श्री वैभव चौगुले
विविधा
☆ “वर्षाॠतू…” ☆ श्री वैभव चौगुले ☆
खूप प्रेम करतोय मी निसटणा-या वर्षाऋतूवर! रेत मुठीतून निसटून जाते. तसे हे वर्ष अखेर निसटून जाताना मला दिसत आहे. पण या वर्षअखेर मी शून्य होणार आहे. हे माझ्या मनाला सांगून ठेवले आहे. कारण दान देत रहावे. पुण्य कमवत रहावे. कर्म चोख आणि वचन निभवावे. असाच फंडा माझ्या जीवनाचा मी करून ठेवला आहे. सुखाला दु:ख आणि दु:खाला सुख टिकून देत नाही. हे मी खूपदा अनुभवले आहे. म्हणुन सुखदु:खाची नाळ माझ्या संयममय संघर्षाशी बांधून ठेवली आहे.
वेळ आहे. निघून जाणार! हे शेवटी अटळ सत्य! भावनांच्या हिंदोळ्यावर! किती स्वप्नझुले झुलताना मन हसते. चोरपावलांनी आलेल्या आधार शब्दलहरीवर हरेक झुला गगनाला भिडतो! वारा झोका देत असताना सांजवेळी बासरीची धून मारव्यासोबत समीप होऊन माझ्या मनाला साद घालते. वसुंधरेने नेसलेला हिरवा शालू, आभाळाच्या ललाटी दिसणारा सोनेरी टिळा! पाहत पाहत, नववधुचा शृंगार दवबिंदुंचा साज पांघरून इंन्द्रधनुच्या रंगात रंगून जाताना! माझे मन हरकून जाते. मनाच्या पैलतिरावर उन्मळून आलेल्या माझ्या भावना! मला आता कित्येक प्रश्न विचारू लागतात.
माझ्या खांद्यावरचे ओझे कुणीतरी उचलले! आणि मी मुक्तमोकळा श्वास घेत आहे. हे कल्पनेत नाहीतर! सत्यात उतरत पूर्ण झालेले स्वप्न! खरचं माझे हसून स्वागत करते. मी दिलखुलासपणे पाहत असतो. मी दिले काय? आणि मिळाले काय? याचा हिशोब मला सरते वर्ष देईलच! यात शंका नाही.
मी पूजा करतो. ती वर्षाऋतुची मूर्ती मंदिरातून गहाळ झाली. हे नियतीने दाखवून दिले. तेव्हा मी चोराला दोष दिला नाही. तर मीच ती मूर्ती कोरीव, सुभक आणि सुंदर घडवली. याचा मला खूप अभिमान वाटतो. यात चोराचे काही चुकले असेल! असे मला वाटत नाही. मग ती मूर्ती मनमंदिरी असो, वृंदावनी असो की एखाद्या नदी किनारी कदंबाजवळ असो! त्या मूर्तीसाठी शृंगाराची लेणी मी कोरून ठेवलेली आहेत. नवरसातले अमृत! मी माझ्या काळजात लपवून ठेवले आहे. फक्त मला या वर्षाऋतुसाठी गंधाळायचं आहे. इतकेच समजते! मनातून असा पाझर बाहेर येईपर्यत, अश्रू वाट अडवतात. अश्रूही अमृतमय होऊन जातात. मी एकदा अश्रू चाखून पाहिले आहेत. चव खारटचं! कोणता सागर त्या नयनरम्य परिसरामध्ये उसळत आहे! की वास्तवास आहे. मला अजून कळाले नाही. की त्या सागराचा किनारा कोणता? की किनाराच नाही. कसं सगळं समभ्रमीत ?
मी समर्पीत केलेले हरेक क्षण! माझा हेवा करतात. या वर्षाऋतूवर प्रेम करत असताना! मी खूप गोष्टींचा त्याग केला. या त्यागलेल्या गोष्टीशी तसा माझा कोणता घनिष्ठ सबंध नाही. नव्हता! म्हणून माझ्यापासून दुरावलेल्या गोष्टींची मला कधी साधी आठवणही येत नाही. आणि कधी येणारही नाही. एक ऋतू मनाला भावल्यानंतर नवे ऋतू, दहा दिशा अन् सहा सोहळ्यांच्या भ्रमीष्ठ भानगडीत कधी मी पडलो नाही. पडणारही नाही.
पतझड सावन बसंत बहार
एक बरस के मौसम चार मौसम चार
पांचवा मौसम प्यार का इंतजार का…
असे गुनगुनणारे माझे मन! नेहमी वर्षाऋतुच्या वाटेवर नजर रोखून असते. वचनबध्द, साचेबंध असलेले! माझे मन जरी थोडेफार हेकेखोर, गर्विष्ठ असले तरी ते दगाफटका करणारे नाही. याची खात्री मला आहे. शब्दांनी आधार मिळतो. पण कर्तव्याचं आणि जबाबदारीचे ओझे मात्र कमी होत नाही. त्याला समोर येऊन! हातभारच लावावा लागतो. मनानी करावे गुन्हे! अन् शरीराने भोगावी शिक्षा! हा न्यायनिवाडा मला मान्य नाही. ओंजळीतल्या सरींना! मी खाली पडून देणार नाही. की माझ्या जीवनरेखा कुणाला पुसून देणार नाही. ज्या भावनांनी मी चित्र रेखाटले. ज्या वैभवमय रंगांनी मी चित्र रंगवले. ते चित्र मी कोणत्या प्रदर्शनात मांडणार नाही. त्या वैभवमय झालेल्या चित्राला जगण्यासाठी लागणारा श्वास माझ्या श्वासातूनच देत राहीन! रोज नव्याने रंग भरत राहीन! या चित्राची जागा मनाच्या खोल कँनव्हासवरच असेल आणि राहील.
जुन्या विचारांची पाने झडून गेल्यानंतर! चैतन्यमय विचारांच्या नवपालवीचे स्वागत करायला! मी सज्ज होणार आहे. ऋतुच्या मनराईतून प्रेमफुलांच्या कळ्या उमलू लागतात. तेव्हा मनभावनांच्या सुगंधी उत्कंटतेला आवर मला घालता येत नाही. हे तितकेच खरे आहे. चोरीला गेलेली मूर्ती पवित्र राहील! कारण तिच्या चरणी मी रोज सत्यफुले वाहिली होती. म्हणतात मूर्ती निर्जीव असते. पण मी माझ्या वर्षाऋतूमध्ये जीव ओतला आहे. त्यामुळे माझ्या भावनांची जाण नक्कीच वर्षाऋतुला असणार कदाचित! गतवर्षाऋतुची कात टाकताना! माझा ऋतू मी वसंतास बहल करेन! मग तो ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत की शिशिर असो! ऋतू सूर्यावर आणि महिने चंद्रावर ठरतात! निसर्गाची किमया कुणाला माहीत नाही. वर्षाऋतुचा खेळही असाच! हा खेळ सावल्यांचा! यामधल्या सावल्यांना मुखवटे नसले तरी भावना मात्र मी ओळखत असतो. सावल्यांच्या लपंडावामध्ये नेहमी वर्षाऋतूवर का डाव येतो! हे कळत नाही. की ती टाईमप्लीज म्हणून डाव अंगावर ओढून घेते. हे ही समजत नाही.
पण माझे ऋतू आणि महिने माझ्या स्वाभिमानावर आणि माझ्या वेळेवर, परतीच्या क्षणांवरच ठरत असतात.. किंभवना मी ठरवत असतो. आणि वर्षाऋतुचा शृंगार करण्यास शिंपल्यातले मोती वेचून भावस्पर्शाच्या ओंजळीत साठवत असतो. वर्षाऋतुच्या प्रतीक्षेत….!!!!!!!
© श्री वैभव चौगुले
सांगली
मो 9923102664
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈