Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the limit-login-attempts-reloaded domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the square domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/wp-includes/functions.php on line 6114
मराठी साहित्य – विविधा ☆ “लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही मानाची…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆ - साहित्य एवं कला विमर्श मराठी साहित्य – विविधा ☆ “लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही मानाची…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆ - साहित्य एवं कला विमर्श

मराठी साहित्य – विविधा ☆ “लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही मानाची…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? विविधा ?

“लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही मानाची…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

…. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात…

आई भाऊसाठी परि मन खंतावतं.

या कविवर्य कृ. ब. निकुंबांच्या घाल घाल पिंगा वार्‍या या गीताच्या ओळी रेडिओवरुन कानी पडल्या आणि मनात विचाराचा तरंग उमटला. खरचं आईच्या बरोबरीने किंवा आई नंतर जर कोणी आपल्या वर प्रेम करत असेल तर ती असते बहिण!मोठी असो की लहान तीचे आपल्या भावंडांवर प्रेम असते, सर्वांची ती मनापासून काळजी घेते. भावंडांच्या सुखातचं आपले सुख मानते. ती आपल्या भाऊबहिणींचे लाड पुरविते, मायेने समजाविते, आई वडील त्यांच्या वर रागवले तर भावंडांचा पक्ष घेते. आपल्या वाटेचा खाऊ भावाबहिणींना देते.. आईला घरकामात मदत करते. आई आजारी असली तर स्वतः सर्व कामे करते, आईची आणि इतर सर्वांची काळजी घेते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर नोकरी करून कुटुंबाला हातभार लावते. भावंडांच्या शिक्षणासाठी प्रसंगी आपले शिक्षण सोडते, आपल्या सुखांचा त्याग करते. खरचं किती मोठं मन असते तिचं. बहिण छोटी असली तरी ती मोठ्या हक्काने भावाबहिणीकडून आपले लाड पुरवून घेते आणि तेवढा जीव ही लावते. लहान असली किंवा मोठी असली तरी तिचे प्रेम, तिची माया अगाध असते. आईला मायेचा सागर म्हणतात तर बहिण ही त्याच सागरातून भरलेली मायेची, प्रेमाची, वात्सल्याची घागर असते जी नेहमीचं भरलेली असते….

काही घरांमध्ये पालक मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्त्व देतात, तरीही मुली सर्व सहन करून आपल्या भावांवर निःस्वार्थ प्रेम करतात. त्यावेळी नकळतपणे घरातल्यातकडून तिचा आदर, मान राखला जात असतो. हीच तिच्या या प्रेमाची पावती असते. हेच तिलाही हवे असते.

लहानपणी एकत्रपणे खेळणारे, हसणारे, लुटुपुटुचे भांडण करणारे बहिण भाऊ मोठे झाल्यावर कधी कधी कारणास्तव भांडले तर बहिणचं स्वतः हून भावाशी बोलणार. जरी भांडली तरी मनात प्रेमचं असते.

बहिण रक्षाबंधन आणि भाऊबीज या दिवशी भावांचे औक्षण करुन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भावाने दिलेली भेट प्रेमाने स्विकारते. इथ आर्थिकस्तराचा भेदभाव लक्षात आला तरीही नातं महत्वाच ठरतं.

बहिणी सासरी गेल्या तरी आपल्या भावाबहिणींची काळजी करीत असतात. आपले माहेरचे सर्व सुखात राहो असेचं त्यांना वाटत असते. बहिणी बहिणी या एकमेकांच्या मैत्रीणीचं असतात. लहानपणी आपली सुखदुःखे एकमेकांना सांगत असतात आणि लग्नानंतर ही आपले मैत्रीचे नाते जपत असतात.

कृष्णाला जखम झाली, ती बांधण्यासाठी आपली भरजरी साडी फाडणारी द्रौपदी ही कृष्णाची बहिण…

किती प्रेम तिचे आपल्या भावावर!आताच्या काळात ही आपल्या भावांच्या सुखासाठी स्वतः त्रास घेणाऱ्या द्रौपदी सारख्या बहिणी असतात पण सर्वच भाऊ कृष्णासारखे असतात असे नाही. तरीही बहिणी आपले कर्तव्य करीत असतात, नाते जपत असतात. कुठलीही अपेक्षा न ठेवता.

भावा बहिणीतले बंध असे दृढ होतात. मनात कसल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता केलेले खरे प्रेम. ‘रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण. धन्य तोची भाऊ, धन्य ती बहीण, प्रीती जी करती जगी लाभविण’ प्रेमात कसलीही लाभाची अपेक्षा ठेवली गेली की त्याची किंमत शून्य होऊन जाते. ग. दी. माडगूळकरांचे ‘चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला’ हेही गीत भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देणारे. किती सुंदर असेल ना ते रेशीमबंधांनी जुळलेले त्यांचे अलौकिक पवित्र नाते! ‘साद घालता येईन धावून’ हे कृष्णाने दिलेले वचन द्रौपदीवर वस्त्रहरणाची वेळ आल्यावर पाळलेले आपण पहातो. तसेच प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला आश्वस्त केलं पाहिजे की घाबरू नको, मी तुझ्यापाठी सदैव उभा राहीन. तुझ्या मदतीसाठी तत्पर असेन. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण’ नाते भले रक्ताचे नसेल तरी देखील प्रेमाच्या विलक्षण शक्तीपोटी केवळ भावाचा भुकेला असलेला नारायण प्रसन्न होऊन अंतरीची खूण पटवतोच. तसंच निर्व्याज प्रेम भावा बहिणी मध्ये असेल तर एकमेकांची तुलना, मान-अपमान, ईर्ष्या, पैसाअडका अशा अडथळ्यांची पर्वा न करता जे टिकतं ते खरं प्रेम. भाऊबीज बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आदर राखणारा, सन्मान वाढवणारा दिवस. या दिवशी आवर्जून आठवण येते ती श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्या नात्याची, भावा बहिणीच्या अतूट प्रेम बंधनाची.

प्रत्येक बहिणीला आपला भाऊ तो श्रीमंत असो की गरीब, लाख मोलाचा वाटत असतो. तिच्या हृदयात त्याच्यासाठी एक खास जागा असते. त्याच्याविषयी माया प्रेम मनात दाटलेले असते. त्याने तिला काही देवो अगर न देवो त्यावर तिचे प्रेम अवलंबून नसते. फक्त त्याने अधीमधी आपली आपुलकीने चौकशी करावी, ख्याली खुशाली विचारावी आणि तिने मोकळेपणाने त्याच्याशी चार शब्द बोलावे एवढीच तिची अपेक्षा असते. व्यवहाराच्या जगात चलनी नाण्याने देणेघेणे चालते तेव्हा फक्त नफातोट्याचा विचार होताना मान सन्मानाची कदर केली जात नाही. पण बहिणीचा आदर हा स्त्री शक्तीचा आदर असतो. तिच्यातील सृजनतेंचा आदर असतो. या पृथ्वीवर मानव वंश सातत्य टिकून राहावं यासाठी दोन घराणी जोडताना जीच तिच्या जन्मदात्याकडून नवरदेवाला दान स्वरुपात देण्याची परंपरा इथे आहे, तेव्हा दान आणि मानपान यांचा यथोचित समन्वय साधला जातो पण तरीही त्यातला काही पुरुष जातीचा अधिक हव्यासाची लालसा शमलेली नसते. माहेर कंगाल झालं तरीही. तिथे या नवर्‍यामुलीचा आदर, मानसन्मान राखला जात नाही. हे पूर्वी होत तसचं आजही आहे फक्त कालानुरूप त्याच स्वरूप बदलत गेल आहे. विविध शिक्षणाच्या सोयीने विद्याविभूषित, स्वावलंबी, कर्तबगार, कर्तुत्ववान होऊन घर, समाज, गाव, राज्य. देश आणि जागतिक स्तरावर उच्चपदस्थ बनल्या तरीही पुरुषसत्ताक मानसिकतेची शेवटी एक स्त्री म्हणू होणारी अवहेलना थांबलेली नाही. पूर्वी चूल नि मूल सांभाळताना तिच्या कामाची कदर न होता, उलट शाब्दिक, शारीरिक अत्याचार केले जायचे ते आता तिने गगनाला गवसणी घातल्याचा विश्वविक्रम केला तरी कौतुकाचे चार शब्द बोलयाला पुरुषप्रधान सत्तेला जड जातयं कारण त्यांचं आसनच आता डळमळीत झाल्यासारख त्यांना वाटतयं.

आता हळूहळू समाजात स्त्री शक्तीचा जागर जसा होत गेलायं तस तसा या नवदुर्गा शक्तींचा सन्मान सोहळा देखील होऊ लागला. आपल्या कामाची कदर होतेय, कौतुकाचा वर्षाव होतोय, आपल्याला सन्मानान वागवल जातयं ये पाहून या स्त्रीला प्रेमाचंभरत आलय. आता तिला आपल्या घरासाठी, आपल्या माणसांठी, समाजासाठी नि देशासाठी अधिक श्रम घेण्याचं बळं मिळतय..

आईवडिलानंतर भाऊ हा बहीणला म्हणजेच तिचं माहेर असतं. ती नात्याची नाळ तिला तुटू न देता सतत बांधून ठेवायची असते. नात्यांमधली भावनिक ओढ भावाबहिणीला एकत्र बांधून ठेवत असते. तिथे लोभ, मोह, मत्सर यांना जागा नसते आणि नसावी. तसं जर झालं, तर नात्यांमध्ये दरार पडायला वेळ लागत नाही. दान करण वा देण हा आपला धर्म आहे पण ते दान विनयशीलतेने दिले असता दात्याला नि याचकालाही सात्विक समाधान लागते पण तेच जर दान करताना दात्याला अहंतेचा स्पर्श झालाच तर दानाच पावित्र्य डागळतं. तिला कायद्याने हक्काचं दान मिळवायला लावण्यापेक्षा, आपुलिकीच्या गोडव्याने सन्मानपूर्वक केलेली बोलणी हे बंध रेशमाचे अतूट असेच का नाही राहणार?स्त्रीची अस्मिता जपण हे निरलस नात्याचं बहीण भावांच्या चेहर्‍यावरील हसू फुलण्यासारखं असणार नाही काय? या देवी सर्वभूतेषू शक्ति-रूपेण संस्थिता!… आपली संस्कृती तर याहून वेगळं काय सांगते?

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈