श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “आनंद — रन आऊट होण्याचा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
क्रिकेट समजणाऱ्यांना रन आऊट म्हणजे काय हे सांगायला नको. खरंतर खेळतांना आऊट होण्यात आनंद नसतोच. या पध्दतीने आऊट होण्याचं दु:ख वेगळच असतं.
पण तरीसुद्धा काहीजण आपल्यापेक्षा समोरच्याला महत्व देत केवळ समोरच्याला चांगली संधी मिळावी, त्या संधीचा त्याने उपयोग करावा, मी पुढच्या वेळी प्रयत्न करेन, पण आज तु मिळालेली संधी सोडू नकोस हां आणि असाच विचार करत काहीवेळा स्वतः असं रन आऊट होण्याचा धोका पत्करतात.
असा स्वतः आऊट होण्याचा धोका परत्करणारे आपले असतात. आणि हे आपले आपल्या रोजच्या खेळात, सतत असतात. मग ते आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ, बहिण, काका, मामा, मावशी, आत्या इ…… थोडक्यात सगळे नातेवाईक आणि मित्र असतात.
थोडक्यात आपलं मोठं होण्यासाठी, आनंदासाठी, भविष्यासाठी, चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी असे स्वत:हून रन आऊट होण्याचा धोका परत्करणारे जे कोणी असतात त्यांच्यामुळे आपण काही प्रमाणात आपला डाव सावरत आणि साकारत असतो. तो डाव चांगला झाल्यावर ……..
कोणीतरी रन आऊट होण्याचा धोका पत्करून आपला डाव सावरला आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.
असं आऊट होतांना त्यांनी त्यांचा वेळ, आनंद, आवडणाऱ्या गोष्टी, छंद, काही प्रमाणात सुख, आराम हे स्वत:हून सोडलेलं तर असतंच. पण हे सोडण्यात त्यांना आनंद आणि समाधान असतं. या गोष्टी सोडण्याच्या त्रासात सुध्दा ते एक वेगळा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि वेळोवळी तो आनंद व्यक्त करतात.
आणि याचा उल्लेख ते करत नाहीत. केला तर क्वचित करतात. आणि त्यातही यातून समोरच्याने मिळवलेल्या यशाचा, केलेल्या प्रगतीचा, दाखवलेल्या हिमतीचा, आणि प्रेमाचा आदर या ऊल्लेखात असतो.
अशा पध्दतीने रन आऊट होण्याची संधी जवळपास प्रत्येकाला मिळते. फक्त त्या वेळी आपण रन आऊट व्हायचं का करायचं हे ठरवाव लागतं.
ज्याला हे समजलं आणि उमजलं तो रन आऊट झाल्यानंतर सुध्दा जिंकत असतो………..
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈