सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “गांधीजी…एक स्मरणगाथा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
आज 30 जानेवारी,. गांधीजींची पुण्यतिथी. स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी महात्मा गांधी ह्याचं नाव अग्रस्थानी घेता येईल.आपल्या आधीची पिढी जास्त भाग्यवान. त्यांनी अशा अनेक थोरपुरूषांची कामगिरी स्वतः बघितली, जवळून अनुभवली.आमच्या पिढीपासून बाकी सगळ्यांना त्यांची थोरवी वाचून त्यांची महती कळली.मात्र आमच्या पिढीपासून कोणाला पारतंत्र्याची झळ पोचली नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांच्या अहिंसा, सत्यवचन,द्रुढनिर्धार ह्या गुणांपैकी सगळ्यात जास्त मला भावलेला गुण म्हणजे त्यांचे सत्यवादी असणे.
कधी आपण आपल्या स्वतः च्या भुमीकेसाठी स्वतःच्या नजरेतून योग्य असतो,तेव्हा कदाचित दुसऱ्याच्या नजरेतून आपण चुकीचे असतो.पण आपले अंतर्मन आपल्याला सत्य सांगत असते फक्त ती स्विकारण्याची आपल्यात ताकद हवी.खूपदा आपण आपल्या चूका मनातल्या मनात कबूल करीत असतो पण ती जगासमोर मांडण्याचे धारिष्ट्य आपल्यात नसतं.आणि इथेच आपल्या सारख्या सामान्य माणसापेक्षा ह्या सत्यवादी महापुरूषाचे वेगळेपणं उठून दिसतं.
अगदी कधीही वेळात वेळ काढून महात्मा गांधींचे आत्मव्रुत्त म्हणजेच “सत्याचे प्रयोग”हे पुस्तक वाचा.त्यात त्यांच्या हातून घडलेल्या चूका त्यांनी नुसत्या सांगितल्याच नव्हे तर पुस्तकात छापून जगजाहीर केल्या आहेत.सहसा केलेल्या चूका लपविणारी खूप माणसे बघितली पण आपल्या चूका कोणाला माहीत नसूनही पुढच्या कित्येक पिढ्यांसमोर जगजाहीर होतील हे समजून उमजून देखील पुस्तकांत छापणारा अवलिया आगळावेगळाच.
गांधीजींवरील पु. ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेले पुस्तक पण खुप वाचनीय. वाचले नसेल तर जरूर वाचा एवढच म्हणेन.
खरोखरच अशा वेगवेगळ्या गुणांच्या छटा असलेले अनेक थोरपुरूष या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झटले,लढले म्हणून आजचा हा स्वातंत्र्यात असलेला सोनियाचा दिन आम्हा लोकांना दिसतोय.अशा ह्या सगळ्या थोरपुरूषांना आमचे कोटी कोटी प्रणाम.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈