विविधा
☆ “घरचा तांदूळ, प्लॅस्टिकचा तांदूळ ते कॅन्सरचा तांदूळ !” लेखक – श्री विनय जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
यावर्षी भातशेती लावावी का नाही, प्रश्न होता. दरवर्षी भात लावणारे आमचे लोक विविध कारणाने वेंगलेले होते. आधीच कोकणी खेडेगावात लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. त्यात शेतीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, मग तरीही भात लावलं आणि ते जून व्हायची वेळ आली की “वराहरूपं” आपले कारनामे दाखवतात. आमच्या बाजूला खाजण आहे, त्यात डुकरांच्या वसाहती आहेत. भाताचं पीक जून व्हायला लागलं की त्याचा घमघमाट सुटतो आणि डुकरांचे तांडे शेतात येऊ लागतात. यांच्या राठ केसात माश्या, गोचड्या आणि नारूचे जंत (टेप वर्म) असतात. त्यामुळे डुकरांना खूप खाज सुटते. मग ते तयार होत असलेल्या भात शेतात सामूहिक लोळतात! ओल्या शेतात लोळून भाताचा पेंढा, लोंब्या आणि ओली माती अक्षरशः एकजीव होऊन जाते!
रिपरिप पावसात केलेली लावणी, जमवून आणलेले मजूर आणि केलेले कष्ट धुळीस मिळालेले बघून शेतकरी रडायचा बाकी राहतो! अशा समस्त समस्यांमुळे यावर्षी भात लावायचं नाही हे जवळपास निश्चित होतं.
तेवढ्यात जालगावच्या विश्वासदादा फाटक यांचा मेसेज आला. त्यांना तांदुळात प्लास्टिकचे तांदूळ मिळाले! त्यांनी तांदूळ पाण्यात टाकले तर काही तरंगले म्हणून वर आलेले तांदूळ तव्यावर गरम केले, ते जळायच्या ऐवजी वितळून गेले! मी चार पाच वर्षांपूर्वी केरळमध्ये जप्त केलेल्या चिनी प्लास्टिक तांदुळाबद्दल ऐकलं होतं. पण प्रत्यक्षात असे कुणी बघितले, हे पहिलंच उदाहरण होतं.
यावरून मनाने परत एकदा उचल खाल्ली! भात लावूया असं ठरलं. याची पहिली तयारी खर्च किती केला आणि तांदूळ किती पिकला याचा हिशोब कागदावर मांडायचा नाही, असा निश्चय केला!
स्वस्त तांदूळ आणि कॅन्सर एक्स्प्रेस!
भातशेती परवडत नाही, मजूर मिळत नाहीत, घरचा तांदूळ महाग पडतो, बाजारात यापेक्षा स्वस्त तांदूळ मिळतो अशा विविध कारणांनी कोकणात भातशेती बंद पडली आहे. दराचा मामला खरंच सत्य आहे. घरी पिकवलेला तांदूळ बाजारी तांदुळापेक्षा दुपटीने, तिपटीने महाग असतो. पण तो तांदूळ येतो कुठून? आणि तो पिकतो कसा?
पंजाबच्या “माळवा” भागातून राजस्थानात रोज जाणारी बठिंडा बिकानेर पॅसेंजर रेल्वे ‘कॅन्सर एक्स्प्रेस’ नावाने कुप्रसिद्ध आहे. एकूणच पंजाबातील जमीन आणि भूजल कीटकनाशकांच्या अती वापराने विषारी झालेलं आहे. विषारी अन्न, पाण्यामुळे कॅन्सर आणि रासायनिक प्रदूषणाने मतिमंद मुलांचं प्रमाण तिथे अफाट आहे. त्यातही बठिंडा कॅन्सरबाबतीत सगळ्यात पुढे आहे. ही ट्रेन सर्वाधिक कॅन्सर पेशंट घेऊन रोज राजस्थानात जाते. भारताचं गहू आणि तांदुळाचं कोठार म्हणून आपण ज्या पंजाबला ओळखतो, त्या पंजाबची ही अवस्था आहे. असा पंजाबी तांदूळ भारतात सर्वत्र रेशन दुकानातून पोचत असतो!
आता कल्पना करा एका बाजूला प्लॅस्टिकचा तांदूळ, दुसऱ्या बाजूला कीटकनाशकांचा अतिरेकी, अवैज्ञानिक बेसुमार वापर करून पिकवलेला (नासवलेला?) पंजाबी तांदूळ आणि तिसरीकडे घरी पिकवलेला सकृतदर्शनी “महागडा”, “परवडत नसलेला” तांदूळ यापैकी कोणता श्रेयस्कर?
स्वतःची भातशेती असणं भाग्याची गोष्ट. त्यात ती शेती करायला कष्टाळू माणसे मिळणं अजून भाग्याची गोष्ट आणि त्यात बाजारभावापेक्षा जास्त खर्च येणार असला तरी तो खर्च करायला खिशात पैसे असणं ही त्याहून मोठ्या भाग्याची गोष्ट! सध्या तरी या तीन भाग्यांचा “त्रिवेणी संगम” झालेला आहे. त्यामुळे बंद पडता पडता शेती लावली गेली आणि अशीच पुढेही लावली जाईल, अशी अपेक्षा आहे!
🐗
‘वराहरुपं’चं काय करायचं?
अत्यंत उपद्रवी, चिक्कार पिलावळ जन्माला घालणारा रानडुक्कर हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीत आहे! अनेक विनोदी सरकारी कायद्यापैकी हा एक कायदा! यामुळे रानडुक्कर मारून त्याचं मांस खाल्ल्यास किंवा विकल्यास गावातला कुणी चुगली करतो. मग वनविभाग सक्रिय होतो, पोलीस मागे लागतात आणि शिकारी स्वतःच शिकार होतो! यामुळे आता डुकराची शिकार क्वचित होते. परिणामस्वरूप आमच्या बागांमध्ये येऊन डुकरं नारळ सोलून टाकतात, नारळाची रोपं उकरून खालचा नारळ फोडून खातात, भाजीचा अळू उकरून त्याचे कंद खातात! भातशेतीत लोळून नासधूस करतात, अक्षरशः ५% भात हाती लागू देत नाहीत, अशी अवस्था आहे! पण तरीही डुक्कर “संरक्षित प्राणी” आहे!
डुकरं म्हणजे चार पायांचा जेसीबी असतो, समोर नांगराच्या फाळासारखा सुळा, अफाट ताकद आणि बेडर! समोर माणूस आल्यास सुळ्याने मांडी फाडून जातो. याला नियंत्रणात ठेवायचा एकमेव मार्ग ‘शिकार’ हाच आहे. यावर्षी वनविभागाला लेखी पत्र देऊन हजार डुकरं मारायची योजना मी केली आहे. शिवाय केंद्र सरकारमध्ये पाठपुरावा करून पाच वर्षांसाठी डुक्कर संरक्षित प्राण्यांच्या यादीतून काढण्यासाठी पाठपुरावा करत आहे!
शेवटी जी गोष्ट आपण संपूर्ण वर्षात सर्वाधिक खातो तो तांदूळ, कोणत्याही मार्गाने स्वतः पिकवून खाणे हाच सध्या तरी सर्वोच्च प्राथमिकता असलेला कार्यक्रम आहे. नाही तर कठीण अवस्था होणार आहे. छोट्या छोट्या शहरात सुद्धा सध्या कॅन्सरची साथ आल्यासारखी कॅन्सरप्रभावित लोकांची संख्या दिसते. त्याच्या मुळाशी ‘विषारी अन्न’ हेच सर्वात मोठं कारण आहे.
🌾🌾🌾🌾
येणाऱ्या काळात येईल त्या प्रत्येक समस्येला उत्तर शोधत, पडीक टाकलेल्या कोकणी शेतजमिनी परत एकदा डौलदार भातपिकाने हिरव्यागार झालेल्या दिसतील, असा मला विश्वास वाटतो!
लेखक : श्री विनय जोशी
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈