सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “पुत्र व्हावा ऐसा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
कुठल्याही व्यक्तीचे जीवन यशस्वी, सफल,कृतार्थ झालं असं वाटत तेव्हा त्यामागे काही कारणं असतात. त्या कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या पुढील पिढीतील वारसदारांना, अपत्यांना आपण स्वतः, लोकांनी चांगला घडलायं असं म्हणणं. काही वेळेस अपत्य आपल्या पालकांशी खूप चांगले वागतात. परंतू त्यांची बाहेरील जगाशी वागणूक कोणी चांगलं नाव घेणारी नसते तर कधी मुलं बाहेरील जगाशी खूप चांगले वर्तन करतात पण प्रत्यक्ष आपल्या पालकांच्या प्रेमाचे ऋण जाणत नाही. परंतू माझ्या वाचनात, बघण्यात काही पालक,आईवडील असे आहेत की ज्यांना आपल्या अपत्यांमुळे आपलं जीवन धन्य झालं असं वाटतं. माझ्या माहितीत असलेल्या मातापित्यांमधील सगळ्यात धन्य पावलेले, कृतार्थ झालेले,समाधान संतोष पावलेले व सुख उपभोगलेले मातापिता म्हणजे शहाजीराजे आणि जिजाबाई,छत्रपती शिवाजीमहाराजांचे मातापिता.
दिनांक 6 जानेवारी 1665 ह्या दिनी जिजाऊंच्या शिवबाने त्यांची सुवर्णतुला केली. शिवाजीराजे छत्रपती जरी असले तरी आधी ते जिजाऊंचे शिवबा होते.
शिवाजीराजे एके दिवशी मातेच्या दालनात बसले असता बोलता-बोलता जिजाऊसाहेबांनी आपली एक इच्छा शिवबांजवळ व्यक्त केली होती. ‘येत्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने ग्रहण काळात मनसोक्त दानधर्म करण्याची आमची इच्छा आहे.’ यावर स्मितहास्य करत शिवबा जिजाऊंना म्हणाले, ‘आऊसाहेब आमचीदेखील एक इच्छा आहे. आऊसाहेब, तुम्ही आमच्या माताच नव्हे, तर प्रथम गुरू, निःस्पृह सहकारी व समयोचित सल्लागार देखील आहात. आजपर्यंत प्रत्येक प्रसंगात आपली साथ आणि आपला सल्ला आमच्यासाठी बहुमोल ठरलेला आहे. आपल्या प्रेरणेमुळेच आम्ही इथवर मजल मारु शकलो. लहानपणापासून आपण आमच्यावर स्वराज्याचेच संस्कार केलेत. आज आम्ही फक्त तुमच्यामुळेच घडलो व सर्व काही करू शकलो. तुमची शिकवण आणि मार्गदर्शन यामुळेच आम्ही इथवर आलो. आऊसाहेब हे स्वराज्य आहे ते फक्त आपल्यामुळेच. म्हणूनच या ग्रहणात आम्ही आपली सुवर्णतुला करण्याचे ठरवले आहे.’
ह्या शब्दांनी ती माता धन्य झाली. त्या आईला सुवर्णतुला होतेयं म्हणून आनंद झाला कारण हे मौल्यवान सोनं गोरगरीबांच्या तसचं अडल्यानडल्यांच्या कामी येऊन त्यांची गरज भागणार होती.हे उचित सत्पात्री दान ठरेल ह्याची जिजाऊंना खात्री होती.
तुला विधीसाठी महाराज सहपरिवार महाबळेश्वरला आले होते. त्यांच्यासोबत सोनोपंत डबीरही आले होते. आईसाहेबांच्या तुलेसाठी विपुल सोने महाबळेश्वरी रवाना झाले होते. महाबळेश्वराचे मंदिर माणसांनी भरून गेले होते. ग्रहणकाळ सुरू झाला होता. पुरोहितांनी वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली. शिवरायांनी पहाटेच्या मुहूर्तावर तुलेच्या रुपेरी पारड्यांची पूजा बांधली आणि शिवरायांनी आऊसाहेबांना पारड्यात बैठक घेण्याची विनंती केली.
महाराजांचा आधार घेत आऊसाहेब पारड्या जवळ आल्या. हळदी-कुंकवाची चिमूट सोडून नेहमीसारखे ‘जगदंब जगदंब’ म्हणीत आऊसाहेबांनी पारड्यात आपले भाग्यवान उजवे पाऊल ठेवले. जनता मोठ्या प्रेमाने
उत्सुकतेने हा मातृपूजनाचा सोहळा बघण्यास जमली होती. कित्येक जण तर केवळ आऊसाहेबांचे दर्शन घेण्याच्या अभिलाषेने आले होते.
नजर टाकाल तिकडे गर्द हिरवी वनश्री, मंदिरातील मंगल वातावरण, मंत्रघोष चालू आहे. पंचगंगा खळाळत वाहत आहेत आणि ह्या साऱ्यांच्या मधोमध एक मुलगा आपल्या आईला सोन्याने तोलून धरीत आहे. खरेच कल्पनेतसुद्धा ह्या विहमंग दृश्यांने डोळे पाणवतात. जिजाऊंना एका पारड्यात बसवले होते. दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरा टाकल्या जात होत्या. तुला दानाबरोबर विधीवत मंत्रोच्चार होऊ लागले होते. तुला होताना जिजाऊंना खूपच समाधान वाटत होते.
तुलादानानंतर हे सर्व सोने गरीब रयतेला वाटून टाकले होते. दृष्ट लागेल असा सोहळा महाबळेश्वरी पूर्ण करण्यात आला होता. आपल्या मातेची दानधर्माची इच्छा अभिनव पद्धतीने शिवरायांनी पूर्ण केली होती. शिवरायांच्या अतुलनीय मातृप्रेमाची महती साऱ्या महाराष्ट्राने डोळे भरून पाहिली होती.
आपल्या पुत्राचे अलौकिक प्रेम पाहून जिजाऊ धन्य धन्य झाल्या होत्या. माय-लेकरांचे हे प्रेम पाहून सारी रयत धन्य धन्य झाली होती. राजमातेने भरल्या डोळ्यांनी आपल्या लेकराला आशीर्वाद दिला होता. महाराजांच्या भावविश्वातील एक सोहळा पार पडला होता. आईसाहेब शिवबाला प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, आशीर्वाद कायमच देत आल्या होत्या. तुला झाल्यानंतर जिजाऊंनी आपल्या लेकरासाठी उदंड आयुष्य मागितले होते.
मातेच्या बरोबरच राजांनी सोनोपंत डबीर म्हणजे अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न,ह्यांचीपण तुला करण्याचे मनावर घेतले. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात .ही तुला पार पडली.
खरोखरच धन्य त्या जिजाऊ, धन्य ते शिवराय आणि जिवाला जीव देणारी ती माणंस
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈