विविधा
☆ “केवळ माझा सह्यकडा…” ☆ कांचन कुलकर्णी ☆
अर्धवट झोपेत जाणवले की गाडी थांबली आहे. रात्री ११ वाजता नाशिक फाट्याला गाडीत बसल्यापासून ड्रायव्हरने दोन तीन वेळा चहापाण्यासाठी गाडी थांबवली होती. तशीच थांबली असेल असे वाटले. खिडकीतून बाहेर नजर टाकली अन दिसला एक डोंगर आणि वरपर्यंत गेलेली दिव्यांची रांग. पहाटेचे चार वाजत होते. शेजारी झोपेत असलेल्या मिनीला उठवलं आणि सांगितलं, “मिने, आलं कळसूबाई”. कळसूबाईच्या पायथ्याशी असणारं नगर जिल्ह्यातलं अकोला तालुक्यातलं बारी नावाचं गाव होतं ते. तिथून २०-२५ मिनिटं थोड्या चढाच्या रस्त्याने चालत निघालो.
मागे घर पुढे मोकळी जागा अशा बर्याच गडांवर टिपिकल रूपात दिसणार्या एका हाॅटेलमध्ये गेलो, हाॅटेल सह्याद्री त्याचं नाव. तिथे पोहे चहा घेऊन अंधारातच साडे तीनला चालायला सुरवात केली. पायथ्यापासून दिसणारी डोंगरावरची दिव्यांची रांग पाहून असं वाटलं होतं की तेवढंच चढायचं आहे, पण नंतर लक्षात आलं की तो पूर्ण डोंगराचा अगदी छोटासा टप्पा आहे. ओबडधोबड पायर्या होत्या, काहीची उंची फुटापेक्षा जास्त होती. बारीक बारीक दगडगोट्यांवरून पाय घसरत होते. मी तीन चार वेळा सह्याद्रीला लोटांगण घातलं. अफाट दम लागत होता. स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. पण महाराष्ट्राच्या सर्वोच्य ठिकाणी पोहचायचे आहे या जिद्दीने फक्त एकएक पावलावर लक्ष देऊन मार्गक्रमणा चालू होती. समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंच असलेल्या कळसूबाई शिखराचं वैशिष्ठ म्हणजे अगदी टोकाला पोहचल्याशिवाय खालून कुठूनही तिथला पिकपाॅईंट, कळसूबाईचं मंदिर दिसत नाही. आता बर्याच ठिकाणी रेलिंग बसवली आहेत. एकुण चार ठिकाणी लोखंडी शिड्या उभारल्या आहेत. त्यामुळे चढाई बरीच सोपी झाली आहे. पण इतक्या उंचीवर देवळाचे बांधकाम कसे केले असेल, पूर्वी लोकं देवीच्या दर्शनाला कशी जात असतील याचं आश्चर्य वाटतं.डोंगराच्या पायथ्याशी असणार्या गावात शुभकार्याची सुरवात देवीच्या दर्शनाने होते. त्यामुळे स्थानिक लोकांची तिथे बर्यापैकी ये जा असते. चालत असताना वर एक टप्पा दिसायचा आणि वाटायचे की तिथेपर्यंत पोहोचलो की झाले. पण तिथे पोहोचलो की कळायचे की अजून वर चढायचे आहे. असे भ्रमनिरास दूर करत एकएक टप्पा पूर्ण करत शेवटी त्या सर्वोच्य ठिकाणावर पोहोचलो. सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मी मनातल्या मनात गाऊ लागले “आज मैं उपर,महाराष्ट्र नीचे”. महाराष्ट्राच्या सर्वात उंच ठिकाणी पोहचल्याचा आनंद, तिथून चारी बाजूने खाली दिसणारे विहंगम दृष्य याचे वर्णन मला पामराला अशक्यच आहे. थोड्यावेळाने खाली उतरायला सुरुवात केली. चढण्यापेक्षाही उतरणे अवघड असणार याची कल्पना होती, आणि तसेच झाले.काही ठिकाणी तर बसून उतरावे लागले. उन्हाचे चटके बसत होते. लोखंडी शिड्या व रेलिंग तापले होते, पण त्यांचे चटके सहन करणे अनिवार्य होते. माझा थकला भागला जीव शेवटी हाॅटेल सह्याद्री पर्यंत पोहोचला. तांदळाची भाकरी, पिठंल, वांग बटाट्याची भाजी, मिरचीचा ठेचा, वरण भात असा फक्कड बेत होता. जेवण खरंच चवदार होते. त्या हाॅटेलचे मालक तानाजी खाडे दादांनी कळसूबाई देवीची माहिती सांगितली. छानच बोलले ते. तृप्त मनाने, अभिमानाने परतीचा प्रवास सुरू झाला. आॅगस्ट महिन्यात परत तुला भेटायला रायगडावर येईन असे सह्याद्रीसमोर नतमस्तक होऊन वचन दिले. परतीचा प्रवास जोरदार अंताक्षरीने अगदी मजेचा झाला.गंमत म्हणजे ११ जून म्हणजे किरण ईशानच्या लग्नाचा वाढदिवस. पुण्यात आल्यापासून मी इथे आहे तर तुम्ही दोघे ११ जूनला कुठेतरी बाहेर जा असे मी म्हणत होते, पण झाले उलटेच. अचानक ध्यानीमनी नसताना माझेच ट्रेकला जायचे ठरले. अर्थात याचे श्रेय नक्की मिनीचेच. ११ जूनला श्रीराम ट्रेकर्स या ग्रुपतर्फे केलेला हा ट्रेक म्हणजे किरण ईशानला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाठी मी दिलेली गिफ्ट आहे असे मला वाटते.
“भव्य हिमालय तुमचा आमचा,केवळ माझा सह्यकडा”
© कांचन कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈