श्री वैभव चौगुले
विविधा
☆ “मेघ…” ☆ श्री वैभव चौगुले ☆
मनाच्या उंबरठ्यावर खूप गर्दी होती. मेघ दाटल्यासारखे मनातले आभाळ भरून आले होते. फक्त डोळ्यातून अश्रू वाहणे राहिले होते. नजर कोणत्याच नजरेला मिळालेली नव्हती. वीज जेव्हा क्षणार्धात धरणीचे चुंबन घेते. आणि क्षणातच तिच्या कवेतून पसार होते. अशी भेट बहुदा झाल्यानंतरच असवांची वाट मोकळी होणार होती.
मनातल्या दाटलेल्या आभाळाच्या मनात खूप काही लपून होतं. गरज होती आभाळ रितं होण्याची आणि मेघ अश्रू वाहण्याची. काळेभोर ढग का साटतात? कसे तरंगतात? हवे तिथे बरसतात का? की नको तेथे कोसळतात आणि कोसळेलच तर का ? असे प्रश्न माझ्या मनात का उपस्थित होतात. मला कळत नाही.
कुणाला काय घेणे, देणे त्या दाटलेल्या ढगांचे आणि वाहणा-या आसवांचे! तहानलेल्या भावनांची तहान आसवांनी मिटेल का ? की तहान भागवण्यासाठी किती वेदनांची दारे ठोठावयाची यालाही काही मर्यादा आहे की नाही? डोक्याला फेटा जितका वेळ राहतो, तेवढेच सुख वाटेला येते. फेटा उतरला की दु:ख पुन्हा सिंहासनावर येऊन बसते. सुख दु:खाच्या या लपंडावात किती बुध्दीबळाचे प्यादे, हत्ती, घोडे, उंट, वजीर मारले जातात. अखेर राजा ही चुकत नाही. कारण या डावात एक हारल्याशिवाय दुसरा जिंकणार कसा? एकाला हारावेच लागते हा नियमच आहे. किती नियमात राहू…की बरसून जाऊ मेघ होऊन एकदा त्या मुक्ततेने कोसळणा-या सरींसारखा! की वादळ होऊ आणि साठलेली काळजावरची धूळ उडवून टाकू! म्हणजे काळीज कसे आहे, हे तरी समजेल!
बरसल्यावर निदान मृदगंधातून तरी हृदयापर्यत पोहचता येईल. बाहेरून कसं ओळखायचं मन, की कोणत्या फोटोमध्ये किंवा कोणत्या सेल्फीमध्ये दिसेल हे मन! श्वासातून क्षणभर मनाला स्पर्श करून मृदगंधाला सोबत घेऊन, मनापर्यत पोहचून मनाशी हितगूज करून पुन्हा श्वासातून बाहेर येता तरी येईल. क्षणभर का होईना निखळ मनामनांची भेट होईल. शेवटी हा आभासचं!
आभाळ भरलेले असताना कबूतरांची जोडी खिडकीच्या आस-याखाली येवून बसताना दिसली. गुटरगुटर आवाज करत चोची जवळ चोच आणत जणू येणा-या संकटावर मात कसे करायचे? याचा विचार करत होते की काय? की सुटलेला गार वारा, मौसमातला थंडावा, ऋतूहळवा, प्रितीचा बहर, कुठेतरी पाऊस चालू असताना वा-या सोबत वाहणारा मृृदगंधचा स्वाद घेत प्रेमाचे संवाद करत असतील. याचा विचार माझ्या मनात येत होता. कोण आपल्याला पाहतं का? तसेतर वेळ्ला किती महत्व आहे आपल्याला माहीत आहे. मिळालेला वेळ ते हितगूज करण्यात घालवतात. एकमेकांना काय हवं काय को याची विचारपूस करतात हे काय कमी आहे का? या जिवंत उदाहरणाकडे मी एकटक पाहत बसलो होतो.
चहा मला करायला येतो. या वेळी घरात कोणीच नव्हतं. मी चहा बनवायला घेतला. मला चहा जास्त लागत नाही. मी अर्धा कपच चहा घेत असतो. तो माझ्या मनाप्रमाणे व्हावा हे अपेक्षित असतं. दूध थोडसं, चहा पावडर, चिमूटभर साखर सोबत आल्ह किसून टाकलं आणि उकळी येऊन दिली. चहा गाळून घेतला, चहाचा कप हातात घेऊन खिडकीतून त्या कबूतराच्या जोडीकडे बघत गालातल्या गालात हसत ऋतुराजाच्या या प्रेमळ देखाव्याच्या स्वागतासाठीच जणू मी सज्ज झालो होतो.
आता हा मेघराजा कसं बरसणार, हे दाटलेले आभाळ मोकळे होताना वीज कितीदा धरणीला चुंबनार, आणि कितीदा मखमली जखमा करून सोडून जाणार, या कबूतराची जोडी माझ्या खिडकीच्या आस-याला थांबणार, की अजून कोणता आसरा शोधणार, हा वादळवारा गारवा देणार की डोक्यावरचे छप्पर घेऊन जाणार हे शेवटी प्रश्न ते प्रश्नचं……..चहा संपला आणि शेवटी माझ्याकामाकडे मी वळालो….
© श्री वैभव चौगुले
सांगली
मो 9923102664
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈