सौ राधिका भांडारकर
☆ “श्रीमंतांची चलती तेथे गरिबांची गळचेपी…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
*श्रीमंतांची चलती येथे गरिबांची गळचेपी* ही ओळ मुळातच समाजातील विषमता दर्शवते. श्रीमंत आणि गरीब असे दोन निराळे भाग पाडते. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरीचे दर्शन घडवते. शिवाय श्रीमंत कसे पाॅवरफुल आणि गरीब कसे बिच्चारे, दुर्बळ असा एक मनोभेद अधोरेखित करते. नकळतच एकीकडे तिरस्कारयुक्त भावना आणि त्याचवेळी दुसरीकडे सहानुभूतीचा एक दृष्टिकोन आपोआपच तयार होतो.या ओळीत अवरोध आहे. उपहास आहे.
या विषयावर लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मनात एक सहज विचार आला की श्रीमंत कोणाला म्हणायचे आणि गरीब कोणाला म्हणायचे? श्रीमंत आणि गरीब यांच्या नक्की व्याख्या कोणत्या? ढोबळमानाने आपण असं म्हणूया जे धनवान आहेत, ज्यांच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, जमीन जुमला आहे, ज्यांच्या पायाशी जणू लक्ष्मी लोळण घेते ते श्रीमंत आणि ज्यांना सकाळ संध्याकाळच्या जेवणाची ही भ्रांत आहे, अन्न— वस्त्र— निवारा या प्राथमिक गरजांपासून जे वंचित आहेत ते गरीब.
यापेक्षा अधिक निराळ्या व्याख्याही असू शकतात. श्रीमंत ते आहेत ज्यांच्या हाती सत्ता आहे. आणि गरीब ते आहेत ज्यांना सत्ताधारींच्या हाताखाली गुलामगिरीचे जीवन जगावे लागत आहे आणि अशा अहंकारी, अरेरावी करणाऱ्या, सत्तेचा माज असलेल्या लक्ष्मीपुत्रांकडून गरिबांची मुस्कटदाबी होते, गळचेपी होते. लाचारी आणि मानहानीचे जीवन त्यांना जगावे लागते आणि अशा श्रीमंत माणसांच्या मनोवृत्तीमुळे ही दरी अधिकाधिक रुंदावत जाते.
तरीही नक्की कोण किती श्रीमंत आणि कोण किती गरीब हे एका व्यापक सामाजिक दृष्टीतून पाहिले तर ते ठरवणे ही कठीण आहे. ते बरंचसं भोवतालची परिस्थिती, त्या त्या समाजातलं त्यांचं असणं, जीवन पद्धती आणि गरजा यावरही अवलंबून आहे.म्हणजे बघा मी माझ्या मदतनीसाबरोबर माझ्या आर्थिक स्थितीशी तुलना केली तर मी श्रीमंत आहे पण मी माझी अंबानीशी तुलना केली तर गरीबच नाही का? थोडक्यात या आर्थिक स्थितीचं हे गणित काहीसं रिलेटिव्ह आहे.
तुलनात्मक आहे.
मी मुंबईत किंग जाॅर्ज हायस्कूल मध्ये काही काळ शिक्षिका होते. सातवीपर्यंतच्या मुलांना मी भाषा हा विषय शिकवत असे. त्यावेळी मी मुलांना *गरिबी* या विषयावर निबंध लिहायला दिला होता. एकीने लिहिलेला निबंध माझ्या अजूनही लक्षात आहे.
तिने लिहिले होते,
“नंदा माझी मैत्रीण आहे. ही माझी मैत्रीण खूप गरीब आहे. त्यांच्याकडे खूप जुन्या मॉडेलचा फ्रिज आहे. त्यांच्या हॉलमधला गालीचा फाटलेला आहे. त्यांच्या बंगल्यांच्या भिंतींना रंग लावलेला नाही आणि त्यांच्याकडे फक्त एकच गाडी आहे.” आणि असे बरेच काही तिने लिहिले होते जे वाचून मला हसावे की रडावे समजेना. आणि मग जाणवले की श्रीमंतीतच वाढणार्यांना गरिबी कशी समजणार? गरिबी ही एक सोसण्याची स्थिती आहे. “जावे त्याच्या वंशा आणि त्यांनाच कळे” अशी परिस्थिती आहे.
तेव्हां श्रीमंतांची चलती येथे गरिबांची गळचेपी हा या मनोवृत्तीचा परिणाम आहे.
श्रीमंत नेहमीच पुढे जातात आणि गरीब मागे राहतात. *दाम करी काम* किंवा *रुपया भवती फिरते दुनिया* असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे नाही. कारण ती सत्य परिस्थिती आहे. पैशाने सारे काही विकत घेता येते. दुनिया उलट पालट करता येते. पैशाचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की कुठल्याही क्षेत्रातलं यश त्यांच्या मुठीत येऊ शकते. पैशाने मतं विकत घेता येतात, सत्ता बळकावता येते, पदवी, नोकरी मिळवता येते,काहीही प्राप्त करण्याचं उद्दीष्ट असू दे ते सहज साध्य होऊ शकते आणि अशा रीतीने पैशाला पैसा जोडला जातो.मात्र याच बाबतीत नेमकी निर्धन माणसाची गळचेपी होते. तो गुणी आहे, लायक आहे, पात्र आहे. केवळ निर्धनतेमुळे लाचार आहे. गरिबांसाठी मात्र परिस्थितीच्या मर्यादा आड येतात त्यांच्याभोवती सारीच विरोधातील प्रतिकूल परिस्थिती असते. आणि या प्रतिकूल परिस्थितीला ओलांडण्याची ताकद नसल्यामुळे जीवनात होणाऱ्या गळचेपीला पर्यायच न उरल्यामुळे सामोरं जावं लागतं.
जेव्हा आपण म्हणतो समाजात भ्रष्टाचार वाढलाय पण हा भ्रष्टाचार एकतर्फी नसतो. त्यात दोन घटक असतात एक देणारा आणि एक घेणारा. देणाऱ्याचा खिसा भरलेला असतो आणि घेणाऱ्याचा रिकामा. पुन्हा या घेणाऱ्यांमध्ये विविध वृत्ती जाणवते, काहींना एका रात्रीत श्रीमंत व्हायचे असते. पैशाचा लोभ असतो. भोगवादी वृत्ती साठी हा शॉर्टकट असतो. पण काही घेणारे मात्र खरोखरच लाचार असतात, त्यांना जीवनात अनेक संसारिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी केवळ,प्रचलीत स्पर्धेला तोंड देण्यासाठी, असहाय्यतेमुळे हे करावे लागत असेल. मनातल्या स्वप्नपूर्तींची गळचेपी किती सहन करायची या भावनेतूनही हे होत असेल. अर्थात हे समर्थनिय नाही. पण हे एक सामाजिक सत्य आहे हे नाकारता येत नाही.
गरिबांच्या गळचेपी विषयी काही भाष्य करताना मला सहजच एका प्रसंगाची आठवण झाली.
मी कॉलेजमध्ये होते. माझ्या कॉलेजच्या इमारती जवळ काही बांधकाम चालू होतं. आजूबाजूला खडी, सिमेंट, वाळूचा पसारा पडला होता आणि बरेच मजूर तिथे काम करत होते. त्यातला एक मजूर अत्यंत संतप्तपणे बोलत होता. त्याचे एक वाक्य जाता जाता माझ्या कानावर पडलं आणि ते आजही माझ्या आठवणीत आहे…
“ अरे मेरे भैय्या! हम सेठ के तो सेठ नही है लेकिन हमारे दिल के तो सेठ है ना? छोड दुंगा एक दिन मैं ये सब!”
कुठल्यातरी प्रचंड असंतोषातून हे वाक्य त्याच्या तोंडून त्याच्या मनातली आग ओतत होती.
आणि आता असंतोष या शब्दापाशी माझं मन येऊन ठेपतं. गळचेपीतूनच असंतोषाचा भडका उडतो.
श्रीमंत आणि गरीब यामधल्या दरीचा विचार करताना आणखी एक विचार मनात येतो.
श्रीमंतांचे वर्ग आहेत.
काही गर्भ श्रीमंत असतात, काहींना वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळतो तर काही मात्र शून्यातून स्वतःची धनराशी जमवतात. सर्वसाधारणपणे ज्यांना आयती संपत्ती मिळालेली असते ते उर्मट, अरेरावी, जुलमी, सत्तांध असतात (काही अपवाद असू शकतात)आणि ते नेहमीच त्यांच्यापेक्षा कमी आर्थिक बळ असलेल्यांवर रुबाब करतात. त्यांच्या जरुरीचा फायदा उठवतात, त्यांना ताब्यात ठेवतात. त्यांच्यावर हुकूम गाजवतात. पण बऱ्याचदा जे शून्यातून वर येतात त्यांना गरिबीची जाण असते आणि ते त्यांची गरिबी दूर करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्यात धैर्य, चिकाटी, आत्मविश्वास,जिद्द, विरुद्ध दिशेने जाण्याची क्षमता असते. असे लोक उत्पादक ठरतात आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या श्रमिकांच्या जबाबदारीची त्यांना जाणीव असते. त्यामुळे या दोघांमधल्या आर्थिक अंतराला मानवतेचे रूप मिळते. इथे देणारा —घेणारा आपुलकीच्या नात्याने जोडले जातात.
आपण नेहमी म्हणतो श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब गरीबच होत जातो. कधी मनाला प्रश्न विचारा असं का?
आपल्यावर लहानपणापासून असेच संस्कार झालेत.
*अंथरूण पाहून पाय पसरावेत*
*ठेविले अनंते तैसेच राहावे*
*हाती नाही बळ त्याने फुलझाड लावू नये*
या संस्कारांचा मनापासून आदर राखून मी म्हणेन की का नाही आपण आपले अंथरूण विस्तारावे?
का स्काय इज द लिमिट आपल्या स्वप्नांसाठी नसावे?
हातातले बळ वाढवण्याचा का नाही प्रयत्न करावा?
चांगल्या मार्गाने श्रीमंत होताच येत नाही.
तत्वांची प्रचंड गळचेपी करावी लागते.हाही एक समाजमान्य विचार.
क्षणभर लटक्या अस्मितांचे पडदे थोडे दूर सारून आपल्या अंगभूत गुणांचा विकास करून, समाजात एक छान आदर्श उदाहरण आपण रचू नाही का शकत?
मला असे सांगावेसे वाटते श्रीमंती विचारांची असावी.जो विचारांनी समृद्ध तो खरा श्रीमंत. आणि वैचारिक दारिद्र्य माणसाची दैना करते. गळचेपी करते.
जाता जाता एकच किस्सा सांगते. लेख लांबच चालला आहे याची कल्पना आहे तरी सुद्धा…
मी स्वतः एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले म्हणजे गरिबीची झळ पोचली नाही पण श्रीमंतीचा तोराही अनुभवला नाही.
माझ्या वर्गात ज्योती ताम्हणे नावाची श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी होती. त्या बालवयात मला जगातली ती सर्वात भाग्यवान व्यक्ती वाटायची आणि माझ्या वाटेला का नाही असे भाग्य असेही वाटायचे. माझा नंबर पहिल्या पाचात असायचा तिचा पंधरावा विसावा असा असायचा. पण तरी वर्गात तिचा खूपच रुबाब असायचा. ती माझी वर्ग मैत्रीण होती पण मी तिच्या खास ग्रुप मध्ये नव्हते. खूप वेळा तिच्यापुढे मला न्यूनगंड जाणवायचा. मी तिच्या जीवन पद्धतीपर्यंत कधीच पोहोचू शकत नव्हते.मला दु:ख व्हायचे.
पण आज जेव्हा मी त्या वेळच्या माझ्या मानसिक स्थितीचा विचार करते तेव्हा जाणवतं की मी जर कधी काही हट्ट केला असेल त्यावेळी, तर वडिलांनी तेव्हां असे कधीच म्हटले नाही की,” बाबी आपल्याला हे परवडण्यासारखे नाही.”
मनातून त्यांना मी दुखावलं असेलही. पण ते म्हणायचे,” कर दुनिया मुट्टी मे ..अपना हात जगन्नाथ ही भावना ठेव मग तुझ्या जीवनातही अशी पहाट उगवेल.”
म्हणूनच, *श्रीमंताची चलती येथे गरिबांची गळचेपी* ही सामाजिक भावनाच बदलण्याची गरज आहे. गळचेपी न्युनगंडामुळे जाणवते.म्हणून थिंकटँक बदलला पाहिजे. सोपं नाही पण अशक्यही नाही.
मुळातच हा विषय परिसंवादाचा आहे या विषयाला दोन बाजू आहेत. एक नकारात्मक आणि एक सकारात्मक. कोणी कसा विचार करायचा हे व्यक्तीसापेक्ष आहे.
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈