श्री संभाजी बबन गायके
विविधा
☆ लेखनभान ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
पूर्वी कधीही नव्हते एवढे लेखन स्वातंत्र्य आज आहे. लिहिणारे आणि लिहू शकणारे अनेक होते, पण ते प्रसिद्ध करण्याला तांत्रिक मर्यादा होत्या. कागदावर छपाई करून ते वाचकांपर्यंत पोहोचणे ही एक मोठी प्रक्रिया असे. त्यात संपादन हा एक अतिशय महत्वाचा घटक असतो. त्यामुळे ‘साभार परत’ ची सवय नवोदित लेखकांना करून घ्यावी लागे.
‘वाचकांचा पत्र व्यवहार’ सारख्या सदरात दोन ओळींचे पत्र छापून आले तरी लेखक झाल्यासारखे वाटे ! आता परिस्थती खूपच लेखन-आणि लेखक ‘फ्रेंडली’ झाली आहे.
सुरुवात Email ने झाली. पुढे Facebookआणि Whatsapp मुळे कुणालाही, कितीही, केंव्हाही आणि मुख्य म्हणजे ‘कसेही’ लिहिता येऊ लागले. काही विशेष अशा डिजिटल साहित्य-मंचांचा ठळक अपवाद वगळता लेखनाचे संपादन, नियंत्रण असा फारसा भाग उरलेला नाही. गावाच्या माळावर जाऊन बोंब ठोकायला पाटलाची परवानगी घेण्याची गरज लागत नाही, तशातला हा प्रकार. त्याचे दुष्परिणाम वाचक भोगत असतात. विशेषत: फेसबुकवरील ‘पोस्ट’ ला ‘कमेंट’ च्या माध्यमातून लेखी स्वरूपात, चित्र स्वरूपात प्रतिसाद देण्याची सुविधा असल्याने कुणी काहीही लिहू शकते. या काहीही लिहिण्यातून अनेक अप्रिय घटना, प्रसंग घडलेले आहेत.
फक्त एक गोष्ट बरी आहे, ती म्हणजे हे लेखन वाचायचे की नाही हे वाचक ठरवू शकतात ! पूर्वी लोक पत्रकार, लेखक हे आपल्याविषयी काही लिहितील म्हणून त्यांच्यापासून दूर राहायचे किंवा गरज असली तर जवळही जायचे! हल्ली फेसबुकवर पोस्ट लिहिणाऱ्या लेखकांच्या बाबतीत असे होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विस्तारभयास्तव, फक्त एकाच प्रकारावर लेखकांनी कटाक्ष ठेवावा हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच !
जेंव्हा प्रत्यक्ष व्यवहारातील विषयावर, अनुभवावर लिहिले जाते, तेंव्हा त्या लेखनात नावांचा आणि इतर अनुषंगिक उल्लेख टाळायला पाहिजेत, असे मला अत्यंत प्रकर्षाने वाटते. व्यक्तीचा उल्लेख जर सन्मानजनक, कौतुकाचा, आनंदाचा, उपकाराचा इत्यादी इत्यादी असेल तर नावाचा थेट उल्लेख असलेला चांगलाच. परंतु मैत्री, प्रेम, चारित्र्य याबाबतीत महिलांचा उल्लेख करताना थेट नावे किंवा त्या व्यक्तीची ओळख पटेल असे लेखन टाळावे, असे वाटते. जरी घटना, प्रसंग कितीही जुने असले तरी संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील कुणाही व्यक्तीच्या नजरेस हा मजकूर पडला तर अनवस्था प्रसंग उदभवू शकतात. माझे अमक्या मुलीवर प्रेम होते पण आमचा विवाह होऊ शकला नाही, हे लिहिताना त्या मुलीच्या नावाचा आता उल्लेख का करावा? तिचे लग्न झालेले असेल, तिचा संसार सुरु असेल आणि संबंधित बाब तिच्या नव्या कुटुंबास माहीत नसेल, तर काय? एक तर ज्याने लेखन केले आहे त्याला ओळखणा-या वाचकांना नेमके कुणाबद्दल लिहिले गेले आहे, हे ताडणे फार अवघड नसते. कारण लेखक आणि वाचक तसे बरेचदा एकमेकांच्या ओळखीत, परिसरात असू शकतात.
छायाचित्रे वापरताना, विशेषत: महिलांची छायाचित्रे वापरताना भान राखणे गरजेचे आहे.
वृत्तपत्रांत अशा प्रकरणामध्ये व्यक्तींची बदललेली नावे छापण्याची पद्धत आहे. Electronic Mediaमध्ये चेहरे धूसर करून दाखवणे, लपवणे असे उपाय केले जातात. आणि हे आवश्यक सुद्धा आहे.
व्यक्तीमत्वाचे वर्णन करताना त्यांचे शारीरिक दोष लिहिण्याची अशी किती गरज असते लेखन विषय पोहोचवण्यासाठी? व्यक्तीच्या मर्मावर विनाकारण बोट ठेवून तो दुखावला जाईल, असे चांगले लेखक कधीही लिहित नाहीत.
लेखन विषयावर आता बंधने नाही घालता येत. पण अति होण्याआधी लेखकांनी आपापल्या लेखणीस वेसण घातलेली बरी !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈