सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत)
विविधा
☆ “जुई…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆
बकुळ फुलांनो हळूच या,जुई माझी विसावलीय जरा!नका करू दंगा मस्ती,दुरूनच न्याहाळा तिच्या बंद पापण्यात विसावलेलं आकाश! खरंच तिला तुम्ही अलवार जोजवा हं !थोडया विसाव्यानंतर ती नक्कीच टवटवीत होईल तिच्या नाजूक बहराला घेऊन,मादक सुगंधासह विहारण्यास वाऱ्याच्या झुळकीवर स्वार होऊन आणि मग अवघा आसमंत एक होईल!तिच्या मादक गंधात दरवळून निघण्यासाठी!गंधात आत्ताच न्हाऊन आलीय ती! तिच्या मोहिनीने वेडावून तिमीर सुद्धा बघा कसा दाट होऊ पाहतोय…हवं तर खात्री करून घ्या,तिच्या गर्द कुंतलामधील मारव्याला हुंगुन!पण हळूच!स्पर्श केलाच आहे तिला तुम्ही
तर थोडं हितगूजही करून जा तिच्या गूढ भावनांशी,पण जरा सुद्धा धक्का लावू नका तिच्या हिरवाईने नटलेल्या स्वाभिमानरुपी देठाला कारण तिनं तिचा उभा जन्म साकारलाय तिच्या स्वप्नांना ओंजळीत सामावून घेण्यासाठी .मृदेतील प्रत्येक कणाशी मृदा बनून दोस्ती केलीय तिनं स्वतः फूल म्हणून जन्मण्यासाठी आणि ती जाणून ही आहे सूर्योदया पूर्वी पर्यंतच तिच्या क्षणभंगूर जगण्याच रहस्य.आणि बकुळफुलांनो तो बघा तो पवन कसा सावरत आहे तिच्या कुंतलाना हळुवार शीळ घालून, गात आहे अंगाई गीत, तिच्या निश्चिन्त निजेसाठी!कारण त्याला जाणीव आहे तिच्या निस्वार्थ जीवनप्रवासाची स्वतःला सिद्ध करणाऱ्या तिच्या अविरत कष्टाची!भाकरीचा चंद्र शोधून पिलांच्या ओढीन घरट्याकडे परतणारी पाखरे पण तिच्या जवळ येऊन पंखांची हलचाल स्थिरावून एक गिरकी घेऊन जात आहेत अंदाज घेऊन तिच्या निजेचा!
जरा धीर धरा बकुळ फुलांनो,तिच्याशी गप्पा मारायला. कारण सांजेला तिनं दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी ती थोड्याच वेळात जागी होईल,नवा सुगंधी जन्म लेवून आणि तिचा सगळा क्षिणवटा कुठल्या कुठे दूर पळून गेलेला असेल या छोट्या विसाव्याने!आणि गुंग होऊन जाईल ती मंद धुंद मारव्यासह गारव्याला साथीला घेऊन तुम्हा सख्यांशी हितगूज करण्यासाठी!
© सीमा ह. पाटील (मनप्रीत)
कोल्हापूर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈