श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ पितृपक्ष : कृतज्ञता पर्व ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
जगातील सर्वाधिक प्राचीन संस्कृती कोणती असा प्रश्न आपण google वर search केला तर त्याचे स्वाभाविक आणि एकमेव उत्तर येईल हिंदू संस्कृती!! आपली हिंदू संस्कृती नुसती पुरातन नाही तर ती सर्वसमावेशक, विज्ञानाधिष्ठीत, सनातन ( याचा खरा अर्थ नित्यनुतन असा आहे ), पर्यावरणाचे रक्षण करणारी (इको फ्रेंडली), ऐहिक सुख प्राप्त करून देऊन पारमार्थिक सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लावणारी, थोडक्यात सांगायचे तर ‘आपले घर ते संपूर्ण विश्व’ असा वैश्विक (global) विचार करायला प्रवृत्त करणारी शांतताप्रेमी संस्कृती आहे. आपली संस्कृती आपल्याला वेगवेगळे गुण विविध सणांच्या माध्यमातून नकळत शिकवीत असते, फक्त आपण आपले डोळे, कान उघडे ठेवायला हवेत. हल्ली आपल्याकडे संस्कार वर्ग घ्यावे लागणे किंवा संस्कार करावे लागणे हा एक सामाजिक आजार आहे, ही एक प्रकारची सामाजिक वेदना आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये. पूर्वी संस्कार घराघरातून आणि समाजाकडून आपसूक (नकळत) व्हायचे. संस्कार पानपट्टीवर विकली जाणारी वस्तू आहे का ? हजारो वर्ष परंपरा पाळूनझ एकप्रकारे तपश्चर्या करून ते संस्कार मागील पिढी पूढील पिढीकडे ते संक्रमित करीत असते. ती साखळी तोडण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. मागील पन्नास-साठ वर्षात मात्र आपण हे संस्कार पुढील पिढीत संक्रमीत करण्यात अयशस्वी झालो की काय ? असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे, असे वाटते.
राम’दास’ असलेल्या हनुमंताला त्याच्या शक्तीचा विसर पडला होता, पण जाबुवंताने स्मरण करून दिल्यावर हनुमंताला त्याच्या शक्तीचा शोध लागला आणि तो पुन्हा आपल्या पूर्वीच्या विराट क्षमतेने कार्यरत झाला. आपल्याला ही आपल्या विराट हिंदुतेजाचा विसर पडला आहे, आजच्या काळातील जांबुवंत यथाशक्ती आपल्याला आपल्या शक्तीची आठवण करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण गंमत अशी आहे की आजचे समाजकंटक किंवा हितशत्रू विविध शक्कली लढवून त्या जांबुवंतालाच आणि पर्यायाने हिंदू समाजालाच तुच्छ लेखण्याचे काम इमाने इतबारे करीत आहेत. याचा परिणाम म्हणजे आपल्या परंपरा पाळण्याची आपल्याच मुलाना लाज वाटू लागली आहे. आपल्या श्रद्धास्थानांबद्दल आपल्याला लाज वाटणे ही आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे. काही रूढी काळाच्या ओघात चुकीच्या पद्धतीने रुजल्या असतील, काही कालबाह्य झाल्या असतील, पण त्याचा तपशीलात जाऊन अभ्यास न करता नुसती दूषणं देणं आणि अक्रियाशील राहणे हे आजच्या सुशिक्षित समाजास शोभणारे आहे का? आपण काय खावे ? कधी खावे ? दंत मंजन कोणते वापरावे इथपासून ते अंगाला कोणता साबण लावावा हे सुद्धा आजचे तथाकथित अभिनेते (idol) आणि अभिनेत्री ठरवतात आणि आपली तरुण पिढी त्याची री ओढते, याला स्वातंत्र्य म्हणायचे ? साधा विचारही आपल्याला सुचू नये की आपण उष्ण कटिबंधात राहतो, त्यानुसार आपली पोशाखरचना राहिली आहे आणि असायलाही हवी, पण आजची आपली पोशाख रचना पूर्णपणे पाश्चात्य झाली आहे. काय योग्य आणि काय अयोग्य, याचा विचार करायला आपल्याकडे वेळच नाही. आपण नुसते अंधानुकरण करीत आहोत, नाही का?
आपल्या संस्कृती उत्सवप्रधान आहे. प्रत्येक उत्सवातून योग्य तो सामाजिक संदेश देण्याचे काम केले गेले आहे. होळी आपल्याला वर्षभरातील वाईट विचार, वाईट आठवणी, वाद, हेवेदावे जाळून नष्ट करायला शिकविते, गुढी पाडवा चांगल्या गोष्टीची मुहूर्तमेढ रोवण्यास सांगतो, गोपाळकाला संघटन करायला आणि सर्वांची सुखदुःख वाटून घ्यायला (sharing) शिकवितो. हाच खरा समाजवाद आहे, ( कालमार्क्स ने बहुतेक श्रीकृष्ण चरित्र वाचलेलं असावं). गणपती नेतृत्वगुण शिकविणारा (leadership) आणि बुद्धिदाता आहे. पण, सध्या आपले उत्सव कसे साजरे करायचे हे आपण ठरवत नसून आजची प्रसारमाध्यमे ठरवत आहेत असे दिसते आणि त्याचे खापर मात्र आपल्या सनातन हिंदुधर्मावर फोडतात. आपणही हे स्वातंत्र्य अगदी सहजपणे मीडियाच्या हातात सुपूर्द केलं आहे. एखाद्या चित्रपटातील लोकप्रिय गीत आपण होळी, गणपती, गोविंदा कुठेही लावतो, त्या गीताचे बोल काय आहेत, त्याचा अर्थ काय आहे, संगीत कोणत्या दर्जाचे आहे, याचं थोडेही सामाजिक भान आपण पाळत नाही. कोणत्याही धार्मिक उत्सवाचा मूळ हेतू हा समाजातील सात्विकता वाढावी, मनुष्याच्या सृजनशक्तीला चालना मिळावी, सामाजिक ऐक्य वाढावे आणि एकूणच वातावरण मंगलमय व्हावे असा असतो. पण काही सन्माननीय अपवाद सोडल्यास सध्याच्या सार्वजनिक उत्सवांचे किंवा अगदी खासगी उत्सवांचे स्वरूप बघितले तर तो सोहळा ( event) आहे की उत्सव आहे, हेच पटकन कळत नाही. त्यामुळे आपल्या सारख्या सामान्य मनुष्याचे मन मात्र सुन्न होत आहे. उत्सवाच्या निमित्ताने होणारी आर्थिक ‘उलाढाल’ बघितली तर कोणताही देव त्या मंडपाच्या आसपास देखील फिरकेल असे वाटत नाही. आपण सर्वांनी निरक्षीर विवेक बुद्धीने आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे.
गणपती गावाला गेले की येणारा काळ मम्हणजे पितृपक्ष. लौकिक अर्थाने हा काही उत्सव नाही किंवा उत्सवाचा, सणांचा काळ नाही. पण या पितृपक्षात आपल्याकडे मृत्यू पावलेल्या पूर्वजांचे स्मरण करून सश्रद्ध अंतकरणाने श्राद्ध करण्याची पद्धती आहे. श्राद्ध करण्याची विशिष्ठ पद्धती पूर्वी विकसीत केली गेली. Hardware कोणतेही असले तरी त्यातील software एकच आहे आणि ते म्हणजे आपापल्या पुर्वजांबद्दल विनम्रतेने कृतज्ञता व्यक्त करणे. आपला जन्म होणं किंवा तो कोणाच्या घरी होणं हे आपल्या हातात नाही, माता पित्यांची निवड आपल्या हातात नाही, ती आपल्या पूर्वजांनी, आईवडिलांनी केलेली आपल्या वरील एक कृपाच आहे. ज्या घरात आपण जन्मास येतो त्या घराचं नाव, ऐश्वर्य, परंपरा आणि अशा सर्वच गोष्टी आपल्याला वारसाहक्काने मिळतात. त्या ऋणातून अंशतः मुक्त होण्याचा कालावधी म्हणजे पितृपक्ष. या कालावधीत जाणीवपूर्वक इतर शुभ कार्य करु नये असा संकेत अनेक वर्षे पाळला जायचा. खरं तर ह्या पितृपक्षास ‘निषिद्ध’ समजणे साफ चुकीचे आहे. वर्षातील ३६५ दिवसातील जेमतेम १५ दिवसांचा हा कालावधी आहे. एका अर्थाने हा कालावधी ‘आरक्षित’ आहे. या काळातील वातावरण सुद्धा विशिष्ठ गोष्टीसाठी लाभदायक असते, आयुर्वेदातील तज्ञ आपल्याला आणिक माहिती देऊ शकतील. या काळात पित्त प्रकोप होतो आणि त्यासाठी भाताची ( तांदळाची ) खीर ही पित्तशामक आहे.
या पितृ पंढरवड्याचा आणखी एक अर्थ आहे, तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मागे वळून पाहताना आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करूयाच पण आपल्या व्यक्तिगत आयुष्याचे सिंहावलोकनही आपण या निमित्ताने करू शकतो. गुढीपाडव्याला जर आपण एखादा नवीन नियम केला असेल किंवा नवीन उद्योग सुरु केला असेल, तर हा कालावधी हिंदू वर्षाचा साधारणपणे मध्य आहे. मागच्या सहा महिन्यात आपण काय केले?, करू शकलो?, काय चुकलं?, काय बरोबर झालं ? या सर्वांची वस्तुनिष्ठ उजळणी आणि आढावा घेऊन आपण आणखी नव्या उमेदीने कार्यास लागलो तर यशाची दसरादिवाळी नक्कीच आपल्या आयुष्यात येईल. समर्थानी अखंड सावधान राहावे’ असे सांगितले आहे ते यासाठीच. दैनंदिन आयुष्यात आपल्याला बऱ्याच लोकांची हस्ते परहस्ते मदत होत असते. आपण विमान, ट्रेन, रिक्षा, बस, टॅक्सी अशा विविध वाहनांनी गरजेनुसार प्रवास करीत असतो. त्या वाहनांच्या चालकाचे नाव देखील आपल्याला माहित नसते, पण हे सर्व जण आपल्याला आपल्या गंतव्य स्थानी सुखरूप नेऊन सोडत असतात, तसेच आपला दूधवाला, फुलपुडी देणारा, डॉक्टर, किराणा माल पुरविणारा, वकील, मोची, भाजीविक्रेता आणि समाज जीवनाचे विविध घटक आपले जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी सतत झटत असतात. या सर्वाप्रति कृतज्ञता असणे आणि किमान वर्षातून एकदा ते व्यक्त करणे आपले आद्यकर्तव्यच नव्हे काय ?
सर्वसाधारणपणे अमुक एक गोष्ट केली की काय फळ मिळते असा प्रश्न प्रत्येक कर्म करताना सामान्य मनुष्याच्या मनात येतो. वरील लेख वाचताना हाच प्रश्न आपल्या सारख्या सुजाण वाचकांना पडू शकतो. मलाही हे सांगताना आनंद होत आहे की वरील लेख वाचून काय होईल ते माहित नाही पण त्यानुसार आपल्याला कृती करता आली तर मात्र ज्ञानेश्वर माउलींनी पसायदानात
सांगितल्याप्रमाणे “भूतां परस्परे पडो। मैत्र जीवांचे।।” याची अनुभूती येईल आणि आत्यंतिक मानसिक समाधानाचा लाभ होईल यात तिळमात्र संदेह नाही.
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर