सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “मकर संक्रांत…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की पहिला येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. कुणाच्याही मनात घर करायचं असेल तर त्याचा रस्ता हा आपल्या वाणीमार्फत जातो.तुमच्या वाणीवरच तुमच्याशी जोडल्या गेलेली माणसं ही जुळून राहतात की दुरावतात हे संपूर्णपणे अवलंबून असतं.म्हणून ह्या सणाचा मूलमंत्रच मुळी “तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला”असा आहे. ह्या सणाद्वारे गैरसमजाने निर्माण झालेले मनमुटाव,नाराजी क्षणात दूर होऊन निरभ्र आकाशासारखं मनं स्वच्छ होतं. अर्थातच” गोड बोला” हे शब्द अगदी स्वच्छ पारदर्शी मनातून आणि मनापासून सुद्धा उमटले तरच त्याला अर्थ आहे.
पुराणात मकरसंक्रांतीची अशी कथा सांगतात की, संकरासूर नावाच्या राक्षसाला जगदंबेने या दिवशी मारले म्हणून तिला संक्रांतीदेवी असे म्हटले जाऊ लागले.
…हा सण साजरा करण्याच्या पद्धती ह्या प्रांतानुरूप थोड्या बदलतात.मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांना दोरा गुंडाळतात.. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते. नवविवाहित जोडप्याचा दोन्ही घरी संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करतात. एरवी आपण काळा रंग अशुभ मानतो परंतु ह्या संक्रांतीच्या सणाला काळ्या वस्त्रांच महत्त्व असतात त्यामुळे बाजारात ह्या दिवसात काळ्या साड्या व काळे पंजाबी ड्रेसेस खप असल्या कारणाने भरपूर बघायला मिळतात.
मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काल मानला जातो. याबद्दल अशी गोष्ट आहे की, महाभारतातील कौरव – पांडवांचे युद्ध चालू होते. अर्जुन भीष्मांशी लढत होता पण ते त्याला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडी ला पुढे उभे केले आणि तो त्याच्याआडून लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्मांनी आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका व अंबालिका अशा तीन राजकन्या पळवून आणल्या होत्या.
अंबेचे दुसर्या राजावर प्रेम होते म्हणून भीष्मांनी तिला त्याच्याकडे पाठवले; पण पळवून नेलेल्या मुलीचा स्वीकार करायला त्याने नकार दिला. ज्या भीष्मांमुळे हे सारे झाले त्यांचा सूड घेण्याचे अंबेने ठरवले. ती तपश्चर्या करून शिखंडी नावाचा पुरुष झाली आणि भीष्मांशी लढायला आली. पण ती पूर्वी स्त्री होती म्हणून भीष्म शिखंडीशी लढेनात. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळले. त्यांच्या अंगामध्ये इतके बाण घुसले होते की, ते जमिनीवर खाली न पडता बाणांच्याच गादीवर आडवे झाले. तेव्हा दक्षिणायन सुरू होते. पण भीष्म इच्छामरणी होते म्हणून त्यांनी उत्तरायणाचा शुभ काल सुरू होण्याची वाट पाहिली आणि मगच प्राण सोडले.
अशा ह्या स्नेहबंधाचे धागे गुंफणा-या सणाची महती सांगणारी माझी एक रचना पुढीलप्रमाणे
☆ मकरसंक्रांतीची शिकवण ☆
☆
ह्या सणाला काय महत्त्व सांगतो काटेरी हलवा
तीळ गुळासंगे मुखी ठेऊनी राग मनीचा घालवा
☆
ह्याला काय महत्त्व सांगतात ती आंबटगोड बोरं
मनातील किल्मिष पूर्ण घालवा मनं करा कोरं
☆
ह्याला काय महत्त्व सांगतात गोड ऊसाचे कांडे
गोड बोलून टाळावे जरी लागले भांड्याला भांडे
☆
ह्या सणाला काय महत्त्व सांगतो टप्पोरा तीळ
आढ्यता आता सोडा घालवा मनातील पीळ
☆
ह्याला काय महत्त्व सांगतो पिवळाधम्म गूळ
स्वच्छ निरभ्र करा मनं सोडून गैरसमजाचे खूळ
☆
ह्याला काय महत्त्व सांगते मिश्रडाळीची खिचडी
फटकळ तोंडाळपणा पेक्षा बरी ती लाडीगोडी
☆
काय महत्त्व सांगतात ती लालचुटुक गाजरं,
मनात शिरूर राह्यलं की आयुष्य होतं साजरं
☆
द्वेष आता सोडा माणसं आता जोडा ,
तीळगूळ घेऊन गोड बोलून गाठ मनीची सोडा.,
गाठ मनीची सोडा…
परत एकदा तीळगूळ घ्या अन् गोडगोड बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈