सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “पर्यटन – एक अनुभव…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
पर्यटन हा बहुतेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मात्र पर्यटन ह्या विषयाकडे वळतांना प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगल ने विचार करुन त्याची दिशा ठरवितात. काही व्यक्ती निसर्गसौंदर्याचा विचार करुन तशी स्थळं नि्डतात तर काही द-याख़ो-या,गड किल्ले ह्यामध्ये रमतात. काही देवदर्शनासाठी नवसाला पावणा-या सुप्रसिद्ध देवस्थानांची निवड करतात तर काही आपापल्या गावी असलेल्या कुलदेवतांकडे आपला मोर्चा वळवितात.
पर्यटनाला कुठेही जावं पण जेथे जाऊ तेथली इत्यंभूत माहिती,तिथला इतिहास, हवामान, भौगोलिक परिस्थिती, त्या स्थानाचे वैशिष्ट्य हे सगळं माहितीपूर्ण अभ्यासून घ्यावं.
खेदाची बाब अशी की हल्ली त्या फ़ोटो व सेल्फी ह्यांच्या अतिरेकी आवडीने आपण त्या निसर्गसौंदर्याचे, त्या स्थानाचे महत्त्व ना धड डोळ्याने टिपंत,ना मनावर बिंबवत,ना मेंदूत ठसवतं. आपल्या इंद्रियांना निकामी करुन फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून असण्याची ही सवय तशी घातकच.
ह्या बाबतीत आम्ही उभयता दोघेही आणि आमचा लेक आधी सगळे डोळ्या़ंनी बघणार, हिंडून सगळं अभ्यासणार, संपूर्ण माहिती गोळा करणार आणि मग जसा वेळ उरेल तसे फोटो काढणार. आजकाल सर्रास एखाद्या स्थळी लोक पोहोचल्या पोहोचल्या आधी सेल्फी व फोटोसेशन नी मग लगेच त्या फोटोंचे सोशलमिडीया वर अपलोडींग. आजकाल सोशलमिडीया वर कुटूंबाचे वा मित्रमैत्रीणींचे फोटो टाकले तरच प्रेम वा मैत्री असं नसतं कारण सोशल मिडीयावरील फेसबुक, व्हाँटसअप हे सगळं आभासी जगं असतं. असो काही स्थळं ही आपण आयुष्यात बघायचीच असं ठरविलेल्या काही स्थळांपैकी एक कन्याकुमारी. अहो,मी आणि व्यंकटेश आम्ही तिघही कन्याकुमारी स्मारकावर पोहोचलो तो क्षण आम्हा तिघांसाठी अविस्मरणीय असा क्षण होता. त्या स्थळाचे पावित्र्य, शांतता बघून आम्ही तिघही एकमेकांशी न बोलता स्तब्धतेनं ते सगंळ वैभव डोळ्यात साठवायला लागलो. हे सगळं आज आठवायचे कारण म्हणजे आजच्या तारखेला म्हणजे सात जानेवारी ला ह्या स्थानकाचे काम पूर्ण झाले होते.
विवेकानंद स्मारक हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी शहरात स्थित एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. 1892 मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले. एके दिवशी ते पोहत या प्रचंड खडकावर पोहोचले. या निर्जन स्थळी साधना केल्यानंतर जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले होते. आणि ह्या स्थळाला परमहंस ह्यांच्या शिष्याने अजरामर केले.विवेकानंदांच्या त्या अनुभवाचा संपूर्ण जगाला फायदा झाला, कारण त्यानंतर काही वेळातच ते शिकागो परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. या परिषदेत सहभागी होऊन त्यांनी भारताचे नाव उंचावले होते.
1970 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या स्मृती प्रित्यर्थ त्या प्रचंड खडकावर एक भव्य स्मारक बांधण्यात आले. समुद्राच्या लाटांनी वेढलेल्या या खडकापर्यंत पोहोचणे हाही एक वेगळा अनुभव असतो. खळाळत येऊन त्या खडकवर आदळणा-या महाकाय लाटा बघितल्यावर परत एकदा पंचमहाभूतांचे अस्तित्व मनाला स्पर्शून गेले.
स्मारक इमारतीचा मुख्य दरवाजा अतिशय सुंदर आहे. अजिंठा-एलोरा लेण्यांतील दगडी शिल्पांची प्रकर्षाने आठवण येते. लाल रंगाच्या दगडाने बनवलेल्या या स्मारकाला 70 फूट उंच घुमट आहे.इमारतीच्या आतील बाजूस चार फुटांपेक्षा उंच व्यासपीठावर ज्ञानी,धीरगंभीर स्वामी विवेकानंद यांची आकर्षक मूर्ती आहे. ही मूर्ती पितळेची असून, तिची उंची साडेआठ फूट आहे. ही मूर्ती इतकी प्रभावी आहे की त्यात स्वामीजींचे व्यक्तिमत्त्व जिवंत असल्याचे दिसते.जमिनीच्या किनार्यापासून सुमारे 500 मीटर अंतरावर समुद्रात असलेल्या दोन खडकांपैकी एकावर बांधले गेले आहे. एकनाथ रानडे यांनी विवेकानंद स्मारक मंदिर बांधण्याचे विशेष कार्य केले. एकनाथ रानडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह होते. समुद्रकिनाऱ्या पासून पन्नास फूट उंचीवर बांधलेले हे भव्य आणि प्रचंड दगडी बांधकाम जगाच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे. तेथे विवेकानंद ह्यांच्या वरीले पुस्तके, त्यांच्या स्मरणार्थ तयार केलेल्या दिनदर्शिका, डाय-या ह्यांचे दालन आहे .
स्मारक तयार करण्यासाठी समुद्रकिना-यावर असलेल्या वर्कशॉपमध्ये सुमारे 73 हजार प्रचंड दगडांचे ब्लॉक्स कलाकृतींनी सुसज्ज केले गेले आणि समुद्र मार्गाने खडकापर्यंत नेले गेले. यातील किती दगडी तुकड्यांचे वजन 13 टनांपर्यंत होते. याशिवाय स्मारकाच्या मजल्यासाठी वापरल्या जाणार्या दगडी ब्लॉक्सच्या आकृत्या आहेत. या स्मारकाच्या उभारणीसाठी सुमारे 650 कारागिरांनी 2081 दिवस रात्रंदिवस काम केले. या मंदिराच्या दगडी शरीराला आकार देण्यासाठी एकूण 78 लाख मानवी तास खर्ची पडले. 2 सप्टेंबर 1970 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. व्ही. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भव्य समारंभात गिरी यांनी स्मारकाचे उद्घाटन झाले.
कन्याकुमारी बघून आल्यावर प्रकर्षाने जाणवले खरंच आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈