सौ.ज्योत्स्ना तानवडे
विविधा
☆ “दिन दिन दिवाळी !! भाऊबीज !!” 🪔 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
शुभ दीपावली ! दिवाळीच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या सणांच्या संमेलनात विविध भावनांचा उत्सव आपण साजरा केला. निसर्गाची पूजा केली. प्राणीमात्रांचे कौतुक केले. लक्ष्मीदेवी, श्रीविष्णू, श्रीकृष्ण यांचे पूजनअर्चन झाले. आरोग्यरक्षक धन्वंतरीचे पूजन झाले. शिवशक्तीचा म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचा सन्मान केला. तसाच आता शेवटच्या दिवशी बहीण भावंडांच्या प्रेमाचा उत्सव साजरा होतो आहे. हीच आपली भाऊबीज. दिवाळी उत्सवातल्या शेवटचा दिवस म्हणजे ‘भाऊबीज’.
बहिण भावांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या या दिवसाला ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. याची एक कथा अशी सांगतात. या दिवशी यमराज आपली बहीण यमुनेकडे गेले. तिने अतिशय आनंदाने आपल्या घरी त्यांची पूजा केली, त्यांना ओवाळले. गोडधोड करून प्रेमाने जेऊ घातले. यमराजाने तिला वरदान मागायला सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ” दरवर्षी या दिवशी तू माझ्याकडे जेवायला यायचेस. तसेच या दिवशी जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचे जेवील त्याला तू सुख द्यायचेस. ” यमराजाने यमुनेला तसा वर दिला म्हणून तेव्हापासून दरवर्षी भाऊबीज साजरी होते.
एका घरात हसत खेळत भाऊ बहीण मोठे होतात. त्यांच्यात जिव्हाळ्याचे, मायेचे, विश्वासाचे नाते निर्माण होते. पुढे लग्न झाल्यावर बहिण सासरी जाते. सतत भेटत नाही. म्हणून मग भाऊबीजेच्या निमित्ताने तिला भेटून तिची खुशाली विचारायची, तिच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे हा यामागचा उद्देश असतो. हे नाते असतेच अगदी हळुवार. कितीही अडचणी आल्या तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे याचा बहिणीच्या मनात दृढ विश्वास असतो आणि सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी भावाला नेहमी बहिणीची आठवण येते. म्हणूनच या दिवशी भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाने जेऊ घालायचे. त्याला आरोग्यपूर्ण दीर्घायू लाभावे म्हणून यमराजाची पूजा, प्रार्थना करायची.
या पवित्र, मधुर नात्याचा आज उत्सव असतो. आजकाल घरात एकच अपत्य असते. त्यामुळे सख्खी भावंडे कमी झालीत. पण चुलत, आत्ये, मामे, मावस भावंडं यानिमित्ताने जवळ येऊ लागली आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. शेवटी भावंडं कोणतीही असोत हे नाते असतेच मायेचे, प्रेमाचे. म्हणूनच ते मनापासून जपायला हवे हेच हा दिवस आपल्याला सांगतो. मानलेले बहीण भाऊ पण अगदी असोशीने हे नाते जपतात. बहिणीने औक्षण करून आणि भावाने स्नेहाची ओवाळणी घालत एकमेकांच्या सुखाची, स्वास्थ्याची, आनंदाची कामना करायची. यासाठी सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
शुभ दीपावली.
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈