सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “’सलाम’ आणि बरंच काही…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट☆
प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वयापरत्वे, काळापरत्वे बदलत जातात. वाचन ही आपली प्रमुख आवड असली तरी त्याचे विषय, लेखक हे हळूहळू बदलत जातात. साहित्याची मुळातच आवड असल्याने अशाच वयाच्या एका वळणावर पाडगावकरांच्या कवितांची जबरदस्त फँन होते,नव्हे अजूनही आहेच म्हणा. नुकताच मंगेश पाडगावकरांचा स्मृतीदिन झाला. त्यांना आणि त्यांच्या साहित्यातील योगदानाला कोटी कोटी प्रणाम.
प्रत्येक भाषा आणि त्या त्या भाषेतील सौंदर्य हे वेगवेगळं असतं.त्या भाषांमधील साहित्याची एकमेकांत तुलनाच होऊ शकत नाही. परंतु सगळ्यात प्रिय म्हणालं नं तर बहुतेक प्रत्येकाला आपली स्वतःची मायबोलीच असते. ह्या मायबोलीलाच मायमराठी म्हणू वा मातृभाषा म्हणू. मला तर ह्या मराठीमधील साहित्य वाचतांना अतीव समाधान, आनंद भरभरून मिळतो.कुठल्याही क्लिष्ट विषयाचे आकलन आपल्याला आपल्या मातृभाषेतून चटकन होतं.आपल्या स्वतःच्या भाषेतील भावना ह्या चटकन जाऊन थेट ह्रदयापर्यंत जावून भिडतात. इतकचं कशाला आपण परप्रांतात गेलो असतांना तिकडे सर्रास दुस-या भाषेचा प्रघात असतांना अचानक कुणी आपल्याशी आपल्या मातृभाषेतून संवाद साधला तर इतकं समाधान,इतका अत्यानंद होतो की अगदी ते “कलेजेमे ठंडक”ह्याचा अर्थ अगदी पुरेपूर समजून येतो.असा अनुभव आम्ही बरेचदा तिरुपती ला गेल्यावर घेतलायं.
पाडगावकरं ह्यांच्या कवितांनी अक्षरशः मराठी रसिक दर्दी प्रेक्षकांना वेड लावलं होतं, नव्हे वेड लावलं आहे.त्यांच्या कवितांबद्दल बोलतांना अक्षरशः बावचळून जायला होतं. कारण त्यांची अमूक एखादी रचना आपल्याला खूप आवडते अस वाटतं नं वाटतं तोच त्यांची दुसरी एखादी काव्य रचना मनाला अधिक स्पर्शून जाते.परत तिसरीच एखादी कविता हळूवारपणे पणे मनाच्या अगदी आतील कप्प्यात शिरुन बसते तर चौथीच एखादी कविता खदखदून हसायला लावून शेवटी खोल विचारात आणून सोडते.त्यांना त्यांच्या “सलाम” ह्या कवितेसाठी 1980 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तसेच महाराष्ट्रभूषण व पद्मभूषण हे मानाचे पुरस्कार देखील प्राप्त झालेत. दुबई येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविलं. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत ह्या दोन भाषांमध्ये एम.ए.केलं.श्री वसंत बापट, वि.दा. करंदीकर व पाडगावकरं ह्या त्रिमूर्ती ने एकत्र काव्यवाचन करण्याची प्रथा सुरू केली. त्यांनी स्वतःची अशी एक आगळीवेगळीच शैली निर्माण केली. वात्रटिका, उपरोधिक कविता, प्रेमाच्या कविता ह्यात त्यांचा हातखंडा होता. पाडगावकरांच्या खूप सा-या आवडणा-या कविता आहेत त्यापैकी काही पुढीलप्रमाणे, “जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा, “सलाम”,”चिऊताई चिऊताई दार उघड”,”सांगा कसं जगायचं”,”तुमचं आमचं सेम असतं”,ह्या रचना तर चिरकाल स्मरणात राहणाऱ्या आहेत. “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ह्या गाण्याने तर कित्येक जणांना नैराशेच्या खाईतून बाहेर काढले आहे.
साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१०मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्नण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी ‘कथारूप महाभारत’ या नावाचा दोन-खंडी अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत.
त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७ साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’ या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. आणि ‘ज्युलिअस सीझर’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’ या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतरे’ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टांत भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.
पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीत ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकामध्ये मीराबाईंचे चरित्र,जीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हटले आहे.
एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता ‘लिज्जत’ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, ‘आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?’ पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली. पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले.
पाडगावकरांनी मराठी बालकुमार साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन ह्यांचे अध्यक्षपद भुषविले. त्यांना सलाम ह्या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार,महाराष्ट्र भूषण पुरस्कार ,पद्मभूषण पुरस्कार,महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार प्राप्त झाले होते.
खरंच अशा महान विभूती आपल्यासाठी खूप सारा अनमोल खजिना ठेऊन गेलेत हे नक्की.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈