सौ.ज्योत्स्ना तानवडे
विविधा
☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – १” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची
दरवेळी हे नाट्यगीत ऐकताना हिमालयाची ओढ जागी व्हायची. खरं तर ती शुभ्र हिमशिखरे डोळा भरून पाहण्याची माझ्याप्रमाणे अनेकांची इच्छा असते. पण ती प्रत्यक्षात येणे इतके सोपे नसते. इतकी वर्ष ती शिखरं साद घालीत होती. यावर्षी आम्ही तिला प्रतिसाद दिला. या सुट्टीत काश्मीरला भेट देण्याचे ते स्वप्न प्रत्यक्षात आले.
भारतभूच्या ‘नंदनवना’ची सफर ठरली. नियोजनाचे सर्व सव्यापसव्य पार करीत आम्ही अगदी सहकुटुंब त्या देवभूमीत जाऊन पोहोचलो. त्यावेळी संध्याकाळ झालेली होती. त्या संधीप्रकाशात ‘दल’ सरोवरात एका शिकाऱ्यातून आमच्या नियोजित हाऊस बोटवर जाऊन पोहोचलो. विविध रंगात, विविध प्रकाराने, रोषणाईने सजविलेले शिकारे, मोठ्या हाऊस बोटस् आणि त्यांची पाण्यातील प्रतिबिंबे ! एकूणच भुरळ घालणारं मोठं मोहक वातावरण होतं.
आत्तापर्यंत सिनेमातून पाहिलेली शिकाऱ्यातली गाणी आठवली. काश्मिरी गालिचे, कलाकारी, लाकडी कलाकुसर, झुंबरं यामुळे हाऊस बोट मधील वातावरणात आपोआपच शाही महालाचा आभास जाणवत होता. या बोटीवर राहण्याचा अनुभव खूप खास होता. एक वेगळाच आनंद मिळला.
या हाऊस बोटची संपूर्ण लाकडी बांधणी आणि रचना खूप वेगळी असते. देवदार वृक्षापासून ती बनवतात. हे लाकूड पाण्यामधे खराब न होता सुरक्षित रहाते. एक बोट बनवायला अंदाजे ३ ते ५ कोटी पर्यंत खर्च येतो. या बोटी इथल्या पर्यटनाच्या खासियत आहेत. करोना काळानंतर आता पर्यटनाने पुन्हा वेग पकडला आहे.
चार चिनार’च्या बेटावर जाताना फक्त आपापल्या कुटुंबासोबत केलेली अडीच तीन तासांची शिकारा राईड केवळ अविस्मरणीय होती. साथीला ‘आपलं माणूस’, संथपणे जाणारी बोट, आजूबाजूला जाणारे असंख्य शिकारे, दूरवर पसरलेले दल सरोवर, पार्श्वभूमी वरती उंच उंच चिनार, देवदारची झाडे, पर्वतरांगा केवळ अप्रतिम ! अगदी स्वप्नवत अनुभव होता तो.
चार चिनारच्या बेटावर प्रसन्न, आल्हाददायक वातावरण होते. दूरवर दिसणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य, ‘कावा’ चहाची सुंदर चव, कश्मिरी फिरन / फेरन मधील फोटो सेशन असे सुखद क्षण घेऊन परत फिरलो.
परत येताना फ्लोटिंग मार्केटमध्ये काश्मिरी साड्या, ड्रेस मटेरियल, कार्पेट्स, लाकडी वस्तू, ज्वेलरी यांच्या शोरूमस्, दुकाने बघितली. या सरोवरात गवताच्या बेटांवर वाफे बनवून शेती केली जाते ही गोष्ट खूप वेगळी होती.
यानंतर बघितले ते पुरातन धार्मिकस्थळ म्हणजे शंकराचार्य मंदिर. गोपाद्री पर्वत किंवा शंकराचार्य टेकडीवरील शंकराचार्य मंदिराला ‘जेष्ठेश्वर मंदिर ‘ असेही म्हणतात. या मंदिरात शंकराचे अति भव्य लिंग आहे. शंकराचार्यांचे साधना स्थळ पण तिथे आहे. उंच पायऱ्या चढण्याचा काहीही त्रास न होता आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या या पवित्र मंदिराला भेट देता आली याचे मनाला खूप समाधान मिळाले. या मंदिर परिसरातून श्रीनगरचे आणि भव्य निसर्गाचे विलोभनीय दर्शन झाले. हा मंदिर परिसर मिलिटरीच्या अधिपत्याखाली असल्याने सर्व व्यवस्था, स्वच्छता वगैरे गोष्टी उत्तम आहेत.
त्यानंतर श्रीनगरमधील प्रसिद्ध ‘निशात बागे’ला भेट दिली. असंख्य नमुन्याचे गुलाब पाहून मन अतिप्रसन्न झाले. अगदी छोट्या गुलाबापासून खूप मोठ्या आकाराचे कलमी गुलाब होते. असंख्य रंग, आकार, एकाच फुलात वेगवेगळ्या रंगछटा, वेली गुलाब असे एकाहून एक वेगवेगळे गुलाब पाहून ‘हे पाहून का ते’, ‘ हे सुंदर का ते जास्त सुंदर ‘ असे होऊन गेले. शोभेची छोटी छोटी फुले सुद्धा तितकीच विविध आकार आणि रंगात आकर्षित करीत होती. चिनारचे मोठे मोठे वृक्ष वातावरण जास्तच शितल आणि आल्हाददायक बनवीत होते. बागेच्या मध्यातून वाहणारा पाण्याचा धबधबा, कारंजी नेत्रसुखद होती. एकंदरीत ही बाग ‘ दि गार्डन ऑफ प्लेजर’ हे नाव सार्थ करत होती.
त्यानंतर ‘शालिमार बागे’ला भेट दिली. इथेही मोठे मोठे चिनार वृक्ष, असंख्य रंगीत गुलाब, धबधबा, कारंजी, राणीमहाल, इतर दोन-तीन जुन्या इमारती आहेत. प्रचंड मोठी अशी ही बाग माणसांनी पण भरलेली होती.
एकंदरीतच अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य, शिकारा सफर, शंकराचार्य मंदिर दर्शन यामुळे श्रीनगर मधील पहिला दिवस खूप आनंद देऊन गेला. आता प्रत्यक्ष हिमशिखरावर जायची जास्ती उत्सुकता होती.
क्रमशः…
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈