सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ३” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आज आम्ही पहेलगामला भेट देणार होतो. अगदी उत्साहात सर्वजण तयार होऊन निघाले. अनंतनाग जिल्ह्यातले हे ठिकाण सृष्टी सौंदर्य आणि उत्साहवर्धक हवेसाठी प्रसिद्ध आहे. इथे वर्षात चार ऋतू व्यवस्थितपणे अनुभवता येतात. सभोवती हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे, आसमंतात उंचचउंच पाईन आणि देवदार वृक्ष, हिरवळीची मैदाने आणि पाण्याचे प्रवाह दिसतात. हे सर्व पहात पहात आमचा प्रवास सुरू होता. रस्त्याच्या जवळून खळाळत वाहणारी लिद्दर नदी, पाण्याचा खळखळ आवाज, हिरवीगार वृक्षराजी यामुळे वातावरण खूप छान होते. जाताना वाटेत प्रसिद्ध अनंतनाग मधून पुढे गेलो. काश्मिरी भाषेत नाग म्हणजे पाण्याचा झरा किंवा प्रवाह. झेलम नदी बेहरीनाग मधून उगम पावते. संगम गावात झेलम नदी आणि लिद्दर नदीचा संगम होतो.

आम्ही पामपूरमधे केशर मळ्याला भेट दिली. इथे ५० स्क्वेअर किलोमीटरच्या टापूत केशर पिकवतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा त्याचा सीझन असतो. त्याबद्दलची अगदी सविस्तर माहिती घेतली. केशर खरेदी बरोबर कावा चहाचा आस्वादही घेतला.

इथून पुढे ‘अवंतीपुर मंदिर अवशेषां’ना भेट दिली. अवंतीपूर राजा अवंतीवर्मांची राजधानी होती. इथे अवंती स्वामी म्हणजे विष्णू आणि अवंतीश्वर म्हणजे शिव अशी दोन दगडी मंदिरे होती. या मंदिरात अतिशय सुंदर कोरीव काम, भव्य मूर्ती होत्या. पण भूकंप आणि भूस्खलनात मंदिराचे अवशेषात रूपांतर झाल्याचे समजले. अजूनही तिथे काही मूर्ती, खांब वगैरे शाबूत आहेत. त्यावरील कोरीव काम अप्रतिम आहे. आता पुन्हा हे मंदिर पुनरुज्जीवीत करण्यासाठी काम सुरू आहे. याच ठिकाणी ऑंधी सिनेमातील ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही’  हे गाणे चित्रीत झाल्याचे समजले.

पहेलगाम हे गाव छोटसं पण पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ आहे. पहेलगाम म्हणजे मेंढपाळांचं गाव. इथून छोट्या वाहनांनी आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहायला गेलो. सुरुवातीला पोहोचलो चंदनवाडीला. प्रसिद्ध अमरनाथ यात्रेचे हे प्रवेशस्थळ आहे. इथल्या पायऱ्या चढून अमरनाथ यात्रा सुरू होते आणि पुढे जाते. प्रत्यक्ष अमरनाथाला नाही पण पहिल्या पायरीला हात टेकून अमरनाथाला मनोभावे नमस्कार केला.

समोर सगळीकडे बर्फचबर्फ होता. इथला बर्फ थोडा कडक घसरडा असल्याने हातात काठ्या घेऊन गमबूट घालून पर्यटक फिरत होते. बर्फात खेळत होते. बर्फाखालून वहाणारा खळाळता पाण्याचा प्रवाह मध्येच उघडा झाल्याने छोटे ग्लेशियर तयार झाले होते. सर्वांचे फोटो सेशन उत्साहात सुरू होते. नजर जाईल तिथवर पसरलेला बर्फ, बर्फाच्छादित झाडे, शिखरे यामुळे निसर्गाची अद्भुत लीला इथेही अनुभवायला मिळत होती.

इथून परत येताना बेताब व्हॅलीला गेलो. या व्हॅलीचे मूळ नाव हजन व्हॅली असे होते. पण इथे हिंदी चित्रपट ‘बेताब’चे शुटिंग झाले आहे आणि त्यानंतर ही व्हॅली ‘बेताब व्हॅली’ म्हणून ओळखली जाऊ लागली. समोर बर्फाच्छादित पर्वतशिखरे, पाईन आणि देवदार वृक्षांची जंगलासारखी दाट झाडी, आभाळाला स्पर्श करू पाहणारी उंच उंच झाडे, दूरवर पसरलेली हिरवीगार कुरणे, जवळच वहाणारा खळाळता जलप्रवाह असे अतिशय विलोभनीय सृष्टी सौंदर्य सभोवार दिसत होते. त्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करीत तृप्त मनाने परत फिरलो.

वाटेत पुढे क्रिकेट बॅट बनविणाऱ्या फॅक्टरीला भेट दिली. विलोची  झाडाच्या लाकडापासून या बॅट्स बनवितात. हे लाकूड थंडी, उन, वारा, पाऊस या कसल्याही परिस्थितीत अजिबात खराब न होता आहे असेच राहते हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. हा उद्योग इथे खूप मोठ्या प्रमाणावर चालतो.

एकूणच आजचे स्थल दर्शन खूप छान झाले होते. मनाला भुरळ घालणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य, धार्मिक स्थळांचे दर्शन, उदरनिर्वाहासाठी स्थानिकांची चालणारी धावपळ अशा संमिश्र भावनात निसर्ग किमयेला मनोमन नमस्कार करीत उद्याच्या सोनमर्ग भेटीची आस घेऊनच हॉटेलवर परतलो.

क्रमशः…

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments