सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “’आफ्टर दि ब्रेक…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
सुरवातीला अधिक महिना, मग श्रावण महिना,त्या नंतर गौरी गणपती हयामुळे दोन अडीच महिने नुसती भक्तगणांची धावपळ होती. पूजाअर्चा , देवदर्शन, व्रतवैकल्ये, ह्यामध्ये बहुतेक सगळे गुंतले होतें. श्रावण आणि अधिक महिन्यातील व्रतवैकल्ये आणि गणपती महालक्ष्मी उत्सव ह्यांमुळे हे सगळे दिवस प्रचंड उत्साहाचे, चैतन्याचे आणि धावपळीचे गेलेत.
ह्या सगळ्या धावपळी नंतर प्रत्येकाला आता थोडीशी विश्रांती, थोडीशी शांतता, अगदी मनापासुन हवीहवीशी वाटते, नव्हे आपलं शरीर आता आरामाची, जरा उसंतीची आतून मागणी करीत असत.आता जर पंधरा दिवस जरा शांत, स्थिर गेलेत तर पुढें नवरात्र, दिवाळी ह्यासाठी लागणारा उत्साह, शक्ती आपल्यात तयार होईल असं मनोमन वाटतं.
सहज मनात आल ज्या प्रमाणे आपलं त्याचं प्रमाणे देवाचं सुध्दा असेल. त्यांचे ही हे सगळे दिवस प्रचंड व्यस्ततेत गेले असतील. ती देवळांमध्ये होत असलेली प्रचंड गर्दी, भक्तांकडून होणारा तो दूध पाण्याचा अभिषेकाच्या निमित्याने होणारा मारा, ती कचाकचं तोडण्यात येऊन देवाला वाह्यलेली फुलं, पत्री, तो प्रसादाच्या पदार्थाचा कधी कधी अतिरेक आणि सगळ्यांत कळस म्हणजे ह्या नंतर भक्तांकडून मागण्यात येणाऱ्या गोष्टी, त्यासाठी नवसाची बोलणी, ह्या सगळ्यामुळे देऊळ वा देव्हाऱ्यातील देव सुध्धा जरा उबगलेच असतील नाही ?
अर्थातच मी संपूर्ण आस्तिक गटातीलच आहे, देवावर माझा प्रचंड विश्वास आहे, ह्या शक्तीपुढे कायम नतमस्तक रहावसच आपणहून वाटतं, फरक जर कुठे पडत असेल तर तो भक्तीत न पडता तो हे दर्शविण्याचा पद्धतीत पडतो. मला स्वतःला दिवसाची सुरवात आणि दिवसाचा शेवट हा देवाच्या दर्शनाने झाला तर मनापासुन आनंद मिळतो, सुख वाटतं. परंतु हे करतांना ती गर्दी असलेली देवळ, भरमसाठ तोडलेली फुलं, पत्री हे मनापासुन नको वाटतं वा कुणी केलेलं दिसलं ते मला अस्वस्थ करुन जात. असो
आता पंधरा दिवसाच्या ब्रेक नंतर नवरात्र, दसरा, दिवाळी ह्यांचे वेध लागतील. तेव्हा सगळ्यांनी जरा विश्रांती घ्या आणि नव्या उत्साहाने परत सण, सोहळे ह्यांच्या स्वागताला सज्ज व्हा.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈