सौ राधिका भांडारकर

☆ “या जन्मावर शतदा प्रेम करावे…” ☆ सौ राधिका भांडारकर 

या जन्मावर शतदा प्रेम करावे.

सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की,  या विषयावर लेख लिहिताना माझी भूमिका उपदेश करण्याची नक्कीच नाही. हे करा, ते करा, असे करावे, असे वागावे, सकारात्मक काय, नकारात्मक काय असे काहीही मला सांगायचे नाही. कारण माझी पक्की खात्री आहे की जे लोक दुसऱ्याला सांगण्याचा किंवा उपदेश करण्याचा अधिकार गाजवतात, त्यांना एक श्रेष्ठत्वाची भावना असते आणि जी अहंकारात परावर्तित होते आणि तिथेच त्यांच्या आनंदी जगण्याची पहिली पायरीच कोसळते.

“या जन्मावर शतदा प्रेम करावे”  हा ही एक सल्लाच आहे खरंतर.  पण तो पाडगावकरांसारख्या महान कवीने अत्यंत नम्रपणे दिलेला आहे.  त्यांच्या श्रेष्ठत्वाला मान देऊन मी फक्त माझ्या जगून झालेल्या आयुष्यात मी खरोखरच जगण्यावर प्रेम केले का या प्रश्नाचे फक्त उत्तर शोधणार आहे.  आणि ते जर “हो” असेल तर कसे,आणि त्यामुळे मला नक्की काय मिळालं एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे.  बाकी तुमचं जीवन तुमचं जगणं यात मला ढवळाढवळ अजिबात करायची नाही.

जीवन एक रंगभूमी आहे, जीवन म्हणजे संघर्ष, जीवन म्हणजे ऊन सावली, खाच खळगे, चढ उतार, सुखदुःख,शंभर धागे, छाया प्रकाश असे खूप घासलेले, गुळगुळीत विचारही मला आपल्यासमोर मांडायचे नाहीत.  कारण मी एकच मानते जीवन हा एक अनुभव प्रवाह आहे. आणि तो प्रत्येकासाठी वेगळा असूच  शकतो.  त्यामुळे आता या क्षणी तरी मी कशी जगले, हरले की जिंकले, सुखी की दुःखी, निराश की आनंदी, माझ्या जगण्याला मी न्याय दिला का, मी कुणाशी कशी वागले, कोण माझ्याशी कसे वागले या साऱ्या प्रश्नांकडे मी फक्त डोळसपणे पाहणार आहे.  नव्हे, माझ्या आयुष्यरुपी पुस्तकातले  हे प्रश्न मी स्वतःच वाचणार आहे.

७५ वर्षे माझ्या जीवनाच्या इनबॉक्समध्ये कुणी एक अज्ञात सेंडर रोजच्या रोज मला  मेल्स पाठवत असतो. त्यातल्या मोजक्याच मेल्सकडे  माझं लक्ष जातं आणि बाकी साऱ्या जंक मेल्स मी अगदी नेटाने डिलीट करत असते.  आणि हे जाणत्या वयापासून आज या क्षणापर्यंत मी नित्यनेमाने करत आहे.  आणि याच  माझ्या कृतीला मी “माझं जगणं” असं  नक्कीच म्हणू शकते.

मला माहित नाही मी आनंदी आहे का पण मी दुःखी नक्कीच नाही.  त्या अज्ञात सेंडरने मला नित्यनेमाने माझ्या खात्यातील शिल्लक कळवली, सावधानतेचे इशारे दिले, कधी खोट्या पुरस्कारांचे आमीष दाखवून अगदी ठळक अक्षरात अभिनंदन केले,  कधी दुःखद बातम्या कळवल्या, कधी सुखद धक्के दिले,  अनेक प्रलोभने  दाखवली, अनेक वाटांवरून मला घुमवून आणलं,  दमवलं, थकवलंही  आणि विश्रांतही केलं.  पण त्याने  पाठवलेली एकही मेल मी अनरेड ठेवली नाही.  कधी व्हायरसही आला आणि माझे इनबॉक्स क्रॅशही झाले. मी मात्र ते सतत फॉरमॅट करत राहिले.

CONGRATULATIONS! YOU HAVE WON!

हा आजचा  ताजा संदेश. या क्षणाचा.

पण हा क्षण आणि पन्नास वर्षांपूर्वीचा एक क्षण याचं कुठेतरी गंभीर नातं आहे याची आज मला जाणीव होत आहे.

पन्नास वर्षांपूर्वी मी एका भावनिक वादळात वाहून गेले होते.  एका अत्यंत तुटलेल्या, संवेदनशील अपयशामुळे खचून गेले होते.  माझा अहंकार दुखावला होता, माझी मानहानी झाली होती, मला रिजेक्टेड वाटत होतं.

घराचा जिना चढत असताना एक एक पायरी तुटत होती. दरवाजातच वडील उभे होते. त्यांची तेज:पूंज मूर्ती, आणि त्यांच्या  भावपूर्ण पाणीदार डोळ्यांना  मी डोळे भिडवले तेव्हा त्यांनी मूक पण जबरदस्त संदेश मला क्षणात दिला,

” धिस इज नॉट द एन्ड ऑफ लाईफ.  खूप आयुष्य बाकी आहे. बघ, जमल्यास त्या “बाकी” वर प्रेम कर आपोआपच तुला पर्याय सापडतील.”

वडील आता नाहीत पण ती नजर मी माझ्या मनात आजपर्यंत सांभाळलेली आहे.  आणि त्या नजरेतल्या प्रकाशाने माझे भविष्यातले सगळे अंधार उजळवले. तेव्हांपासून  मी जीवनाला एक आवाहन समजले.  कधीच माघार घेतली नाही.  क्षणाक्षणावर प्रेम केले. फुलेही वेचली आणि काटेही वेचले. कधीच  तक्रार केली नाही.

महान कवी पर्सी  शेले म्हणतो

We look before and after,

And pine for what is not:

Our sincerest laughter

With some pain is fraught;

Our sweetest songs are those that tell of saddest thought.

शालेय जीवनात पाठ्यपुस्तकातील काळे सरांनी शिकवलेली ही कविता हृदयाच्या कप्प्यात चिकटून बसली आहे.  तेव्हां  एवढाच अर्थ कळला होता की,

“आपण मागे आणि पुढे बघतो आणि नसणाऱ्या,न मिळालेल्या  गोष्टींवर दुःख करतो आणि या दुःखी भावनेवर आपण आपलं सारं हास्यच उधळून लावतो.  मग आपले जीवन गाणे  हे फक्त एक रडगाणे  होते.

जगत असताना, पर्सी शेलेच्या  या सुंदर काव्यरचनेतला एक दडलेला उपहासात्मक अर्थ आहे ना,  त्याचा मागोवा घेतला आणि नकळतच कसे जगावे, जगणे एक मधुर गाणे कसे करावे याची एक सहज आणि महान शिकवण मिळाली. लिव्ह अँड लेट लिव्ह हे आपोआपच मुरत गेलं. 

चार्ली चॅपलीन हे माझं दैवत आहे.  तो तर माझ्याशी रोजच बोलतो जणू! मी थोडी जरी निराश असले तर म्हणतो,” हसा! हसा! भरपूर  आणि खरे हसा. दुःखांशी मैत्री करा,त्यांच्यासमवेत  खेळायला शिका.”

एकदा सांगत होता,” मी पावसात चालत राहतो म्हणजे माझ्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसत नाहीत.”

“अगं! मलाही आयुष्यात खूप समस्या आहेत पण माझ्या ओठांना त्यांची ओळखच नाही ते मात्र सतत हसत असतात.”

गेली ७५ वर्ष मी या आणि अशा अनेक प्रज्वलित पणत्या माझ्या जीवनाच्या उंबरठ्यावर तेवत ठेवल्या आहेत ज्यांनी माझं जगणं तर उजळलं पण मरणाचीही  भिती दूर केली.

परवा माझी लेक  मला साता समुद्रा पलीकडून चक्क रागवत होती.

“मम्मी तुझ्या मेल मध्ये फ्रेंड चे स्पेलिंग चुकले आहे. तू नेहमी ई आय एन डी का लिहितेस? इट इज  एफ आर आय  ई एन् डी.”

ज्या मुलीला मी हाताचे बोट धरून शिकवले ती आज माझ्या चुका काढते चक्क! पण आनंद आहे,  मी तिला,  “टायपिंग मिस्टेक”  असं न म्हणता म्हटलं,

“मॅडम! मला तुमच्याकडून अजून खूपच शिकायचे आहे. तुम्ही नव्या तंत्र युगाचे,आजचे  नवे शिल्पकार.  त्या बाबतीत मी तर पामर, निरक्षर.”

तेव्हा ती खळखळून हसली.  तिच्या चेहऱ्यावरचा हा दोन पिढ्यांमधला अंतर संपवून टाकणारा आनंद मला फारच भावला. 

तेव्हा हे असं आहे.  तुम्ही असं जगून पहा, शंभर वेळा प्रेम करा जीवनावर.

सॉरी!  असा उपदेश मी तुम्हाला करणार नाही कारण मला तो अधिकारच नाही.  मी फक्त माझा अनुभव सांगितला बाकी मर्जी तुमची.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments