सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – पाऊस…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

पाऊस सगळीकडे सारखाच पडतो.. बालपणात कोसळणाऱ्या पाऊस धारा कागदी होडी करून अंगणातल्या पाण्यात सोडणारा हा पाऊस, कसलीच कोणतीच तमा न बाळगणारा चिंब भिजून आनंदाने उड्या मारणारा हा पाऊस.. नकळत आपलं बालपण डोळ्यासमोर आणतो.. . आपलं लेकरू पावसात भिजून आजारी पडेल म्हणून काळजी करणाऱ्या आई कडे दुर्लक्ष करून हे बालिश बालपण ये आई मला पावसात जाऊदे! एकदाच ग  भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे .. म्हणत पावसाचा आनंद घेत उड्या मारत राहतं.. पावसात चिंब भिजून कुडकुडत आईच्या पदराची  ऊब मिळताच मात्र समाधानाने आईच्या कुशीत शिरतो तो अल्लड बालिश पाऊस.. . आईचा लाडिक ओरडा आणि सोबत मायेने भरलेला उन उन दुधाचा पेला पिवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पावसात भिजण्याची स्वप्न बघत मायेच्या कुशीत शिरणारा बालिश पाऊस वेगळ्याच दुनियेची सफर घडवतो.. . कॉलेज च्या खिडकीतून कोसळणाऱ्या पाऊस धारा पाहून नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली तरुण पोरं पोरी प्यार हुवा इकरार हुआ म्हणत एकच छत्रीत आपल्या प्रियकर/ प्रेयसी सोबत नव जीवनाची स्वप्न पाहणारा हा पाऊस रोमँटिक होऊन जातो.. गुलाबी प्रेमाची बरसात करणाऱ्या ह्या पावसाच्या सरी मोगऱ्याचा गंध घेऊन येतात.. नुकतीच लग्न बंधनात बांधली गेलेली जोडपी त्यांच्यासाठी हा पाऊस वेगळचं गोड स्वप्न घेऊन येतो.. खिडकीतून बरसणाऱ्या जलधारा पाहताना आपल्या सख्याची वाट बघणारा स्वप्नाळू पाऊस, दमून भागून आलेला आपल्या सख्याची एक प्रेम भरली नजर पडताच ह्या प्रेम सरीत चिंब भिजून जाते.. पाऊस किती स्वप्न, किती नव्या आशा घेऊन येतो.. हाच पाऊस म्हातारपणात मात्र जून्या आठवणींना उजाळा देत कानटोपी आणि शाल शोधत बसतो.. पावसाची चाहूल लागताच छत्री, रेनकोट यांची तजवीज करू पाहणारा पाऊस आपलं वय वाढलंय ह्याची जाणीव करून देतो.. शेतकरी राजासाठी तर पाऊस म्हणजे निसर्गाचं वरदान च जणू.. पावसाच्या प्रतिक्षेत काळ्या मातीची मशागत करू लागतो.. पावसाची पहिली सर कोसळताच पेरणीसाठी लगबग करवणारा हा पाऊस.. नवीन आशा, नवीन स्वप्नं घेऊन येतो.. कधी ह्याचं रौद्र रूप अनेकांना रडवतं, अनेक संसार उध्वस्त करतं, कधी  किती तरी सप्नांची राखरांगोळी होते.. मृत्यूचा खेळ असा काही रंगतो की अश्रुंच्या सरी वर सरी बरसु लागतात.. पाऊस काय किंवा नैसर्गिक कोणतीही आपत्ती काय? ह्या सगळ्या आपत्तीसाठी कुठे तरी आपण मनुष्य च कारणीभूत आहे हे मात्र सोयीस्कररीत्या विसरतो.. पावसाळा आला की अनेक पर्यावरणप्रेमी मंडळी वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम घेतात.. एकदा झाडं लावून फोटो काढले आणि स्टेटस ठेवलं की मग वर्षभर मोकळे.. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच.. बाकी काहीही असलं तरी पाऊस आणि माणसाचं नातं मात्र अबाधित राहत.. काही वेळा कडू आठवणींसोबत तर बऱ्याच वेळा गोड, गुलाबी आठवणींची बरसात करणारा हा पाऊस आयुष्य जगण्यासाठी नवी प्रेरणा घेऊन येतो हे मात्र नक्की..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments