डॉ. वि. दा. वासमकर
☆ “वाढती लोकसंख्या आणि मराठी साहित्य…भाग-2” ☆ श्री वि. दा.वासमकर ☆
(सारांश सतराव्या शतकामध्ये रामदास स्वामींनी घरामध्ये पोरवडा वाढविण्याचे दुष्परिणाम अत्यंत परखडपणे वर्णन केले आहेत.)
आता ग. दि. माडगूळकरांची ‘आकाशाची फळे’ या कादंबरीचा विचार करूया. ग. दि. माडगूळकर हे मराठी साहित्यविश्वाला गीतकार, पटकथाकार, आणि ‘गीतरामायण’ या अजरामर काव्यग्रंथाचे निर्माते म्हणून परिचित आहेत. किंबहुना ‘गीतरामायणा’च्या निर्मितीने त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून समाजात आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांची ‘आकाशाची फळे’ ही कादंबरी त्यांच्या पद्य साहित्याइतकीच महत्त्वाची आहे या कादंबरीचा आशय लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम वर्णन करणारा आहे. ही कादंबरी 1960 मध्ये प्रकाशित झाली. आणि 1961 मध्ये या कादंबरीचे महत्त्व जाणून प्रपंच हा सिनेमा मराठी मध्ये निघाला आणि तो महाराष्ट्र सरकारने गावोगावी मोफत दाखविला.
आता या कादंबरीचा आशय थोडक्यात पाहू. विठोबा कुंभार व पारू यांच्या कौटुंबिक जीवनाची ही कथा आहे. त्यांचा दरिद्री फटका संसार आणि सहा मुले यामुळे विठोबा कर्जबाजारी झाला आहे. आणि त्यातूनच तो आत्महत्या करतो. शहरात बरीच वर्षे राहिलेला आणि कुंभारव्यवसायाचे आधुनिक शिक्षण घेतलेला विठोबाचा भाऊ शंकर याच्यावर त्याच्या भावाच्या म्हणजे विठोबाच्या कुटुंबाची जबाबदारी येते. भावाच्या कुटुंबाला सुखी करण्यासाठी आपण लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा तो करतो. त्यासाठी प्रचंड कष्ट उपसतो. आणि आजारी पडतो. आपल्या दिराने आपल्या सुखाचा त्याग करून आपल्या कुटुंबासाठी झिजणे हे सहन न होऊन आपल्या आजारी दिराला म्हणजे शंकरला चंपाच्या हवाली करून पारू मुलांसह दूर निघून जाते. शेवटी शंकर आणि चंपाच्या लग्नासाठी ती परत येते. इत्यादी घटना प्रसंग या कादंबरीत येतात. या कादंबरीत इतरही उपकथानके येतात आहेत. चंपा आणि तिचे वडील रामू तेली यांचे कुटुंब रामू तेल्याच्या पिठाच्या गिरणीचा आणि तेलाच्या घाण्याचा व्यवसाय आहे. तेलाच्या व्यवसायामुळे त्याचे कुंभार हे आडनाव मागे पडून तो रामू तेली म्हणूनच ओळखला जातो. आपल्या मुलीला म्हणजे चंपाला त्याने मुलासारखेच वाढवलेले असते. चंपाला शंकरबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे. मात्र शंकर आपल्या भावाच्या कुटुंबासाठी लग्न करायला तयार नसतो. त्यामुळे चंपा आणि रामू तेली दोघेही कष्टी होतात. गावात जगू शिंपी आणि त्याची बायको राधा यांचे कुटुंब आहे. या दांपत्याला अपत्यहीनतेचे दुःख जाळीत असते. त्यांच्या जीवनात बाकेबिहारी या ढोंगी साधूचा प्रवेश होऊन राधा या ढोंगी साधूबरोबर पळून जाते. जगु शिंप्याला एकट्यानेच भयानक आयुष्य जगावे लागते. शंकरचा बालमित्र रघू आणि त्याची बायको सरू यांचा दारिद्री संसार हे आणखी एक छोटे उपकथानक या कादंबरीत येते. वडगावच्या बाजारातील जोशी काका, गफूर भाई हे विठोबाच्या व्यवसायातील सहकारी. यातील जोशी काकांचे मोठे कर्ज विठोबाने घेतले असून ते त्याला फेडणे अशक्य झाल्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. या सर्वांच्या जोडीला शंकर आणि चंपा यांची अव्यक्त स्वरूपातील प्रेमकहाणी या कादंबरीत महत्त्वाची जागा व्यापते. मात्र कादंबरीचे शीर्षक ‘आकाशाची फळे’ हेच या कादंबरीचे सर्वात महत्त्वाचे आशयसूत्र आहे. विठोबा आणि पारूची जोडी प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. त्या काळात 1960 च्या दरम्यान शिक्षणाचा प्रसार तितका झालेला नसल्यामुळे कुटुंब नियोजनाच्या बाबतीत भारतीय समाज अजून बराच मागासलेला होता. कुटुंबात वाढणारी मुलांची संख्या दारिद्र्याला कारणीभूत होते, हेच सामान्य माणसाला कळत नव्हते. उलट मुले म्हणजे देवाची देणगी, या देणगीला नकार देणे म्हणजे दैवाच्या विरोधी जाणे असा समज सार्वत्रिक होता. शिवाय देवाने जन्म दिलाय म्हणजे त्याच्या अन्नाची योजनासुद्धा देवाने केलेली असतेच. इत्यादी गैरसमज रूढ असल्यामुळे गरीब दरिद्री कुटुंबाला अपत्यांची वाढ हानिकारक असते हे समाजमनाला कळत नव्हते. याचेच प्रातिनिधिक चित्रण ग. दि. माडगूळकर यांनी या कादंबरीत विठोबा कुंभार आणि त्यांच्या कुटुंबाच्या द्वारे केले आहे.
आता या कादंबरीतील काही विधाने पाहू. घरात पोरांचं लेंडर झाल्यामुळे सगळ्यांना एखादी गोष्ट वाटायची म्हटले तर ते अवघड होते. विठोबाची पोर सहा. त्यांना एखादी खायची गोष्ट मिळाली तर ती त्याच्यावर कशी तुटून पडतात, याचे वर्णन माडगूळकरांनी अत्यंत प्रत्ययकारी रीतीने केले आहे. ते असे – ‘गोविंदाने नारळ पाट्यावर आपटला… त्याची दोन छोटी भकले इकडे तिकडे उडाली. ती उचलण्यासाठी गोप्या आणि सद्या यांची झोंबाझोंबी झाली. दोघांच्याही हाती एकेक तुकडा आला. ते तुकडे दातांनी खरवडत आणिकासाठी ती गोविंदाच्या पाठीमागे येऊन उभी राहिली. दरम्यान गोविंदाने एक मोठा खोबळा करवंटीपासून वेगळा केला. तो दातात धरला आणि दुसरे भकल तो कंगोरा गवसून पाट्यावर आपटत राहिला. म्हातारी नुसतीच ओठाची चाळवाचाळव करीत होती. तिच्या हाती काहीच आले नव्हते. गोविंदाने उरलेले खोबरे करवंटीपासून मोकळे केले न केले तोवर उरलेली दोघे त्याच्यावर तुटून पडली. बघता बघता नारळातील खोबरे वाटले गेले. आणि नरट्या इतस्ततः झाल्या. लटलट मान हलवीत म्हातारी म्हणाली, ‘मला रे गोविंदा-‘ माडगूळकरांच्या या निवेदनातून घरात पोरवडा असला की, कशी दुरवस्था होते, याचा प्रत्यय येतो.
देवळातील हरदासाने कृष्णाष्टमीचा प्रसाद म्हणून पारूच्या ओटीत नारळ घातला. बाळकृष्णाच्या पाळण्यातील नारळ पारूच्या ओटीत आला म्हटल्यावर विठोबाच्या आजीला आनंद होतो. ती म्हणते औंदाच्या सालीबी एक परतवंडं होणार मला. आणि विठोबाचा थंडपणा पाहून ती पुढे म्हणते- असं कसं बाबा देवाची देणगी असती ती. बामनवाड्यातली शिंपीन बघ नागव्याने पिंपळाला फेऱ्या घालते. तिचा कुसवा उजवला का? कुत्री मांजर पाळती ती अन् लेकुरवाळेपनाची हौस भागून घेती ! तुज्यावर दया हाय भगवानाची .
विठोबाच्या आजीच्या तोंडात आणखीही काही विधाने माडगूळकरांनी घातली आहेत. ती अशी- १) ज्यानं चोंच दिली, त्यो चारा देईल ; २) असं म्हणू नये इटूबा. देवाघरचा पानमळा असतोय ह्यो. ३) जे जे प्वार जन्माला येतं ते आपला शेर संगती आनतं. आंब्याच्या झाडाला मोहर किती लागला हे कुणी मापतं का?; पाऊस दर साल येतो पर कुणब्याला त्याचं कौतुक असतंच का नाही !;
विठोबाच्या आजीच्या या विधानांतून मुले ही देवाची देणगी असते. त्याला नाही म्हणता येत नाही; अशी समजूत व्यक्त होते.
ग दि माडगूळकर यांनी या कादंबरीच्या शेवट करताना या कादंबरीतील एक पात्र नारायण गिरी याच्या तोंडी एक अभंग लिहिला आहे. तो असा-
हाती नाही बळ दारी नाही आड/त्याने फुल झाड लावू नये/
सोसता सोसेना संसाराचा ताप /
त्याने मायबाप होऊ नये /
गव्हार तो वागे जाणिवेवेगळा/ / आकाशाच्या फळा नर्की टाकी / चाऱ्याविण चोच, नको नारायणा )
वेडा वा शहाणा, म्हण काही….
सारांश समर्थ रामदास आणि ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या साहित्यकृतीतून लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम स्पष्ट शब्दांत वर्णिले आहेत. साहित्य या कलेत समाजमनावर परिणाम करण्याची प्रभावी शक्ती असते. या शक्तीने आपल्या देशातील जनता सुबुद्ध होऊन हा लोकसंख्यावाढीचा भस्मासुर जाळून टाकतील अशी आशा करूया !
– समाप्त –
© श्री वि. दा.वासमकर
विश्रामबाग सांगली 416 415, मोबा. 98 222 66 235.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈