सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ श्रावण मास… एक उत्सव पर्व…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

सख्या रे श्रावणा…

रुणुझुणु पैंजण वाजे क्षणात

झरझरणारी तुझीच धारा

थरथरणारा अधीर वारा

पडघम वाजती नाद घुमे गगनात

रुणुझुणु पैंजण वाजे क्षणात

माझ्या काव्यातून उतरणारा हा श्रावण आणि याचे सौंदर्य, त्याचबरोबर याचे असलेले सांस्कृतिक महत्त्व, याला असलेले अध्यात्मिक स्थान आपण प्रस्तुत लेखात पाहूयात. पौर्णिमेच्या मागेपुढे श्रवण नक्षत्र येते. म्हणून श्रावण नाव असलेल्या या महिन्याला नभ व सावन ही उपनावे असून नागपंचमी, मंगळागौर, श्रीकृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, पिठोरी अमावस्या या सण व उत्सवांचा आनंद श्रावणात मिळतो.

श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचा उत्सव संपन्न करतात. मुलींचे लग्न झाल्यावर पहिले पाच वर्षे हे व्रत घराघरात संपन्न करतात. त्यानिमित्ताने समाजातील सुवासिनींना आमंत्रित करून त्यांना भोजन घालणे व ओटी भरणे, रात्री मंगळागौर जागविणे हे कार्यक्रम होतात. त्यानिमित्ताने स्त्रिया संघटित होतात. आज-काल तर मंगळागौरीचे खेळ करताना स्त्रिया समाज प्रबोधनही मोठ्या प्रमाणात करत आहेत. उत्सवाचा आनंद घेत समाज प्रबोधन करणारा हा सण आहे.

श्रावण मासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे

बालकवींनी श्रावण मास या कवितेमध्ये ऊन पावसाचा खेळ खेळणाऱ्या या श्रावणात सगळीकडे असलेल्या हिरवळीमुळे मन कसे प्रसन्न होते याचे सुरेख वर्णन केले आहे. मंगळागौरीच्या पूजेची पत्री फुले गोळा करणाऱ्या मुलींचे सुंदर वर्णन केले आहे 

सुंदर परडी घेऊन हाती 

परोपकंठी शुद्धमती 

सुंदर बाला या फुलमाला 

रम्य फुले पत्री खुडती

रात्री मंगळागौरीला सोळा वातींची आरती ओवाळतात, कहाणी वाचतात, खेळ, नृत्य, फुगड्या, झिम्मा आधी प्रकाराने गौरीची आळवणी करून अखंड सौभाग्याचे वरदान मागतात.

श्रावण सोमवारी महादेवाची षोडशोपचार पूजा करतात. एकदा अन्न सेवन करून उपवास करतात. श्रावणातील शुक्रवारी जिवतीची पूजा करून आपल्या मुलाबाळांना सुख समाधान लाभावे म्हणून जिवतीची कहाणी सांगतात. मुलांना ओवाळतात. तसेच श्रावणातील शनिवार हा शनि देवाचे स्मरण व्हावे म्हणून मुंजा मुलाला जेवू घालून साजरा केला जातो.

कृतज्ञता हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे सर्वम खल्विदम् ब्रह्म हा भाव असलेल्या भारतीयांनी पशुपक्षाची ही कृतज्ञ भावाने पूजा करण्याची प्रथा निर्माण केली. दूध देणाऱ्या गाईसाठी वसुबारस. शेतीची कामे करणाऱ्या बैलासाठी बैलपोळा तर शेतीचे उंदरापासून रक्षण करणाऱ्या नागासाठी नागपंचमी.

सर्पाणाम् अस्मि वासुकि:॥ अनंतस् चस्मि नागानाम्॥

भगवान श्रीविष्णूच्या तमोगुणातून नागाची निर्मिती झाली. नागाचे मानव जातीवर अनंत उपकार आहेत. श्रीविष्णुला क्षीरसागरात बसण्यासाठी स्वतःच्या अंगाचे आसन करणारा शेषशाही नाग. विष प्राशन केल्यावर अंगाचा दाह नाहीसा व्हावा म्हणून आपल्या थंड शरीराचे वेटोळे घालून भगवान शंकरास आनंद देणारा नाग. गोकुळात यमुनेच्या डोहात राहणाऱ्या कालियाच्या विषामुळे अनेक गाई, गोप मेल्याने भगवान गोपालकृष्णाने कालीयाला शिक्षा करून यमुनेतून हाकलून दिले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा आणि त्याची स्मृती म्हणून नागपंचमीचा सण घराघरात संपन्न केला जातो.

माझ्या माहेरी (मुरुडला) माझ्या बाबांच्या घरी श्रीयाळ षष्ठी म्हणजे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी मोठा उत्सव असतो. सकाळी सात आठ कुंभार घरी येतात काळी माती व राख मिसळून एक छान मातीचा किल्ला तयार करतात. त्याला सजवण्यासाठी करडई लावतात. वेगवेगळ्या फुलांनी त्याला सजवतात मग तो सुरेख चार बुरुजांचा वाडाच जणू दिसतो त्यामध्ये नागोबा ठेवतात व सर्वांच्या दर्शनासाठी तो ठेवला जातो. या दिवशी सासुरवाशीणी मुली आपल्या माहेरी येतात व 

चल ग सखे…. वारुळाला वारुळाला गं…. नागोबाला पूजायाला पूजायाला गं

हे गाणे म्हणत फेर धरतात. फुगड्या, झिम्मा खेळतात झाडाला झोके बांधून झोके घेतात. घरात नागोबाला दूध लाह्या वाहतात. औट घटकेच्या राज्यानंतर गौर सासरी जाणार म्हणून तिला वळवटाची खीर व कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो. हे कशासाठी तर त्या गौरीने वळून वळून परत माहेरी यावे ही सुरेख भावना यामागे आहे. श्रियाळ नावाच्या राजाचे राज्य म्हणजे श्रियाळ षष्ठी ह्या साडेतीन घटकात माझ्या बाबांचे घर माणसांनी गजबजून जाते. पुरुष पान सुपारीला व गौराईच्या दर्शनाला येतात तसेच स्त्रिया भरजरी साड्या दाग दागिने घालून फेर धरतात. गाणी म्हणतात. गौरीच्या विसर्जनाला जाताना खरोखरीच लेक सासरी जात असल्याचा भास होतो व सर्वांचे डोळे भरून येतात. लेकीची पाठवणी करतात तसे बँडबाजा सोबत वाजत गाजत गौरीला निरोप देऊन परत आल्यावर सर्व सुवासिनींची लाह्यांनी ( ज्वारीच्या ) ओटी भरली जाते. व कार्यक्रमाची सांगता होते. ग्रामीण भागात गावोगावी हा नागपंचमीचा सोहळा पहावयास मिळतो. नागपंचमीला राखी पंचमी असेही म्हणतात सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळे या गावी नागदेवतेची फार मोठी यात्रा भरते.

याच महिन्यात येणारा आपला राष्ट्रीय सण म्हणजे १५ ऑगस्ट ज्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्या मंगल दिनाची स्मृती म्हणून स्वातंत्र्य दिन संपन्न केला जातो. या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज उभा करून देशाचे पंतप्रधान ध्वजवंदन करून राष्ट्राला संबोधित करतात. आपल्या देशाला सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांचे बलिदान आठवण्यासाठी व स्वातंत्र्याचे मोल आपल्या सर्व पिढ्यांना समजावे यासाठी १५ ऑगस्ट हा दिवस आपण साजरा करतो. प्रत्येक भारतीयांच्या मनात हीच भावना असते…. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा।

 येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महाबल:।

तेन त्वां अनुबंध्नानमि रक्षे मा चल मा चल॥

या मंत्राचा उच्चार करून बहीण भावाच्या हातात, भावाने आपले रक्षण करावे या सद्भावाने राखी बांधते. रक्षाबंधनाचा सण अनादी कालापासून चालत आला आहे. असूरांबरोबर युद्ध करताना आत्मविश्वास गमावलेल्या इंद्राला इंद्राणीने श्रावण पौर्णिमेला राखी बांधली त्यामुळे त्याला आत्मविश्वास आला व त्याने असूरांचा पराभव केला. त्या मंगल घटनेची स्मृती म्हणून रक्षाबंधनाचा सण संपन्न केला जातो. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये चक्रव्यूह भेदण्यासाठी जेव्हा अभिमन्यू निघाला तेव्हा कुंतीने त्याला राखी बांधली असा महाभारतात उल्लेख आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावण पौर्णिमा असते. त्या दिवशी सागराची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला उचंबळणारा सागर श्रावण पौर्णिमेला शांत होतो अशी कोळ्याची श्रद्धा आहे. आपल्या या सागरबंधूने मासे पकडण्यासाठी सागरात गेलेल्या आपल्या पतीचे रक्षण करावे म्हणून कोळ्यांच्या महिला सागराला राखी सोडतात व कोळी लोक सागर पूजन करून श्रीफळ अर्पण करतात. याच दिवशी यज्ञोपवित (जानवे) बदलण्यासाठी श्रावणी हा विधी संपन्न केला जातो.

कर्षति आकर्षति इति कृष्ण:।

जो सर्वांचे आकर्षण करतो तो कृष्ण. श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्र, बुधवार, चंद्र वृषभराशीत असताना रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. असा कृष्ण आमचे आराध्य दैवत आहे. जो एक प्रेमळ सखा, भाऊ, प्रियकर, पती ह्या प्रत्येक रूपामध्ये आज आमच्या मनात विराजमान आहे. श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे.

जन्म कर्म च मे दिव्यम्॥

माझा जन्म व कर्म सर्वच अद्भुत आहे. मी सर्वात असून कोणातही नाही आणि कुणाच्या कर्मात वा प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही तर सर्वांना स्वातंत्र्य देतो. मला हाक मारणाऱ्या द्रौपदीसाठी मी वस्त्र घेऊन धावत येतो तर मला न विचारता द्यूत खेळणाऱ्या युद्धिष्ठीराचेच दुःख मी निवारण करण्याच्या भानगडी पडत नाही कारण कर्म करणाऱ्यांनी त्या कर्माचे प्रायश्चित्त भोगले पाहिजे. अनन्य भावाने शरण येणाऱ्या भक्ताची मी कधीही उपेक्षा करत नाही. धर्माला ग्लानी आली, सज्जनांना त्रास होऊ लागला तर मी जन्म घेतो.

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥

परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥

श्रीकृष्णाचे स्मरण व्हावे. त्यांच्या कार्याची महती पुढच्या पिढीला कळावी यासाठी आपण श्रीकृष्ण अष्टमी साजरी करतो. घरोघरी मातीचे गोप, गोपी, यशोदा इत्यादी सारे गोकुळ तयार केले जातात. मातीच्या पाळण्यामध्ये गोपाळकृष्ण व बलराम यांचा जन्मोत्सव केला जातो. डिंक वडा व सुंठवडा यांचा प्रसाद दिला जातो. श्रीकृष्णाचा पाळणा म्हटला जातो. सारे गोविंदा मिळून दहीहंडी फोडतात. समाजाचे एकत्रीकरण व त्यातून संस्कारक्षम उत्सव संवर्धन गोकुळाष्टमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घडून येते. बासरीचे स्वर, गोपीप्रेम, गीताज्ञान व निरपेक्षवृत्ती असलेले पूर्ण पुरुष भगवान श्रीकृष्ण भारतीयांचा आत्मा आहे.

श्रावण वद्य अमावस्येला बैलपोळा, मातृदिन व पिठोरी अमावस्या या सणांचे आयोजन केले जाते. बलिवर्द या संस्कृत शब्दापासून बैल हा शब्द निर्माण झाला. वृषभ, नंदी, बसव, गोपुत्र, कृषीमित्र, शिव वाहन या नावाने ज्ञात असलेला बैल प्रत्येक गावातील शिव मंदिरात असतो. या दिवशी शेतकरी बैलाला नदीवर नेऊन अंघोळ घालतात. अलंकार घालून मिरवणूक काढतात. घरी आल्यावर पूजा करून बैल व गाईचे लग्न लावून त्यांना पुरणपोळी खाऊ घालतात. या दिवशी बैलाकडून काम करून घेतले जात नाही.

बंदीगृहात असलेल्या देवकीने गोकुळात यशोदेकडे राहणाऱ्या गोपालकृष्णासाठी मातृदिनाचे हे व्रत केले. या दिवशी आई आपल्या मुलाला मागे उभे करून, मुलाच्या डोक्यावर अक्षदा टाकून अतीत कोण असे विचारते तेव्हा अतिथ मी आहे असे मुलाने म्हटल्यावर, आई पुरणाच्या पुऱ्या, गव्हल्याची खीर व निरांजनासहित ते वाण आपल्या मुलाला देते. या दिवशी आईला नवीन वस्त्रे देऊन तिचा सन्मान करण्याची प्रथा आहे.

ज्या महिलांना मूल होत नाही व झालेले मूल जिवंत राहत नाही अशा महिला पिठोरी अमावस्येचे हे व्रत करतात. नदीवर जाऊन अप्सरांशी व आपल्या घरातील चौंसष्ठ योगिनींच्या चित्राची पूजा करून खीरपुरीचा नैवेद्य दाखवून हे व्रत संपन्न करतात. याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात.

अशाप्रकारे श्रावण मासात पावसाच्या सरींबरोबर सणांच्या व उत्सवांच्या सरी देखील बरसत असतात व त्यात आपण चिंब भिजून जातो.

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments