सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “बंध नात्यांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल सुट्टीचा दिवस. एक सुट्टी सुद्धा खूपसारा शीण घालवते. त्याच त्याच रुटीनला जरा मन कंटाळलं असतं त्यात ह्या बदलाने खूप सकारात्मक फरक पडतो.

काल रविवार. त्यामुळे घरी मस्त आरामात साग्रसंगीत स्वयंपाक,गप्पा गोष्टी करीत जेवणाचा घेतलेला आनंद काही ओरच असतो. खेळीमेळीच्या वातावरणात जेवणं सुरू असतांना “अहो आई” सहज बोलल्या आपण तीस वर्षे झालीत ,एकत्र,एकविचाराने,आनंदाने एकाच छताखाली राहातो आहे,भांडण तर सोडाच आपल्यात कधी साधी कुरबुर पण नाही, ह्याचं काय कारण असावं बरं? कारण सासूसुन हे नात जरा जास्तच नाजूक असतं म्हणून विचारलं.

त्यांच्या प्रश्नाने विचारात पडले आणि कारण शोधतांना दोन तीन प्रमुख कारणं सापडली,एक म्हणजे दोघीही ह्या सुमधुर संबंधाचं क्रेडीट हे एकमेकींना देतो, आपापली कर्तव्य दोघीही चोख बजावित असल्याने एकमेकींना स्वतः पेक्षाही काकणभर जास्त विश्वास दुसरीवर वाटतो,आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या नात्यात “ईगो”ला अजिबात स्थान देत नाही. अर्थातच ह्या वरील गोष्टींच दोघींकडूनही तंतोतंत पालन होतं.

आम्ही दोघीही एकमेकांनी वेळ हा देतोच, कितीही व्यस्त दिनचर्या असली तरी रात्री झोपायच्या आधी कमीत कमी दोघीही आजचा दिवस कसा गेला हे परस्परांना सांगतो.

कुठल्याही नात्यामध्ये परस्परांना दिलेला वेळ  हा नातं पक्क करायला काँक्रीट चे काम करतो. ह्यावरून गुलजारजींच्या मला आवडत असलेल्या ओळी आठवल्या त्या पुढीलप्रमाणे,

“मुझसे समय लेकर भी मत आना,हाँ अपना समय साथ लाना,फिर दोनो समय को जोड बनाएँगे एक झुला ।।। खरचं किती आशयपूर्ण आहेत नं ह्या ओळी,किती गहरा अर्थ दडलायं नं ह्यात. दोन व्यक्तींच्या नात्यात परस्परांना दिलेले सर्वोत्तम गिफ्ट म्हणजे परस्परांना दिलेला वेळ. मग ते नातं मुला-पालकांच असो, सासू सुनेचं असो,नवराबायकोचं असो वा प्रियकरप्रेयसीचं. भावंड,मैत्री ह्या नात्यांमध्ये तर खरी लज्जत वेळ देऊन संवाद, वादविवाद ह्यामध्ये असते.

जर परस्परांशी बोलायला वेगवेगळे विषय असतील, बोलतांना वेळेचं भान सुद्धा राहात नसेल,परस्परांशी शेअर केलेली लहानात लहान गोष्ट ही दोन्ही नात्यात खूप महत्त्वाची वाटत असेल,मनात आलेला विचार पटकन कोणाला सांगायचा तर परस्परांशी बेझिझक बोलावेसे वाटत असेल तर समजून जावं आपलं नातं मुरलेल्या मोरब्यांसारखे झालेयं.वर्षानुवर्षे. टिकणारं,तरीही अजिबात गोडी तसूभरही कमी न होऊ देणारं.परंतु जर कुठे तरी संवादच खुंटत असतील, बोलायला काही विषयच सुचत नसतील तर कुठेतरी, काहीतरी,कुणाचंतरी  हमखास चुकतयं हे समजावं.

व्यक्तींमधील दुरावा, बेबनावं ह्याचं खूप महत्त्वाचं एक कारणं म्हणजे  स्व मध्ये ठासून भरलेला “ईगो”. ह्या ईगोमुळेच “पहले आप, पहले आप “करीत सुखासामाधानाची स्टेशन्स भराभर निघून जातात. दुराव्याचं दुसरं कारण म्हणजे “कायम दुसऱ्या कडूनच अपेक्षा आणि कधीकधी तर त्या अवास्तव सुद्धा. आपण आपल्या व्यक्तीच्या बाबतीत खूप जास्त पझेसिव्ह असतो.एकच व्यक्ती ही विविध लोकांशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधल्या गेलेली असते.प्रत्येक व्यक्ती ही संपूर्णतः भिन्न मतांची, विचारांची,आवडींची असते तेव्हा समोरील व्यक्ती ही आपल्याच मतांनी,आवडींनी कशी बरे चालेल ?

असो हे सगळे विचार मला निरनिराळ्या नात्यांनी जोडल्या गेलेल्या माझ्याच व्यक्तींनी शिकविले. ही माझी सगळी जोडली गेलेली नाती , काही प्रत्यक्ष तर काही फोनने  संवाद साधून त्यासाठी आपला स्वतः चा बहुमोल वेळ खर्चून ह्या नात्यांमधील प्रेम,जिव्हाळा, गोडी अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी पुढाकार घेतात हे पण खरेच. ह्या संपर्काने,बहुमोल वेळ देउन साधलेल्या सुसंवादाने विचारांच्या आदानप्रदानातून कित्येक अडचणींमधून परस्परांना योग्य दिशा,वाट मिळवून देतो आणि मग हे नात्यांचे बंध अधिकच दृढ आपोआप होतात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments