सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “नाते जुळले…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
आपल्याकडे सहसा नातं म्हणजे जन्मापासून रक्ताचं असलेलं वा विवाहानंतर जोडल्या गेलेलं. ह्या संकल्पनेवरच आधारित नाती टिकतात, तीच योग्य असतात ही आपली संस्कृती शिकविते. परंतु विदेशात मात्र ह्या नात्यांइतकच किंबहुना मनाचे मनाशी जुळलेले नातं, पटणारे विचार ह्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. आपल्या संस्कृतीत वर उल्लेखल्या प्रमाणे आपल्याकडे असणाऱ्या नात्यांना मान्यता असते.परंतु विदेशात मात्र तसं नसतं तिकडे अजून एक नात ह्या नात्याइतकचं किंबहुना जरा काकणंभरं जास्त सुद्धा जपल्या जातं, मानल्या जातं. हा भिन्न संस्कृती मधील विचारांचा फरक आहे. अर्थातच प्रत्येकाला आपापले विचार, आपापलं वागणं,आपापली संस्कृती हीच योग्य असं वाटत असते. प्रत्येक भिन्न टोकांच्या गोष्टींमध्ये काही प्लस आणि काही मायनस पाँईंट हे असतातच.
ह्या नात्यांच्या गुंफणीवरुंन मला एक मस्त गोष्ट वाचलेली आठवली. अर्थात गोष्ट आहे विदेशातील. तिकडच्या वहिवाटीप्रमाणे अनोख्या नात्यांमधील एका महत्वाच्या नात्यांनी जोडल्या गेलेली एक जोडगोळी “लव्ह इन रिलेशनशीप” मध्ये एकत्र राहात असते. अर्थातच हा निर्णय घेतांना त्यांचे पटणारे विचार त्यांच्या जुळणा-या आवडी ह्यांना विशेष प्राधान्य देऊन एकमेकांवर भरपूर प्रेम करीत पण एकमेकांची स्पेसही तितकीच महत्वाची हे ओळखून ही जोडगोळी आपल्याच विश्वात दंग होऊन एकत्र गुण्यागोविंदाने, प्रेमानं राहातं होती,आपल्या भाषेत नांदत होती. ह्यामध्ये अजून एक गोष्ट सामावली होती,किंबहुना ती गोष्ट होती म्हणूनच ते एकत्र आले होते,राहात होते,ती गोष्ट म्हणजे प्रत्येक बाबतीत परस्परांवर असलेला दृढ विश्वास. हा दृढ विश्वासच त्यांना
त्यांच्या प्रेमाची खात्री पटवून देत होता. दृढ विश्वास ठेवणे आणि अपेक्षांचा अतिरेक न करणे ह्या दोन्ही गोष्टी दोन्हीही कडून काटेकोरपणे पाळल्या मात्र जायलाच हव्यात.
प्रत्येकाच्या जीवनात चढउतार हे असतातच. सगळे दिवस हे सारखे न जाता त्यात विवीधता सामावलेली असते.अर्थात असं असतं म्हणूनच हे जीवनं निरस,सपक न वाटता छान जगण्याची ओढ वाटतं असलेलं आणि आव्हानात्मक हवहवसं वाटतं. ह्या जोडगोळी मधील त्या दोघांची नाव तो “जीम”आणि ती “मेरी”.
तर जीम आणि मेरी ह्यांची आपापली कामं ,आपापल्या नोक-या ह्या सूरू असतांना त्यात अडचणी पण असतातच परंतु त्यातून मार्ग काढीत ही मंडळी आपल्याला हवा तसा आनंद मिळवत असतं,तो मनापासून स्विकारुन जीवन आनंदात घालवतं होते. नोकरी सुरू असतांना वाढत्या महागाई मुळं जीमला त्याची कमाई ही अपुरी पडायला लागली. नोक-या, महागाई, संकटांना तोंड देणं,त्यातून मार्ग काढणं ह्या गोष्टी तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा ,ह्या अटळच. जीम ठरवितो आज काहीही झालं तरी पगारवाढीबद्दल बोलायचचं. त्यामुळे
तो जरा सकाळपासूनच नर्व्हस असतो,ही मनातली घालमेलं मेरी ने ओळखलेली असते, नजरेनं सुद्धा टिपलेली असते. ती निघतांना काहीही न बोलता फक्त जीमच्या हातावर थोपटून त्याला दिलासा देते.काय नसतं त्या स्पर्शात, तो स्पर्श असतो भक्कम पाठिंब्याचा, काहीही झालं तरी टिकणा-या दमदार साथसंगतीचा.
बरेचदा आपण एखाद्या गोष्टीचा बाऊ करतो,टेंशन घेतो पण ती समस्या कधीकधी अनपेक्षितरित्या चुटकीसरशी सुटते.जीमने बाँसला पगारवाढीबद्दल बोलल्यावर बाँस ने जीमचं जीवतोडून कामं करणं आणि वाढती महागाई ओळखून त्याचा पगार जीमच्या अपेक्षेनुसार कुठलीही खळखळ न करता वाढवून दिला. मोठ्या आनंदाने जीम घरी जायला निघाला. त्याच्या येण्याच्या वेळी मेरी जेवणाची जय्यत तयारी करून ठेवते.आज सगळा मेन्यु साग्रसंगीत त्याला आवडणारा करते,त्याला जसं हवं असतं तसं प्रफुल्लित वातावरण तो घरी यायच्या वेळी तयार करते.ती पण तशी टेन्स मध्येच असते आज बाँस जीमला काय म्हणतोय ह्या विचारांनी.पण बेल वाजल्यानंतर मात्र ती आपला चेहऱ्यावरील ताण काढून टाकून प्रसन्न, हसतमुख मुद्रेने जीमचं स्वागत करते. जीम ची मनस्थिती आधीच प्रफुल्लित असतेच आणि आता ह्या विशेष आवडणा-या वातावरण निर्मीतीमुळे तो जास्त आनंदित होतो.मेरी त्याला टेबलवर सगळं त्याच्या आवडीचं सर्व्ह करते आणि मग टेबलवर त्याच्यासाठी स्वतः लिहीलेली चिठ्ठी ठेवते. जणू ती चिठ्ठी त्याची वाटच बघत असते. त्या चिठ्ठीत लिहीलं असत़ं,” मला खात्री होतीच हे यश तुला मिळणारचं .तुझं अभिनंदन आणि हो मी कायम तुझ्याबरोबर आहे.” त्याला खूप आश्चर्य वाटतं मेरीला पगारवाढीबद्दल आधीच कसं काय कळलं?
तो ह्या विचारात असतांना मेरी डेझर्ट आणण्यासाठी आत जातांना तिच्या गाऊन मधील खिशातून दुसरी चिठ्ठी पडते.ती चिठ्ठी उचलून जीम ती वाचतो आणि अतीव प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं. त्या दुसऱ्या चिठ्ठीत लिहीलं असतं “जीम काळजी करु नकोस,एकवाट बंद झाली तरी दुसऱ्या नवीन वाटा उघडतात, आपण ह्यातुनही मार्ग हा काढूच,मी कायम तुझ्याबरोबर आहे.” म्हणजेच काय तर मेरी ही कुठल्याही परिस्थीतीत त्याच्या बरोबरच असणार होती.आणि हा दिलासा, विश्वास आयुष्यभरासाठी पुरून उरतो.
खरचं कुठल्याही नात्याचं असं घट्ट बाँडींग असेल नं तर ते नातं तकलादू न राहाता त्याचा पाया हा भक्कमच राहात़ो. एक नक्की समजलं नातं हे कुठलही,कोणतही असो,सख्खं असो वा बंधनातून जुळलेलं त्याचा पाया हा खूप महत्वाचा.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈