श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “शब्द… आणि… हुंकार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
शब्दांचा आधार घेतल्याशिवाय आपण मनातल काहीच व्यक्त करु शकत नाही. मनातल्या भावना पोहोचवण्याच प्रभावी माध्यम म्हणजे शब्द आणि हुंकार. आपल्या चेहऱ्यावर काही भाव दिसतात. पण भावनांना प्रकट करतात ते शब्द. म्हणूनच शब्दातून प्रेम, राग, तिरस्कार, अभिमान, कौतुक सगळ व्यक्त होत. *शब्दात धार आहे. शब्दात मार आहे. शब्दात प्रेमाचा सार देखील आहे. शब्द कठोर आहेत तसेच मवाळ, व मधाळ सुध्दा आहेत.
शब्दात प्रार्थना, याचना, मागणं आहे, स्तुती, गौरव, क्षमा आहे. त्यात विश्वास, आधार आहे. आपलेपणा, परकेपणा आहे. उदारता आहे, स्वार्थीपणा सुद्धा आहे.*
एकदा शब्द दिला म्हणजे दिला असे म्हटले की यात ठाम विश्वास असतो. तर….. तर त्याच्या शब्दांवर भरवसा नाही.…. असं म्हटलं की अविश्वास. आपल वागण हिच आपल्या शब्दांची किंमत असते.
खूप आनंद झाला की बोलायला शब्द सुचत नाही. तर कठीण प्रसंगी शब्द फुटत नाहीत. काही वेळा म्हणतो, शब्दात कस सांगू तेच कळत नाही. किंवा सांगायला शब्द अपुरे आहेत.
शाहण्याला शब्दांचा मार असेही म्हणतात. माणूस नि:शब्द झाला की सुचेनासे होते, किंवा सुचेनासे झाले की माणूस नि:शब्द होतो.
एकाच गोष्टीसाठी अनेक शब्द असले तरी त्या शब्दांना आपला एक अर्थ आणि त्यात एक भाव असतो. थोड सविस्तर सांगायच तर प्रवीण दवणे यांनी एका गीतामध्ये आभाळ आणि आकाश असे दोन्ही शब्द आले त्या बद्दल विचारलेला किस्सा (बहुतेक शांताबाई शेळके यांनी लिहिलेले गीत आहे.) त्यावर मिळालेल उत्तर निरभ्र असते ते आकाश. भरुन येत ते आभाळ. यावर पुढे असं सुद्धा म्हणता येईल की बरसात ते मेघ. असे समर्पक अर्थ शब्दात आहेत.
हुंकाराच ही तसच काहीसं आहे. बऱ्याचदा विचारलेल्या गोष्टींना आपण हुंकाराने उत्तर देतो किंवा आपल्या प्रश्नांना हुंकाराने उत्तर मिळत. अं…. हं….. अंह….. उं….. असे काही हुंकार परिस्थिती नुसार आपण काढतो, किंवा ते नकळत निघतात.
या हुंकारात सुध्दा ते आनंदाचे, नाराजीचे, सकारात्मक, नकारात्मक, आळसावलेले असे असतात. हुंकार कसा आहे हे त्याचा निघालेला आवाज आणि त्याची लय यावरून समजतो.
भावना पोहचवण्याच काम शब्द करतात. आणि आपण प्रेमाचे दोन शब्द ऐकायला आतुर असतो. शब्द तेच किंवा तसेच असतात. आपल्या भावना त्यात जाणीव निर्माण करतात.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈