सुश्री सुलभा तेरणीकर
अल्प परिचय :
- 28 वर्षे डिफेन्स अकाउंट्स मध्ये नोकरी.
- वृत्तपत्रे नियत कालिके यामधून नित्य आणि नैमित्तिक लेखन.
- स्वर-प्रतिभा या संगीत विषयाला समर्पित दिवाळी अंकाचे संपादन.
- चित्रपटाच्या संगीताच्या सुवर्ण युगाची चाहती, अभ्यासक, , मुलाखतकार, स्तंभ लेखिका..
- संशोधन, संपादन, शब्दांकन यात कार्यरत.
- गेली चार दशके सातत्याने लेखन करत आहे.
विविधा
☆ ‘वनदेवीच्या आश्रमहरिणी…‘ ☆ श्री सुलभा तेरणीकर ☆
या कहाणीतले आटपाटनगर आहे पुणे; पण ही कहाणी मात्र काहीच उणे नसलेल्या पुण्याची नाही. गतवैभवाच्या खुणा लोपल्याबद्दल खंत वाटणाऱ्या मनासाठी शाब्दिक सांत्वन नाही, विस्मृतीचं दु:खरंजन नाही; पण त्यात कालप्रवाहाची मोठी वळणे आहेत. पिढ्यांच्या उदयास्ताच्या पाऊलखुणा आहेत. ‘हिंगण्याच्या माळावर’ या कावेरीबाई कर्वे यांच्या छोटेखानी पुस्तकातून माझ्यासमोर एका शतकाने स्वतःभोवती गिरकी घेतल्याचे दृश्य साकारते. मला तेच सांगायची उताविळी होते. कावेरीबाई कर्वे म्हणजे महर्षी कर्व्यांच्या सूनबाई. भास्करराव कर्व्यांच्या पत्नी. या पुस्तकात त्यांनी स्त्रीशिक्षण संस्थेचा इतिहास अशा काही हृद्य, पण संयमी शब्दांत लिहिला आहे, की हातातून पुस्तक सोडवत नाही. तो इतिहास, भूगोल, संस्कृतीचा आलेख आहेच; त्याशिवाय समाजमनाचे स्फुरण त्यात ठायी-ठायी विखुरलेले आहे. काळाच्या हृदयात जपलेल्या घटनांचा वेध त्यांनी अशा जिवंत भाषेत घेतलेला आहे, की ती आपल्यासमोर घडलेलीच वाटते…
त्यांच्या घरंदाज भाषेच्या शैलीत अण्णांचे जीवनचरित्र, संस्था, विकासाचे टप्पे, दैनंदिन कार्यक्रम, विद्यार्थिनींच्या आठवणी, कार्यकर्त्यांची निरलस सेवा यांची सुंदर गुंफण केलेली आहे. ते सर्वच सांगायचा मोह होतो; पण त्यातल्या काही गोष्टी सांगायला हव्यातच.
१८९१ मध्ये धोंडो केशव कर्वे हे एक सामान्य माणूस होते, अशा शब्दांत सुरुवात करून शतायुषी, महर्षी, भारतरत्न डॉ. धोंडो केशव कर्वे या समर्पित व्यक्तीच्या जीवनाची, कार्याची, कर्तव्याची, कर्तृत्वाची सावली होऊन राहिलेल्या दीर्घायुषी संस्थेच्या इतिहासाची पाने त्यात उलगडतात.
हिंगण्याच्या रस्त्याबद्दल लिहितात- हिंगण्याचा रस्ता चालून येणं मोठं दिव्य असं. मृत्युंजय महादेवाच्या देवळापर्यंत कसाबसा रस्ता होता. त्यानंतर कालव्यावरून हिंगण्यास जावं लागे. बैलगाड्या जाऊन झालेल्या चाकोऱ्या व त्यात मिसळलेल्या पायवाटा हाच काय तो रस्ता. त्यावरून कोथरुडपर्यंत जाता येत असे. १९०९ मध्ये मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क सपत्नीक आश्रमाच्या भेटीला आले असता, लोकल बोर्डानं वनदेवीपर्यंत कसातरी रस्ता केला; पण तिथून कालव्यावरच्या पुलापर्यंत झालेल्या प्रचंड चिखलावर फळ्या टाकल्या होत्या. त्यावरूनच गव्हर्नरसाहेब व बाईसाहेब चालत आश्रमापर्यंत पोहोचले…
संस्थेच्या लोकांना मात्र या दिव्यातून नेहमीच जावं लागे. म्हणून संस्थेतल्या महादेव केशव उर्फ तात्या गाडगिळांनी १९१९ मध्ये एक मंडळ स्थापन केलं. त्याचं नामकरण ‘वेडपट मंडळ’ असं झालं. त्यात संस्थेच्या मुलीदेखील सहभागी झाल्या. दर रविवारी वनदेवीच्या डोंगरावर आठ वाजता सारे जमत असत. मग वर गेलं, की मोठमोठे दगडधोंडे उचलून उतारावरून खाली लोटले जात. पुढच्या रविवारी पुन्हा हाच उद्योग. मग टेकडीच्या पायथ्याशी जमा झालेल्या दगडगोट्यांना रस्त्यावरच्या खड्ड्यात टाकले जाई. त्यावर कुदळफावड्यांनी माती घालून सारखं केलं जाई. वर रणरणणारं ऊन, अणकुचीदार दगड, साप, विंचू याची तमा न करता अनवाणी पायानं ही वेडी माणसं राबत राहिली. पुढे त्याच वर्षी जिल्हा लोकल बोर्डानं रस्ता तयार केला आणि पुढे तर तो हिंगणे-पुण्याचा छानसा रस्ता तयार झाला.
आता पुणे- हिंगणे रस्त्यावरचे दुथडी भरून वाहणारे ते तीन ओढे नाहीत. काटेकुटे, खाचखळगे, अंधार, निर्मनुष्य रस्त्यावरचं भयदेखील नाही. वनदेवीचा डोंगरदेखील कापला गेला आहे. सिमेंटच्या जंगलानं त्याला गिळलं आहे. रस्त्यावरचे पुरातन वटवृक्षही गेले आहेत आणि त्यांनी धरलेल्या सावल्याही नाहीत. त्यावरचे पक्षी उडून गेले आहेत आणि त्या आश्रमहरिणी देखील गेल्या… स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संस्थेत शिकायला आलेल्या मुली शतकापूर्वी येण्याजाण्याच्या रस्त्यावर श्रमदान करीत; पण ते वेडपटांचं मंडळही गेलंच.
अण्णांच्या साठाव्या वर्षीची १९१८ची नोंद कावेरीबाई लिहितात-
वाढदिवसाला अण्णांचे मोठे बंधू भिकाजीपंत कर्वे मुद्दामहून आले होते. प्रथम मुलींची शिस्तबद्ध कवायत झाली. न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलांचं बॅण्डपथक होतं. मूळ झोपडीपासून प्रगती होत गेलेल्या कार्यालयाच्या इमारतीपर्यंत स्त्रीशिक्षणाच्या विकासाचे फलक घेऊन मुली अण्णांपाशी येऊन थांबल्या. एका विधवा मुलीकडून व एका विद्यार्थिनींकडून, अशी दोन मानपत्रं अण्णांनी स्वीकारली, तेव्हा अण्णांना आनंदाश्रू अनावर झाले… ‘
‘१९३८ मध्ये १८ एप्रिलला अण्णांना ऐंशी पूर्ण झाली. संस्थेतल्या मुलींसाठी पोहण्याचा तलाव करण्याचं ठरलं. पहिली कुदळ अण्णांनी मारली. तलावाचं काम सुरु झालं. तलाव पाण्यानं तुडुंब भरला. पुढच्या वर्षी १८ एप्रिल १९३९ रोजी आंब्यांची पानं, पताका लावून तलाव सुशोभित केला होता. मुली, पाहुणे जमले. डॉ. खोत यांच्या वडिलांचं नाव तलावाला दिलं. ‘कृष्ण तलाव’. उद्घाटन प्रसंगी सर्वांत आधी तलावात अण्णा उतरले… ‘ .. संस्थेतल्या मुलींना पोहता यावे, अशी चालकांची जिद्द होती. वैधव्याने जीवनाच्या आनंदाला वंचित झालेल्या जखमी पक्षिणींना आकाशात भरारी मारता यावी म्हणून तर अण्णांनी हे कार्य आरंभले होते.
कावेरीबाईंनीं शतायुषी अण्णांच्या दीर्घायुषी संस्थेचा आलेख खूप तपशिलाने मांडलेला आहे. तो वाचताना वाटत राहिले- कार्य संपले, की त्याचे प्रयोजनही संपते.
मग आता वेगळे काय आहे तिथे? शतकाच्या कालप्रवाहात स्त्रीशिक्षणाच्या कार्याचा वृक्ष झाल्यावर या अण्णांच्या संस्थेचे -तिथल्या इतिहासाचे- खास महत्त्व काय आहे? सतीची चाल, विधवांचे प्रश्न, परित्यक्ता… एकेक प्रश्न सुटले. शिक्षणाचे मोल तर आम्हाला ठाऊक आहे. सामाजिक प्रश्नांची धार हळूहळू बोथट झालेली आहे…
माझ्या प्रभात फेरीच्या वेळी वनदेवीच्या डोंगरापलीकडच्या वस्तीतून रोज शाळेला जाणाऱ्या मुली चिवचिवताना दिसतात. त्या आमच्या मैत्रिणी सांगतात-‘आईला लांबून पाणी आणावं लागतं. पण आम्ही रोज अंघोळ करतो आणि शाळेला जातो. ‘ मला प्रश्नांची उत्तरे मिळतात. कर्व्यांच्या शाळेत जाणाऱ्या पोरींना शिकून डॉक्टर व्हायचे आहे. उद्या पाणी मिळेल. पक्की घरे मिळतील. पायात घालायला बूट देखील मिळणार आहेत त्यांना. अण्णांनी त्यांना स्वप्ने पाहायचे बळ शंभर वर्षांपूर्वीचे दिले आहे… कावेरीबाईंचे हिंगण्याचे माळरान बहरतेय. आश्रमहरिणी आता येतील- जीवनाच्या आनंदाची वाट शोधत…
© सुश्री सुलभा तेरणीकर
मो. 8007853288
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈