पठणाचे स्वर ऐकु येतायत. काही स्त्रिया तुळशीवृंदावनापाशी वाकून एक सुरात प्रार्थना गुणगुणत रंगावली काढत आहेत. एक सारख्या लयीतल्या त्या मोहक वळणदार रेषा काही उगाच शोभेपुरत्या रेखाटल्या नाहीयेत. तर त्या रंगावल्या जणू साऱ्या विश्वाचं प्रतिक बनून या भुतलावर स्थानापन्न झाल्या आहेत. खरतरं तो आहे कृतज्ञता अर्पण करण्याचा एक नैसर्गिक सोहळा. अगदी चैत्राच्या आरंभापासून त्याच्या समाप्तीपर्यंत चालणारा.
अंगणाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या त्या नक्षीदार तुळशी वृंदावनात हिरवा हिरवा शालू नेसलेली तुळस प्रसन्नतेनं डोलत उभी आहे. जणू काही वाऱ्याला सांगतेय पहा बरं ! आज माझ्या भोवतालचं वातावरण किती गंधित, किती विलोभनीय झालं आहे. वाराही त्या दर्शनानं क्षणभर थबकलाय. आणि रक्तवर्णीय पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या त्या शुभ्र रेखीव आकृत्या आपल्या नजरेत सामावून घेतोय. इतक्यात त्या चैत्रांगणाला पाहण्यासाठी सूर्यदेखील आला आणि त्याच्या पदस्पर्शानं त्या चैत्रांगणातल्या सगळ्या प्रतिमा मोहरल्या, चैतन्यमय झाल्या. अखेर सोहळा संपन्न झाला.
हा सोहळा आहे मानवानं आपल्या नैसर्गिक संपदेला कृतज्ञता अर्पण करण्याचा. जे जे घटक त्याच्या जगण्याला, त्याच्या अस्तित्वाला सहाय्यक ठरतात, त्याचं जगणं सुसह्य करतात त्यांचं स्मरण करण्याचा. त्याचं जतन, संवर्धन करण्याचा म्हणूनच तर या चैत्रांगणाचं महत्त्व. त्यात रेखाटले जाणारे ग्रह, तारे, पानं, फुलं, पशु, पक्षी, सौरक्षक साधनं, रोजच्या वापरातली साधनं आणि… हे सगळं न मागता देणारी ती आदिशक्ती, या सगळ्यांचं स्मरण सातत्यानं व्हावं. त्यांचा लाभही सातत्यानं व्हावा, म्हणूनच तर हा प्रतीकांचा सोहळा. अचेतनातून सचेतानाकडे नेणारा.
कृतज्ञता अर्पण करण्याचा एक नैसर्गिक सोहळा!
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈