सुश्री प्रज्ञा मिरासदार

स्व-परिचय 

प्रज्ञा मिरासदार. मूळ गाव पंढरपूर. द.मा. मिरासदार हे माझे दीर. शिक्षण- मराठी विषयात पदवी. मी संस्कृत व इतरही विषयांच्या ट्यूशन्स घेत होते. गाण्याच्या परीक्षा दिल्या आहेत. शास्त्रीय संगीतावर आधारित भजनाचे क्लासेस चालविले. सध्या एकच क्लास चालविते. अनेक विषयांवर लेख लिहिले आहेत. कविता करते. अनेक काव्यसंमेलनात कविता सादर केल्या आहेत. पारितोषिके मिळाली आहेत. प्रत्येक सहलीची प्रवासवर्णने लिहिणे, हा माझा छंद आहे. अमेरिकेत जितक्या वेळा गेले त्या प्रत्येक वेळेची प्रवासवर्णने लिहिली आहेत.

? विविधा ? 

☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

दि. २३ सप्टेंबरपासून यंदा श्रीमद्भागवत सप्ताह सुरू झाला. तो २९ सप्टेंबरपर्यंत चालला. अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे, घरे, मठ इथे हा सप्ताह अत्यंत भक्तिभावाने साजरा होतो. तो ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. खरोखरच या ग्रंथात प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि विज्ञान भरलेले आहे. हे श्रीमद् भागवत मूळ संस्कृत भाषेतूनच सांगितले आहे. सर्वसामान्य जनांना संस्कृत भाषा आकलनास अवघड असते. म्हणून पुण्यातील एक विद्वान पंडित कै. प्रा. डॉ. प्रकाश जोशी ( एम्. ए. पी.एच्. डी. ) यांनी आमच्यासारख्या सामान्य जनांसाठी त्या श्रीमद् भागवताचा सारांश सांगणारी सात पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत.

त्यामधे नुसताच अनुवाद नाही तर पूर्ण भागवत पुराणाचा भावार्थ, त्यातील तत्वज्ञान त्यांनी उलगडून सांगितले आहे. शिवाय भाषा सोपी आहे. सुमारे ९० पृष्ठांचा प्रत्येक भाग आहे. त्यामध्ये त्यांनी सुरवातीलाच ही पुस्तके लिहिण्याचा उद्देश सांगितला आहे.ते म्हणतात की, कलियुगात नामस्मरण आणि श्रीमद् भागवत पुराण कथा श्रवण हाच एकमेव उपाय आहे.असे महर्षि वेदव्यासांनी म्हटले आहे. अनेक पुराणे वेदव्यासांनी रचली. तरीही भगवंताच्या अवतार स्वरूपांचे वर्णन करणारे भक्तिरसपूर्ण असे श्रेष्ठ पुराण भागवत पुराण रचल्यानंतरच त्यांना अतीव समाधान प्राप्त झाले होते.

हा भागवताचा ज्ञानदीप प्रथम श्रीविष्णु भगवंतांनी ब्रह्मदेवांना दाखविला. नंतर नारदमुनींना आणि नारदांच्या रूपाने भगवंतानेच महर्षि वेदव्यासांना दाखविला. व्यासमुनींनी त्यांचे पुत्र शुकाचार्य मुनींना दाखविला,तर शुकाचार्यांनी मृत्यूच्या वाटेवर असणाऱ्या राजा परिक्षिताला तो दाखविला.

राजा परिक्षित हा पांडवांचा नातू.  अतिशय न्यायप्रिय होता. धर्मानुसार आचरण व राज्य करीत होता.तो शिकारीस गेला असताना तहानेने व्याकुळ होऊन शृंग ऋषींच्या आश्रमात गेला. तिथे ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यामुळे त्यांचे लक्ष राजाकडे गेले नाही. याचा राग आल्यामुळे राजाने जवळच एक मरून पडलेला साप ऋषींच्या गळ्यात अडकविला आणि तो तिथून निघून गेला. थोड्या वेळाने शृंग ऋषींचे पुत्र शौनक ऋषी आश्रमात आले. त्यांनी शापवाणी उच्चारली की, ज्याने हे कुकर्म केले आहे, त्याला आजपासून सात दिवसांच्या आत तक्षक नाग दंश करून मारून टाकील. ऋषींचा हा शाप खराच होणार होता. त्या सात दिवसांत प्रायोपवेशन म्हणून परिक्षित राजा गंगानदी तीरावर नैमिषारण्यात राहिला. तिथे महामुनी शुकाचार्य आले. त्यांना राजा अनेक प्रश्न विचारीत राहिला आणि मुनी शुकाचार्य राजाला श्रीमद् भागवत कथा कथन करते झाले.अशी ही प्रस्तावना आहे.

भाद्रपद शुद्ध नवमी (किंवा अष्टमी ) पासून ते प्रोष्ठपदी पौर्णिमेपर्यंत सात दिवस भागवत पुराण सप्ताह ऐकण्याची, ऐकविण्याची परंपरा भारत देशात हजारो वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे. तसे त्याचे पारायण केव्हाही केले तरी चालते. त्यासाठी डॉ. प्रकाश जोशी यांनी सर्वसामान्य जनांसाठी ही सात अत्यंत श्रवणीय, भागवताचे पूर्ण सार सामावलेली पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत. चार ते पाच तासात एक पुस्तक वाचून होते.

दुर्दैवाने लेखक डॉ. प्रकाश जोशी वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी अकालीच निधन पावले. त्यांच्या मृत्यूनंतर गीताधर्म मंडळाने ही सात पुस्तके प्रकाशित केली आहेत. मी स्वतः प्रतिवर्षी ही पुस्तके वाचते. माझ्या घरी श्रीमद् भागवत सप्ताह साजरा होतो. अत्यंत साधेपणाने पण भक्तिभावाने आम्ही सगळे मिळून तो संपन्न करीत असतो.

ती पुस्तके वाचल्यानंतर श्रीमद् भागवत वाचनाचे, श्रवणाचे पूर्ण समाधान मिळते. या सात पुस्तकांचे संक्षिप्त वर्णन मी पुढे काही भागात करीत आहे. सर्वांना ते वर्णन आवडेल अशी आशा करते.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments