सौ राधिका भांडारकर
☆ “लोकमान्य आणि गणेशोत्सव…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
गणेश स्थापनेमागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का?
गणेशस्थापने मागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का? या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही याच फूटपट्टीत अपेक्षित असावं. “हो” तर म्हणू शकतच नाही. उत्तर “नाही” हेच असले तरी नाही असे म्हणतानाही मनात अनेक विचार आणि प्रश्न वाहत राहतात. त्याबद्दल लिहिण्यापूर्वी आधी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाची उद्दिष्टे, हेतू काय होते, यावर बोलूया.
देश पारतंत्र्यात होता. ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे पिचलेला होता. समाज विस्कटलेला होता. अनेक जाती वंश, वर्ण, अंधश्रद्धा आज्ञान यामुळे समाज एकसंध नव्हता. ब्रिटिशांचेच लांगुलचालन करणारा एक भारतीय वर्गही होता. मात्र सामान्य जनांना, परकीय सत्तेचा जुलूम आणि अत्याचार याविरुद्ध एकत्र आणणे हे जरुरीचे आहे असा विचार जाज्वल्य देशाभिमानी आणि राष्ट्रवादी, स्वातंत्र्यप्रेमी लोकमान्य टिळकांच्या मनात सतत असे.
वास्तविक तेल्या तांबोळ्यांचा नेता म्हणूनही त्यांचा उपहास करण्यात आला होता. ब्रिटिशांच्या मते तर भारतीय असंतोषाचे ते जनकच होते. ब्रिटिशांशी सामना हा केवळ अर्ज विनंत्या करून होणार नाही हे जसे टिळकांनी जाणले होते तसेच लोक भावनेची ही नस त्यांनी ओळखली होती. जाती, उपजातीच्या जंजाळात अडकलेल्या जनतेला धार्मिक आवाहन केल्यास हेवेदावे विसरून, ही जनता एकत्र येऊ शकेल हे लोकमान्य टिळकांनी जाणले आणि त्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांना सुचली. म्हणजेच या गणेशोत्सवाची मूळ कल्पना स्वराज्यासाठी संघटन ही होती. आणि म्हणूनच घराघरातला गणेशोत्सव त्यांनी हमरस्त्यावर आणला. हा खाजगी उत्सव सार्वजनिक केला.
लोकमान्य टिळकांनी १८९३साली केसरी वाड्यात त्याची सुरुवातही केली. समाज प्रबोधन हा या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मागचा मूळ हेतू होता. या माध्यमातून त्यांनी क्षात्रतेज आणि देशप्रेम यांची अलौकिक सांगड घातली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांनी अशा पद्धतीने लोकांच्या मनावर बिंबवले. थोडक्यात लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे राष्ट्रकारण होते. एक अत्यंत उदात्त, प्रेरक असे कारण होते. धर्मकार्य हा केवळ बहाणा होता. स्वराज्य निर्मितीची आस उत्पन्न व्हावी हेच ध्येय होते.
या सार्वजनिक गणेशोत्सवाची किर्ती चहुदूर पसरली आणि गावोगावी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन होऊ लागली. आणि ती परंपरा आज सव्वाशे वर्षानंतरही टिकून आहे.
मात्र आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवातील उद्दिष्टे दिसतात का या प्रश्नाचे “नाही” असे ठाम उत्तर देताना माझ्या मनात काही विचार येतात आणि तेही मला इथे व्यक्त करावेसे वाटतात.
माझा जन्म स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला. पारतंत्र्याच्या काळाचा फक्त इतिहास मी मनापासून अभ्यासला आणि त्याचा मला आजही अभिमान आहे. या लेखाच्या निमित्ताने मला माझे बालपणी अनुभवलेले कित्येक सार्वजनिक गणेशोत्सव आठवले. गणेश मूर्तीभोवती केलेले ते सुंदर महाभारत, रामायणातल्या कथा सांगणारे देखावे आठवले. गणेशोत्सवात सादर केलेली नाटके आठवली. कित्येक नामवंत कलाकार या गणेशोत्सवांनी रंगभूमीला दिले. उत्तम वक्त्यांची प्रबोधन पर भाषणे ऐकली.कीर्तने ऐकली. संगीत मैफिलीतले नामवंत गायक आठवले. ते परिसंवाद, बौद्धिके सारं काही आठवलं आणि त्या पार्श्वभूमीवर आजचे गणेशोत्सव अनुभवताना नक्कीच उदासीनता येते. लोकमान्य टिळक तर यातून हरवलेलेच आहेत. आता उद्दिष्ट हरवले आहे आणि उत्सव राहिला आहे. त्यातही पैसा, दिखावा, राजकारण यांचा प्रवेश झालाय. सण उत्सव हे संघटनात्मक असतात. समाजात ऐक्य, बंधुभाव प्रेम, समता, निर्माण करण्यासाठी असतात ही भावना न दिसता स्पर्धात्मक वादच दिसतात. अहमहमिका, चढाओढ दिसते. राष्ट्र कारण न दिसता राजकारण जाणवते. गोंगाट आणि धिंगाणा अनुभवायला मिळतो. शहरात तर कित्येक वेळा सार्वजनिक गणेशोत्सवामुळे गल्लोगल्ली वाहनांची कोंडी होऊन जनजीवनच विस्कळीत होते. म्हणूनच आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पना टिकून आहेत का? या प्रश्नाचे नाही असे उत्तर देतानाही एकच वाटते की आता काळ बदललाय. देश स्वतंत्र ही झालाय.
देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली. स्वातंत्र्यासाठी जनजागृती किंवा संघटन हे या गणेशोत्सवा मागचे टिळकांचे उद्दिष्ट आज ऊरले नसले तरी उद्दिष्टे बदलू शकतात. ती अधिक सकारात्मक असू शकतात. आज देश स्वतंत्र असला तरीही मानसिक गुलामगिरीत आहेच. आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आपण आपला देश, आपल्या राष्ट्रीय समस्या, आपले विज्ञान प्रगत जीवन, त्याचबरोबर आपली घसरत चाललेली नीती मूल्ये, देशाभिमान यासंदर्भात पुन्हा एकदा देशाला संघटित करण्याची, ऐक्याच्या प्रवाहात आणण्याची प्रेरणा बाळगली पाहिजे.नव्या पिढीला आपल्या प्रेरक इतिहासाची ओळख करून द्यायला हवी.
म्हणूनच नुसतेच ढोल ताशे नकोत. थिल्लरपणा नको. एकापेक्षा एक गणेश मूर्तींचे प्रदर्शन नको. नुसताच उत्सव नको. सोहळा नको. तर जी परंपरा सव्वाशे वर्ष आपण टिकवली आहे त्यात नवी आवाहने पेलण्याचं सामर्थ्य दिसलं पाहिजे. आणि हे इतर अनेक सार्वजनिक उत्सवासाठीही लागू आहे.
तर आणि तरच लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक उत्सवाला दिलेला मान ठरेल आणि आजच्या ‘नाही” चे उद्याच्या ‘हो’ मध्ये परिवर्तन होऊ शकेल. असे मला वाटते…
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈