डाॅ. मीना श्रीवास्तव
विविधा
☆ ‘शाळेचा पहिला दिवस’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
नमस्कार मैत्रांनो!
आजच्या लेखाचा विषय भूतकाळातील मंतरलेल्या मोरपिशी दिवसांच्या रम्य आठवणींत गुंतवून टाकणारा! आठवतेय, उन्हाळी सुट्टीच्या एक एक क्षणाचा आनंद लुटून झाला. कधी मित्रमैत्रिणींबरोबर खेळ, गप्पा टप्पा, तर कधी मामाच्या गावाला जाणाऱ्या आगगाडीत सफर, झालंच तर एखाद्या रम्य ठिकाणी घालवलेले आनंददायी दिवस, अगदीच कांही नसेल तर भावंडांबरोबर घरीच राहून केलेली मजा अन लुटीपुटीची भांडणे! एक ना दोन! एक मात्र खरे, यांत ‘अभ्यास’ नामक गनिमाला अजिबात एन्ट्री नव्हती. हेच तर उन्हाळ्याच्या सुट्टीच्या सुखसागरात मनसोक्त पोहण्याचे गमक आणि ‘गमभन’ होते.
बदलत्या काळानुसार या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांचे तंत्र थोडे वेगळे झाले. अभ्यासक्रमानुसार (स्टेट, सी बी एस इ अथवा आय सी एस इ इत्यादी) सुट्यांचे वेळापत्रक अन शाळा सुरु होण्याची तारीख थोडीफार वेगळी झाली. मात्र त्यातला आत्मा अबाधितच राहिला आहे हे महत्वाचे! इयत्तेनुसार या पहिल्या दिवसाचे स्वागत करण्याचे मुलांचे अन पालकांचे वेगळे गणित असते. नर्सरी अन के जी वगैरेत जाणाऱ्या चिमुकल्या मुलांचे बहुदा रडणे जास्त कॉमन, शाळेत जातांना गोड हसत आईला निरोप देणारे गोजिरवाणे बाळ फक्त टी व्ही वर असते असे मला वाटते. आईच्या पदराला (किंवा ओढणीला) गच्च पकडत ‘मी नाही जात’ असा घोष करीत मूल शाळेच्या ‘मावशीबरोबर’ एकदाचे आत जाते. अशा वेळेस आत्तापर्यंत मुश्किलीने रोखलेले अश्रू माऊलीच्या डोळ्यातून घळ घळ वाहायला लागतात.
कांही शाळांत (फक्त) ‘पहिल्या दिवशी’ गेट पासून तर वर्गापर्यंत मुख्याध्यापिकेपासून तर शिक्षक अन शिक्षिका दुतर्फा गुलाबाची फुले घेऊन मुलांचे स्वागत करायला अटेन्शन मध्ये उभे असतात. त्यांचे चित्रीकरण बऱ्याचदा आपण बघतो. मला हे बघून पोलिसांच्या ‘सौजन्य सप्ताहाची’ आठवण येते. यातला छुपा अजेंडा जाणती अन हुशार मुले लगेच ओळखतात. गुलाबाचे काटे उद्यापासून कसे अन केव्हां बोचकारणार याचा ते अंदाज घेत असतात. (शारीरिक इजा नाही बरे का, आता नियमावली नुसार ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे सर्व कालातीत विचार समजावेत!)
मुले शाळेत पहिल्या दिवशी जायला बहुदा इतकी उदासीन का असतात? घरी मुक्तपणे खेळणे, बागडणे, खाणे पिणे अन झोपेच्या वेळा इच्छेनुसार ठरवणे, झालेच तर मोबाईल, टीव्ही, मॉल, चित्रपट बघणे असे विस्कळीत अन बहुदा अनियोजित टाइमटेबल, या सर्वांची सवय मुलांना जर सुट्टीत सवय लागली तर शाळेकरता अचानक घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागणारच. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून आईचा उठ रे बाळा/ उठ ग राणी असा (सुरुवातीला) मधाळ तगादा सुरु होतो. अन मग त्यापुढे सर्व रुटीन! ‘काय कटकट आहे!’ हा ऍटिट्यूड घेऊन शाळेच्या प्रथम दिवसाचे स्वागत कां होते मुलांकडून? हा विचार मला नेहमी व्यथित करतो. या उलट शाळेच्या प्रथम दिनाची मोजकी मुले वाट पाहत असतात. वरच्या इयत्तेत गेल्याचा अपरिमित आनंद असतो, चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले असल्यास हा आनंद अभिमानाने उजळून निघालेला असतो. सक्काळी सक्काळी लवकर शाळेचा नवा कोरा युनिफॉर्म (वयाबरोबर उंची वाढल्याने नवा युनिफॉर्म अत्यावश्यक असतोच), वर्षभर वापरून झालेले जोडे, दप्तर, कंपास, वॉटर बॅग इत्यादी नव्या दिवसाचे स्वागत करायला कसे चालतील? तेही नवे कोरेच हवेत! मंडळी या नव्या आयटम्सच्या गर्दीत कव्हर घातलेली नवथर सुगंधाने रसरसलेली नवीन वर्षाची पुस्तके यांच्याहून अधिक रोमांचक काय असू शकते बरे?
जर इयत्ता बदलली तर यासोबत अनोळखी वर्गमित्र, वर्गशिक्षिका, नवीन वर्ग आणि नवीन बसायची जागा! मुले हे सगळे हळू हळू अनुभवायला लागतात अन मग त्यातील ‘गंमत जंमत’ मजेने स्वीकारायला लागतात. सर्वात मुख्य म्हणजे शाळेचा पहिला दिवस सगळीकडे ‘ओरिएंटेशन’ (अभिमुखता) चा असतो. त्या दिवशी फक्त सर्व नवीन गोष्टींची पहिली ओळख करून देणे हे शिक्षकांचे महत्वाचे कार्य असते.
शाळेतील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘मधल्या सुट्टीतील डब्बा’! प्रत्येक मुलाच्या डब्यात कांहीतरी वेगळे असते, मला वाटते मुलांच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार केला तर ‘भाजी पोळी’ ला पर्याय नाही. रोज वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या दिल्या तर मुलांना त्या खाण्याची सवय लागते. या बाबतीत एक आठवले, आमच्या लहानपणी डब्यात रोज सुक्की बटाटा भाजी असायची. इतर भाज्यांच्या आवडीबद्दल आम्हा भावंडांचे कधीच एकमत व्हायचे नाही. कधी काचऱ्या, कधी खूप कांदे घालून, तर कधी फक्त मिरचीची फोडणी देऊन उकडलेल्या बटाट्यांची भाजी इतकीच व्हेरायटी असायची. मात्र आई याची भरपाई रात्रीच्या जेवणात वेगवेगळ्या भाज्या खायला घालून करीत असे. गंमत अशी की बहुदा सर्वांच्या डब्ब्यात बटाटा असूनही प्रत्येक बट्टूची चव मात्र निराळी असे. आजकाल आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या मुलांच्या डब्यात काय काय व्हरायटी असते हा स्वतंत्र लेखनाचा विषय ठरावा. मात्र मुलांची शारीरिक आणि मानसिकरित्या जोमाने जोपासना करायची असेल तर आईने ‘मधल्या सुट्टीचा जेवणाचा डब्बा’ याविषयी आहारतज्ञाच्या भूमिकेत जाऊन ‘इष्ट भोजन’ रांधण्याची गरज नक्कीच आहे.
एक बदल निश्चितच जाणवतो, तो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते! आमच्या लहानपणी प्रायमरी शाळेत एकच शिक्षक किंवा शिक्षिका वर्षभर सर्व विषय शिकवत असत. त्यांना अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांची समग्र माहिती असायची, एक सुंदर भावनिक नाते गुंफले जायचे. पुढील वर्षीच्या पहिल्या दिवशीच जर ते शिक्षक वर्गावर नसतील तर विद्यार्थ्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटायचे. आता मात्र विषयानुसार तेच शिक्षक पुढील वर्षी भेटत राहतात. इमोशनल बॉण्डिंगचे प्रमाण कमी झालेले वाटत असले तरी, मायेचा ओलावा अजूनही निश्चितच टिकून आहे असे मला वाटते. एक सुचवावेसे वाटते. पालकांनी आपल्या मुलाचा/ मुलीचा मागील वर्षीचा धडधाकट असलेला गणवेश, पुस्तके आणि शाळेला लागणाऱ्या इतर वस्तू नुसत्याच फेकून न देता गरजू मुलांना द्याव्यात. यासाठी डोळस नजरेने बघितले तर, ही गरजवंत मुले आपल्या आसपासच आढळतील, अथवा अशा कामात हातभार लावणाऱ्या समाजसेवी संस्था देखील उपलब्ध आहेत. हे समाधान आगळे वेगळे असते.
मंडळी, हा शाळेचा पहिला दिवस अगदी नवसंजीवनी दिल्यासारखा पालकांनाच नव्हे तर, प्रत्येकाला सुखदायी वाटतो. जून महिना असला तरी वसंत ऋतू असल्याचा भास होतो. वेगवेगळ्या वयाच्या अन विविध रंगांच्या नव्या कोऱ्या गणवेशात, नवे दप्तर, नवी पुस्तके, नवा कंपास, नवी वॉटरबॅग अन डबे यांच्या जामानिम्याने नवथर उत्साहाने सळसळत बागडणारी गोड गोजिरी मुले शाळेच्या बस मध्ये, रिक्षात किंवा पायी जात असतात. मित्र मैत्रिणींसोबत त्यांची ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशी अवस्था होत असते. कधी तर जिवलग मैत्रिणीसोबत ‘गमाडि गंमत जमाडि जंमत ये ग ये सांगते कानांत’ असे प्रायव्हेट संभाषण सुरु असते. मग त्यांचे आल्हाददायी बोलणं अन किंचाळत केलेला कल्ला देखील पक्षांच्या कलरवासारखंच मधुर वाटत असतं. जणू कालपावेतो उन्हाने कोमेजून गेलेल्या बागेत आज अवचित नवचैतन्य आलंय, वृक्षवेलींना नवीन पालवी फुटलीय अन रंगीबेरंगी फुलांचे उमलले आहेत, त्यांच्या सुगंधाने अख्खी बाग मोहरून गेलीय असे जाणवते. मैत्रांनो, चला तर मग बिगी बिगी! आपण देखील ‘मातीला सुगंध फुलांचा’ या परिपाठाप्रमाणे या नवोन्मेषात ‘शाळेचा पहिला दिवस’ साजरा करीत आपल्या बालपणात हरवून जाऊ या!
धन्यवाद!
डॉ. मीना श्रीवास्तव
मोबाईल- ९९२०१६७२११
टीप- एका समूहगीताची लिंक जोडत आहे.
‘आनंदाची शाळा आमुची आनंदाची शाळा’ (स्वाध्याय)
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈