डॉ. वि. दा. वासमकर

अल्प परिचय 

शिक्षण : एम. ए. पीएच. डी.

अध्यापन : विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथून मराठीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त.

अभ्यासक्षेत्र : साहित्य व समीक्षा

ग्रंथ : (१) संदर्भ : आयुष्याचे (कविता) अनघा प्रकाशन , ठाणे १९८६. (२) दत्तांकुराची कविता (संपादन) मंजुळ प्रकाशन, पुणे २०१३. (३) मराठीतील कलावादी समीक्षा (समीक्षा) अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर २०१९, (४) उद्ध्वस्त नभाचे गाणे (कविता) अक्षरदीप प्रकाशन कोल्हापूर २०१९.

‘मराठीतील कलावादी समीक्षा ‘ या ग्रंथाला १) म. सा. प. पुणे,२) द. म. सा. कोल्हापूर, ३) आपटे वाचन मंदिर इचलकरंजी यांचे पुरस्कार.

विविध नियतकालिकांतून समीक्षात्मक लेखन.

☆ “वाढती लोकसंख्या आणि मराठी साहित्य…भाग-1” ☆ श्री वि. दा.वासमकर 

वाढती लोकसंख्या ही आज जगासमोरील सर्वात गंभीर समस्या आहे. मात्र जगातील लोकसंख्यावाढीची समस्या सर्वच राष्ट्रांना भेडसावत नाही. कारण  संयुक्त संस्थाने, रशिया, इंग्लंड, कॅनडा अशा प्रगत राष्ट्रांमध्ये लोकसंख्या खूपच कमी आहे. तर आफ्रिका खंडातील देश, तसेच भारत आणि चीनसह सर्व दक्षिण आशियाई  राष्ट्रांची लोकसंख्या भरमसाठ आहे. प्रगत राष्ट्रांची लोकसंख्या कमी तर आहेच; शिवाय या देशांना निसर्गाने प्रचंड साधन संपत्ती उपलब्ध करून दिली आहे.  त्यामुळे या देशांमध्ये लोकसंख्यावाढीची समस्या तितकी गंभीर नाही. मात्र अविकसित देशांच्या वाट्याला साधनसंपत्ती फारच कमी आली आहे. त्यामुळे या देशांना लोकसंख्यावाढीमुळे निर्माण होत असलेल्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत आतापर्यंत जगात दोन नंबरला होता. मात्र अलीकडेच चीनला मागे टाकून आता भारत पहिल्या नंबरला आला आहे. पहिला क्रमांक मिळणे हे इतर क्षेत्रात भूषणावह असते. मात्र लोकसंख्येच्या क्षेत्रात ते लाजिरवाणे आहे, असे म्हणावे लागते.  लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न विसाव्या शतकापासून गांभीर्याने सुरू झाला असे दिसते.

भारतातील लोकसंख्यावाढीची कारणे पाहिली असता असे दिसते की, भारतीय समाजामध्ये असलेले अज्ञान, अंधश्रद्धा, रुढी आणि परंपरा यांच्याबरोबरच असाक्षरता ही कारणे महत्त्वाची आहेत. आजही भारतातील बहुतेक लोक निरक्षर आहेत. त्यामुळे अज्ञानापोटी ‘मुलांचा जन्म म्हणजे ईश्वरी देणगी’ असते, अशी समजूत ग्रामीण भागात बहुतांश रूढ आहे. अज्ञान व अंधश्रद्धेमुळे अजूनही ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी अनेक मुले जन्माला घातली जातात. कायद्याचा वचक असतानासुद्धा बालविवाह लावले जातात. पुत्रप्राप्तीच्या हव्यासापोटी मुलाच्या जन्मास महत्त्व दिले जाते. त्यामुळे अनेक मुलींच्या नंतरही मुलासाठी प्रयत्न केला जातो. बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. लोकसंख्यावाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई होते. झोपडपट्ट्यांचा प्रश्न निर्माण होतो. बेकारीची समस्या उद्भवते. त्यामुळे पर्यायाने गुन्हेगारीप्रवृत्तीही वाढू लागते. लोकसंख्यावाढीचा परिणाम आरोग्यावरही होत असतो. लोकसंख्या वाढीचे सकारात्मक परिणामही होत असतात. पण ते कमी प्रमाणात असतात.

लोकसंख्यावाढीचे स्वरूप लक्षात घेऊन त्यावर काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे; अशा स्वरूपाच्या विचारांना भारतात स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या उत्तरार्धापासून कुटुंब नियोजन कार्यक्रम हाती घेतला आहे परंतु अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा इत्यादी गोष्टींनी ग्रासलेल्या  समाजात कुटुंब नियोजन ही कल्पना सुरुवातीस रुजविणे अत्यंत कठीण गेले असे दिसते गेली 50-60 वर्षे भारतातील शासकीय यंत्रणा व समाजातील स्वयंसेवी संस्था कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात थोडेफार यशही आले आहे. मात्र अजूनही या प्रयत्नांना वेग येणे आवश्यक आहे. या कार्यक्रमास, या प्रयत्नास समाजाने योग्य ते सहकार्य दिल्यास लोकसंख्या वाढीवर निर्बंध घालता येणे सहज शक्य आहे. लोकसंख्यावाढीच्या समस्येवर निर्बंध घालण्यासाठी शिक्षण क्षेत्र, विविध कला, साहित्य यांच्या माध्यमातून प्रबोधन होणे आवश्यक आहे. लोकसंख्या समस्येवर निर्बंध घालण्यासाठी शिक्षण क्षेत्राचा उपयोग केला जातो. कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. शिक्षणामुळे समाजातील वाईट रूढी, अज्ञान व अंधश्रद्धा काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षणामुळे समाजातील लोकांना जशा चांगल्या सवयी लावता येतात; त्याप्रमाणेच समाजातील वाईट सवयी काढूनही टाकता येतात. त्यामुळे ही नवीन जबाबदारी शिक्षणक्षेत्रावर येऊन पडते. शिक्षणाबरोबरच साहित्यादी कला यांच्याद्वारेही समाजावर संस्कार करता येतो. कविता, नाटक, शाहिरीकाव्य तसेच कथा-कादंबऱ्या याद्वारेही समाजमनाला आवाहन करता येते. साहित्याच्या वाचनाने वाचकावर संस्कार होत असतो. मराठी साहित्याच्या इतिहासात आजपर्यंत अनेक साहित्यकृतींनी यामध्ये आपला आपले योगदान दिले आहे त्याचा येथे थोडक्यात विचार करू.

साहित्यात वास्तव जीवनाचे प्रतिबिंब पडत असते. कधी ते प्रत्यक्ष रीतीने पडते. तर कधी  अप्रत्यक्षरीत्या.  येथे लोकसंख्यावाढीचे चित्रण साहित्यात अप्रत्यक्षरीत्या कसे होते हे आधी पाहू. आणि त्यानंतर लोकसंख्यावाढीचा प्रत्यक्ष परिणाम कोणत्या मराठी साहित्यकृतीत चित्रित झाला आहे ते पाहू. हरिभाऊ आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ ही मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी. ही कादंबरी 1891 ते 1893 या कालावधीत ‘करमणूक’ या साप्ताहिकात क्रमशः प्रसिद्ध होत होती. या कादंबरीत उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाचे चित्रण आले आहे. या काळातील ब्राह्मण समाज अनेक वाईट रूढींनी ग्रासलेला होता. स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता. बालाजरठ विवाहाच्या पद्धतीमुळे स्त्रिया लहानपणीच विधवा होत. लहान वयात लग्न केल्यामुळे स्त्रियांना अनेक बाळंतपणे सोसावी लागत. त्यामुळे अनेक मुलांना आणि मातांना अकाली मृत्यू येत असे. यांचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आले आहे. हे सर्व लोकसंख्यावाढीचे अप्रत्यक्ष परिणाम म्हणून सांगता येतील. लोकसंख्या वाढीमुळे बेकारीची समस्या ही तीव्र स्वरूप धारण करत असते, याचे चित्रण ह.मो. मराठे यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या लघु कादंबरीमध्ये प्रत्ययकारी रीतीने आलेले आहे. ज्योती म्हापसेकर यांच्या ‘मुलगी झाली हो’ या नाटकात  अप्रत्यक्षपणे याच समस्येचे प्रतिबिंब पडले आहे, असे म्हणता येईल. बाबुराव बागुल यांचा ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह जर बारकाईने वाचला, तर त्यातील अनेक कथांमध्ये प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम चित्रित झाले आहेत, असे दिसेल. या संग्रहातील ‘लुटालूट’ आणि ‘मैदानातील माणसे’ यांसारख्या कथांतून दारिद्र्याचे अंगावर शहारे आणणारे वर्णन बागुल यांनी केले आहे. ‘लुटालूट’ या कथेत वेश्या वस्तीतील स्त्रियांचे अत्यंत खालच्या पातळीवरचे जगणे आले आहे. आणि ‘मैदानातील माणसे’ मधील मैदानात थंडीच्या  रात्री असंख्य माणसांचा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी चालेला संघर्ष  हे  लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामाचे चित्रण म्हणावे लागते. अशा रीतीने लोकसंख्यावाढीचा अप्रत्यक्ष परिणामाचे चित्रण यांसारख्या साहित्यकृतीतून केले जाते, असे म्हणता येईल. आता लोकसंख्या वाढीचे प्रत्यक्ष परिणाम चित्रित करणाऱ्या काही साहित्यकृतींचा विचार करू.

लोकसंख्या वाढीचा परिणाम दर्शवणारी प्राचीन साहित्यकृती म्हणजे समर्थ रामदास स्वामींची ‘लेकुरे उदंड झाली’ या रचनेचा उल्लेख करता येईल. रामदास स्वामींच्या ‘दासबोध’ या ग्रंथामध्ये तिसऱ्या दशकातील चौथ्या आणि पाचव्या समासामध्ये  लोकसंख्या वाढीच्या परिणामाचा आशय आला आहे. समर्थ म्हणतात-

लेकुरे उदंड जाली /तो ते लक्ष्मी निघून गेली /

बापडी भिकेस लागली / खावया अन्न मिळेना

या संपूर्ण रचनेचे सार थोडक्यात असे सांगता येईल – घरामध्ये मुले पुष्कळ झाली तर त्या घराची लक्ष्मी निघून जाते. ही मुले मग भिकेस लागतात. त्यांना खायला अन्न मिळत नाही. या मुलांपैकी एक खेळत असते; एक रांगत असते; तर एक पोटामध्ये असते. अशा तऱ्हेने घरभर मुलांची आणि मुलींची दाटी होते. त्यामुळे दिवसेंदिवस खर्च वाढतो. येणारे उत्पन्न बंद होते. मुली उपवर झाल्यावर त्यांना उजवण्यासाठी द्रव्य राहत नाही. आई-बाप श्रीमंत असले, तरी ह्या उदंड लेकरांमुळे त्यांना दारिद्र्य येत राहते.समाजातील प्रतिष्ठा आणि मान निघून जातो. खाणारी तोंडे वाढल्यामुळे बापाला चिंता लागून राहते. त्याचा उद्वेग वाढतो. मुली उपवर झाल्या की त्यांचे आणि मुले मोठी झाली की त्यांचे लग्न करावे लागते. मुले – मुली तशाच राहिल्या तर पुन्हा लोक लाज काढतात. लोकांकडून  छीथू होते. आणि घरातील कर्त्या पुरुषाचे नाव जाते. म्हणून लग्नासाठी कर्ज काढावे लागते. त्यासाठीसुद्धा समाजात पत राहत नाही. मग घरातील पाडा-रेडा विकून ऋण घेऊन मुलाबाळांची लग्न करावी लागतात. परंतु असे घेतलेले ऋण फेडायचे कसे आहे हा प्रश्न पडतो. मग सावकार वेठीस धरतो आणि मग अशा कर्त्या पुरुषाला गाव सोडून  काम धंदा मिळवण्यासाठी परदेशात जावे लागते. हे सर्व अनर्थ घरामध्ये उदंड लेकरे झाल्यानंतर होतात, असे रामदास स्वामी म्हणतात. आणि शेवटी या कर्त्या पुरुषावर रडायची पाळी येते, असे वर्णन करून शेवटी रामदास स्वामी म्हणतात, –

अरण्य रुदन करिता /कोणी नाही बुझाविता /

मग होय विचारता /आपुले मनी /

आता कासया रडावे /प्राप्त होते ते भोगावे /

ऐसे बोलुनीया जीवे /धारिष्ट केले /

सारांश सतराव्या शतकामध्ये रामदास स्वामींनी घरामध्ये पोरवडा वाढविण्याचे दुष्परिणाम अत्यंत परखडपणे वर्णन केले आहेत.

क्रमशः… 

© श्री वि. दा.वासमकर 

विश्रामबाग सांगली 416 415, मोबा. 98 222 66 235.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments