श्री अरविंद लिमये
विविधा
☆ ‘आधार आणि सोबत’ ☆ श्री अरविंद लिमये ☆
एखादा शब्द माणसाला आधार देत असतो सतत सोबत करीत असतो असं कुणी म्हंटलं तर ते खरं नाहीच वाटणार पण असा एक शब्द आहे.देहबोली!
जन्माला आल्यापासून एखाद्याला शब्दांनी जर झिडकारुनच टाकलेलं असेल तर त्याला कायमस्वरूपी सोबत करते ती त्याच्या देहाशीच एकरूप असलेली देहबोली! आणि याचा ‘याची देही याची डोळा’ मला साक्षात्कार झाला तो जगाचा फारसा अनुभव नसलेल्या आणि नोकरीनिमित्ताने पहिल्यांदाच मुंबईत वास्तव्यास जायला लागलेल्या माझ्या नुकतीच विशी ओलांडलेल्या वयात. तेव्हा भयंकर गर्दीतला लोकलचा प्रवास म्हणजे मला एक अतिशय कठोर शिक्षाच वाटायची. पण तोही हळूहळू अंगवळणी पडत असताना त्या लोकलच्या प्रवासानेच मला अतिशय अनपेक्षित असा तो ‘दृष्टांत’ घडवलेला होता!
त्यादिवशी लोकलमधे माझ्या समोरच्या सीटस् वर पाच-सहा मुलांचा एक ग्रूप बसलेला होता. स्वतःशी अगदी हसतखेळत गप्पा मारताना एकमेकाला उत्स्फुर्त टाळ्या देणे, एखाद्याच्या पाठीत धपाटा मारणे, कुणी एखादा विनोद केला असेल तर त्याला हसून दाद देणे, त्यातल्याच कुणी एखाद्याने खोडी काढली असेल तर रुसल्याच्या अविर्भावात त्याबद्दल हसरा निषेध नोंदवणे, हे सगळं त्यांचं एकही शब्द न बोलता सुरू होतं. त्या वयापर्यंत मूकबधिरांचे प्रश्न आणि त्यांचं भावविश्व याबाबत मी पूर्णत: अनभिज्ञच होतो.त्या दिवशी मनाला झालेला अस्वस्थतेचा स्पर्श इतक्या वर्षांनंतर आजही मी विसरलेलो नाहीय!
संजीवकुमार आणि जया भादुरी यांचा ‘कोशिश’ मी मुंबईत तेव्हा पाहिला होता तो या पार्श्वभूमीवर. तो बघताना त्या दोघांच्यातल्या संवादाची विशिष्ट खूणांची देहबोली माझ्या मनाला अधिक उत्कटतेने स्पर्शून गेली ती त्याआधी मी घेतलेल्या लोकलमधील त्या अस्वस्थ अनुभवामुळेच! त्यादिवशी लोकलमधल्या प्रवासात माझी त्या विशिष्ट देहबोलीशी ओझरती ओळख झाली होती फक्त आणि आता ‘कोशिश’ने मूकबधिरांच्या त्या देहबोलीच्या मुळाशी असणाऱ्या अंतरंगाचीही मला ओळख करून दिली होती!
कोशिशचा अनुभव उत्कट होताच पण त्याहीपेक्षा मला जास्त अस्वस्थ करून गेला तो नाना पाटेकर आणि सीमा विश्वास अभिनित ‘खामोशी! ते दोघेही मूकबधिर. कनिष्ठ आर्थिक स्तरातले. त्यांच्या संसारात जेव्हा त्यांच्या लेकीचा जन्म होतो तेव्हा ती आपल्यासारखी नाहीय ना या आशंकेने ते अस्वस्थ. पण ती आपल्या चुटक्या, टाळ्यांना तात्काळ प्रतिसाद देतेय हे लक्षात येताच त्या दोघांच्या भरून आलेल्या तुडुंब नजरेतून पूर्ण चेहऱ्यावर पसरलेला अत्यानंद..! हा प्रसंग खरोखरंच सर्वच प्रेक्षकांना हेलावून सोडणारा होता.त्याच चित्रपटात आपल्या आई-बाबांची सावली बनून त्यांना आधार देणाऱ्या त्या मुलीची मोठेपणीची भूमिका केली होती मनीषा कोईरालाने. ती शिकते, यश मिळवते.आपल्या मूकबधिर आई-वडिलांनी शारीरिकदृष्ट्या हतबल असूनही प्रचंड कष्ट करुन, प्रसंगी स्वतः अर्धपोटी राहून, आपल्याला लहानाचं मोठं केलंय ही जाणीव ती विसरलेली नसते. तिच्या सत्काराच्या प्रसंगी तिचे ते मूकबधिर आई-वडील अर्थातच पहिल्या रांगेतील खुर्च्यांवरच बसलेले असतात. सत्कार स्वीकारल्यानंतर ती भाषण करायला उभी रहाते तेव्हा समोरच्या सर्व उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट थांबल्याचे समजणे शक्यच नसणारे ते दोघे अश्रूभरल्या अवस्थेत देहभान हरपून पुढे टाळ्या वाजवतच रहातात ते मोजके क्षण त्या दोघा मूकबधिरांचे दु:ख आणि अगतिकता अतिशय हळुवारपणे अधोरेखित करून जातात. या सगळ्यामुळे मनोमन अस्वस्थ झालेली त्यांची मुलगी आपलं भाषण सुरु करते तेव्हा ती काय बोलतेय हे आपल्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंत आई-बाबांच्या डोळ्यांत तरळून जाते आणि ती त्याचक्षणी त्यांच्या मुलीपर्यंत पोचतेही. त्यानंतरचं तिचं पुढचं संपूर्ण भाषण म्हणजे समोरच्या इतर सर्व श्रोत्यांसाठी शब्द आणि त्या शब्दांच्या उच्चारांबरोबरच त्या शब्दांचा अर्थ आपल्या कर्णबधिर आई-वडिलांपर्यंत पोचावा यासाठीच्या त्या शब्दांच्या अर्थाच्या मूकबधिरांच्या विशिष्ट देहबोलीतल्या अनुरुप खूणा यांच्या एकत्रित प्रवासासारखे सुरु रहाते.याद्वारे तिने व्यक्त केलेली आपल्या आई-वडिलांबाबतची कृतज्ञता त्या देहबोलीतून त्या दोघांच्या हृदयाला भिडताच आवाज भरुन आलेल्या मुलीच्या आवाजातील थरथर आणि त्या दोघांचेही भावनातिरेकाने नस न् नस हलणारे चेहरे म्हणजे बोलीभाषा आणि देहबोली यांनी परस्पर सहकार्याने घेतलेला संबंधितांच्या मनातील भावनांचा ठावच ! आणि त्या क्षणांचा तो पूर्ण ऐवज त्याला साक्षीभूत असणाऱ्या प्रेक्षकांच्या काळजाचाही ठाव घेत असे !
इथे मूकबधिरांच्या देहबोलीचा इतका सविस्तर आढावा घेण्याचं एकमेव प्रयोजन म्हणजे माणसाच्या आयुष्यातली देहबोलीची भूमिका समजावी हेच. इथे श्रवणशक्तीच्या अभावी जन्मतःच वाचाशक्तीही मूक होऊन राहिलेल्या वंचितांना जन्मभराचा ‘आधार’ देते ती देहबोलीच ! त्यांच्यासाठी ही देहबोली खंबीर आधार देणारी तर ठरतेच आणि निशब्द राहूनसुद्धा संपर्क-संवादातलं सुख काय असतं याची प्रचितीही त्यांना देते.
आपल्या शरीराच्या अंगांगामधे देहाची ही बोलीभाषा अतिशय बारकाव्यांसह निसर्गतःच पेरली गेलेली असते. त्यामुळेच नैसर्गिक प्रेरणेनेच त्या देहबोलीतल्या नि:शब्द भावना अगदी तान्ह्या बाळालाही उमजत असतात. म्हणूनच एखाद्या रडक्या बाळाला झोपवतानाचं त्याच्या आईचं ‘थोपटणं’ बाळ रडणं थांबवत नाहीय हे लक्षात येताच जेव्हा ‘धोपटण्या’त परावर्तित होतं तेव्हा ते त्या तान्हुल्याला आपसूक समजतं. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून ते एकतर घाबरुन रडणं थांबवतं तरी नाहीतर चिडून रडण्याची पट्टी वाढवतं तरी !
जन्मतःच असलेली ही देहबोलीची जाण मग पुढे आयुष्यभर आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दात लपलेल्या भावनांना सावली सारखी ‘सोबत’ करतच असते. किंबहुना आधी देहबोली आणि मग त्या देहबोलीचे बोट धरूनच आल्यासारखे शब्दांचे उच्चार असंच आपल्या संवादाचं स्वरूप असतं.’नाही’ या नकारात्मक उच्चाराआधी मान नकारसदृश आधी हलते न् मग ‘नाही’ या शब्दाचा उच्चार होतो. ‘होs नक्कीच’ हा होकार आधी होकारार्थी हललेली मान देते आणि नंतर त्याचे शब्दोच्चारण होत असते. देहबोलीचा मूकबधिरांना जसा ‘आधार’ तशीच आपल्यासारख्या अस्खलित बोलणाऱ्यांच्या शब्दांनाही देहबोलीचीच ‘सोबत’!
‘नाटक’ म्हटलं की देहबोलीसंबंधी मला सर्वप्रथम आठवतो तो ‘माईम’ हा नाट्यप्रकार! केवळ हावभाव,अविर्भाव आणि हालचालीतून आकाराला आलेलं कथानाट्य म्हणजेच ‘माईम! चित्रपटातील मुकाभिनय म्हटलं की ठळकपणे नजरेसमोर येतो तो ‘चार्ली चॅप्लीन’! या संदर्भात विशेषत्त्वाने उल्लेख करायलाच हवा तो कांही दशकांपूर्वीच्या ‘पुष्पक’ या चित्रपटातील कमल हसनच्या मुकाभिनयाचा!
चित्रपट असो वा नाटक बोलीभाषेला अनुरुप देहबोलीची जोड नसेल तर अभिनय परिणामकारक होऊच शकणार नाही.
भरतमुनींनी त्यांच्या अतिशय प्राचीन अशा ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथात अभिनयकलेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणाचे सविस्तर वर्णन केलेले आहे.’देहबोली’च्या विवेचनात भरतमुनींनी सांगितलेल्या चार अभिनय प्रकारांपैकी ‘आंगिक अभिनय’ या अभिनयप्रकाराचा उल्लेख अपरिहार्यच.मुखज, शरीर आणि चेष्टाकृत हे ‘आंगिक अभिनयाचे’ तीन उपप्रकार म्हणजे अनुक्रमे १)चेहरा, २)शरीराची खांदे,मान, हात, पाय यासारखी मुख्य अंगे, आणि ३)शरीरावयवांच्या विविध हालचाली. या खेरीज विशिष्ट भूमिका साकारताना त्या पात्रानुसार(तरुण,प्रौढ,वृध्द इत्यादी) नटाने कसे चालावे, उठावे, बसावे, याबाबतचे नियमही नाट्यशास्त्रात सांगितलेले आहेत.
अतिशय परिपूर्ण आंगिक अभिनय कसा उत्कट नाट्यानुभव देऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी स्वतः प्रेक्षक म्हणून अनुभवलेल्या भूमिकांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात खालील भूमिकांचा आवर्जून उल्लेख करेन.
हत्तीरोगाची सुरुवात झाल्याने जडावलेला आपला एक पाय ओढत चालणारी ‘संध्याछाया’ या नाटकातील म्हातारी (विजया मेहता), अर्धांगाचा झटका आल्याने संपूर्ण शरीराची हळूहळू वाढत जाणारी वृध्द प्रो.भानूंच्या उभ्या शरीराची थरथर आणि अखेरचे त्यांचे उभेच्या उभे खाली कोसळणे! प्रेक्षकांच्या मनाचा थरकाप उडवणारे हे दृश्य अभिनित
केले होते डाॅ. श्रीराम लागू यांनी ‘हिमालयाची सावली’ या नाटकात! पुढे दिग्दर्शक आणि प्रकाशयोजनाकार म्हणून नावारूपाला आलेले ‘दिलीप कोल्हटकर’ आणि नुक्कड या हिंदी मालिकेमुळे वेगळी ओळख मिळालेले ‘सुरेश भागवत’ यांच्या ‘जास्वंदी’ या नाटकातल्या केवळ देहबोलीतून जिवंत केलेल्या दोन बोक्यांच्या अविस्मरणीय भूमिकाही खासच.आंगिक अभिनयातील देहबोलीचे महत्त्व अधोरेखित करणारे हे प्रातिनिधिक भूमिकांचे संदर्भ पुरेसे बोलके ठरतील !
अशी ही देहबोली! नि:शब्द,अबोल.. तरीही खूप कांही सांगू पहाणारी मूकभाषा! शब्द हरवून बसलेल्या वंचितांना भक्कम आधार देणारी जशी तशीच आपल्यासारख्या सर्वांनाही जन्मक्षणापासून अखेरच्या श्वासापर्यंत सोबत करणारीही..!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈