श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “टेक यूवर ओन डिसिजन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

टेक युवर ओन डिसिजन… 

या वाक्यात आता नवीन काही नाही. निर्णय काय घ्यावा? हो… कि नाही… किंवा समोर असलेल्या पर्यायांपैकी कोणता चांगला. आणि कोणता निवडावा. असा प्रश्न पडला की हे वाक्य ऐकायला मिळत.

बऱ्याचदा विचारशक्ती वाढण्यासाठी, निर्णयक्षमता येण्यासाठी, गरज असल्यास थोडी जोखीम पत्कर काही लागल, चुकल तर मी आहे असा धीर देण्यासाठी वडीलधारी या वाक्याचा आधार घेतात. पण…

सध्या घरात जेव्हा मला काही विचारल जात, आणि मी हे वाक्य म्हणतो, तेव्हा माझ्या निर्णयाची फक्त औपचारिकता असते. बाकी जवळपास त्यांचं सगळ ठरलेल असत. डिसिजन जवळपास झालेला असतो.

जसं… जेव्हा मला विचारल जात, मी काय म्हणते… मुलं विचारतात की संध्याकाळी खायला ऑनलाईन काय मागवायच?…

यात मागवायच का?  हो का नाही हा प्रश्न नसतो. मागवायच हे ठरलेल असत.

यात मुलांना घरातल काही नकोय. आणि बायकोला देखील आपणच काही करण्याची इच्छा नसते. म्हणजे यात घरातल नकोच हा निर्णय त्यांचा झालेला असतो.

यातही ऑनलाईन अस विचारल्यावर आपण कुठेही जायच नाही. आवडणाऱ्या ठिकाणाहून घरीच मागावयच आणि आरामात खायच. हे सुध्दा ठरलेल असत. माझ्या निर्णयाची गरज नसते. फक्त मला विचारल जात. मग मी म्हणतो… टेक युवर ओन डिसिजन. यात माझाही गाडी चालवायचा आणि पार्किंग साठी जागा शोधायचा त्रास वाचणार असतो.

तसं नाही… पिझ्झा मागवायचा कि बर्गर…?

म्हणजे पदार्थ सुध्दा त्यांचे ठरलेले असतात. त्या दोन व्यतिरिक्त तीसरा नसतोच. कदाचित त्याचा नंबर पुढे नजीकच्या काळात येणार असावा. किंवा आज या दोन पदार्थांवर त्यांच्या भाषेत जम्बो डिस्काउंट असावा. आता त्यांच्या  निर्णयात मी डिस क्वालीफाय सारखा डिस काउंट असतो. पण मला विचारतात. मी परत म्हणतो. टेक युवर ओन डिसिजन.

हे झालं खाण्याच. दुसऱ्या गोष्टी सुध्दा याच पद्धतीने विचारल्या जातात.

मला वाटतं… या दिवाळीत कपड्यांऐवजी एखादा दागिना घ्यावा. नाही छोटासा असला तरी चालेल. यात छोटासा म्हणताना हाताची चिमटी जेवढी लहान करता येईल तेवढी लहान करता करता आवाज वाढवता येईल तेवढा वाढवला जातो. पण आवाजात गोडवा आणि नाजूकपणा असेल याची काळजी घेतली जाते.

आता दागिना छोटासा म्हटला तरी कमीतकमी आठ ते दहा ग्रॅम पासून सुरुवात. परत यांच्या तब्येतीला तो शोभून दिसला पाहिजे. थोडक्यात ठसठशीत हवा. सांगा कपडे आणि दागिना यांच बजेट जवळपास कुठे जमत का?

परत पुढे वाक्य असतच. मागे आम्ही एक पाहून आलो आहे. छान आहे. आणि डिझाईन पण नवीन आहे. हां… थोडीफार भर मीपण घालीन की. यांच भर घालणं म्हणजे दागिना घ्यायला भरीस घालण असत. थोडक्यात वस्तू पाहून झालेली असते. निर्णय झालेला असतो. आपल्याला विचारण्याची औपचारिकता असते. मग म्हणावच लागत. टेक युवर ओन डिसिजन…

माझ्या कपड्यांच्या बाबतीत सुद्धा तेच होत. नेहमी नेहमी पॅन्ट शर्ट हेच असत. कामावर तेच बरे असतात. पण झब्बा लेंगा कमीवेळा घेतला जातो. तो सुटसुटीत सुध्दा असतो. यावेळी झब्बा लेंगा पहा… असं मला वाटत. तुम्हाला त्याची सवय नाही. पण  अगदीच काही वाइट दिसणार नाही. (हे वाक्य माझ्यासाठी असत का झब्बा लेंगा याच्यासाठी हा डिसिजन मात्र मी घ्यायचा असतो. ) पण पुढे तेच मला म्हणतात. टेक युवर ओन डिसिजन…

दिवाळीच्या फराळाचही आता तसच होणार… घरी काय करायच आणि बाहेरुन काय घ्यायच, किंवा करून घ्यायच हे जवळपास निश्चित नक्की झालेल असत. पण सुरुवात अशीच होईल.

ऑफिसमुळे सगळ्या गोष्टी घरी करण शक्य होणार नाही. काही पदार्थ घरी करू आणि काही तयार आणू. लाडू घरचेच आवडतात मुलांना. ते घरीच करु. आणि बाहेरुन काय आणायच त्याची यादी मी देते. त्या प्रमाणे तुम्ही घेऊन या. तयार पदार्थांसाठी ऑर्डर मी देईन. चालेल ना? तुम्हाला काय वाटतं… म्हणजे कुठे ऑर्डर द्यायची ते सुद्धा त्यांच ठरलेलं असतं किंवा तेच ठरवणार असतात. मी म्हणतो.

टेक युवर ओन डिसिजन…

पण ऑफिस किंवा इतर गोष्टी सांभाळून घरच सगळ व्यवस्थित आणि वेळच्या वेळी करण्याचा त्यांचा जो आटापिटा असतो त्या त्यांच्या डिसिजन ला मात्र सलाम… तेच करु जाणे… तिथे मी म्हणतो, तुझ्या निर्णयाला आणि कामाला सलाम…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments