सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – सुख… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सुख म्हटलं की नकळत प्रशांत दामले समोर आले.. सुख म्हणजे नक्की काय असतं..काय पुण्य असतं की ते घर बसल्या मिळतं..अर्थात सुखाच्या कल्पना प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या असतात.. कोणाला कशात सुख वाटेल हे सांगता येणं कठीण आहे.. करोडोंच्या घरात राहणाऱ्या, गाडी घोड्यातून फिरणाऱ्या,दिमतीला नोकरचाकर असणाऱ्या.. सर्व सोयी सुविधा पायाशी लोळण घेत असणारी व्यक्ती सुखी असेलच असे नाही.. ह्या उलट काही वेळा झोपडी वजा छोट्याश्या घरात राहणारी आणि उद्या काय हा प्रश्न असणारी व्यक्ती सुद्धा आजचा दिवस छान गेला ना मग झालं तर म्हणून नेहमी सुखात असलेली पहायला मिळते.. म्हणूनच तर सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना ह्या भिन्न असतात..आता माझ्या बाबतील म्हणाल तर माझी विशेष अशी जगावेगळी सुखाची काही कल्पना नाहीय.. तरीही.. पहाटेच्या शितल वाऱ्याची झुळूक.. क्षितिजावर पसरलेला लालिमा, मध्येच पक्षांचा ऐकू येणारा किलबिलाट, ह्या सगळ्यांना चार चाँद लावणारा मोगरा, जुई चा सुगंध म्हणजे सुख.. अशावेळी नुकतेच उठून आपण गॅलरीत ह्या निसर्गाचं रूप डोळ्यात साठवतो आहोत आणि आपल्या सख्या ने आपल्या हातात आयता चहा द्यावा आणि मग गप्पांची मैफिल पहाटेच रंगावी हे म्हणजे सुख… बागेत खूप दिवसांनी अचानक उमललेल एखादं गोंडस फुलं अचानक दृष्टीस पडावं हे म्हणजे सुख..स्वयंपाकघरात काम करताना तडतडनारी मोहरी आणि हिंगाचा तो घरभर भरून राहिलेला सुगंध.. आणि घरच्यांनी वा फक्कड झालीय फोडणी म्हणून केलेलं छोटंसं कौतुक म्हणजे सुख.. लेकीने प्रेमाने बनवून दिलेलं साद्या कागदावरच छोटंसं ड्रॉइंग ग्रीटिंग म्हणजे सुख.. मान्सून च्या पहिल्या पावसात चिंब भिजता येणं म्हणजे सुख.. एखादं बीज अंकुरताना त्याला रोज वाढताना पाहणं म्हणजे सुख.. रखरखत्या प्रवासात थंडगार चिंब हिरवी, नजर जाईल तिथ पर्यंत भाताची डोलणारी शेत अचानक दृष्टीस पडावी हे म्हणजे सुख…एखाद्या टपरीवरचा चहा पिताना आपल्या मैत्रिणीची आलेली गोड आठवण म्हणजे सुख..काही वेळा नुसतच बसून जुन्या गोड रम्य आठवणीत रमता येणं म्हणजे सुख..चांदण्या रात्री दूर समुद्र किनारी अनवाणी पायांनी त्या मऊशार वाळूवर सख्याच्या हातात हात घालून नुसत फिरत राहणं म्हणजे सुख.. तुफान कोसळत्या पाऊसधारा हातात चहा चा कप घेऊन खिडकीत बसून पाहत राहणं म्हणजे सुख.. एखादं सुंदर पुस्तक वाचताना स्थळ काळाच भान विसरून जाणं म्हणजे सुख…एखाद्या विशाल धबधब्या कडे पाहत राहण, त्याचे तुषार अंगावर झेलणं म्हणजे सुख… खरं सांगू का मैत्रिणींनो ह्या विषयावर मी इतकं लिहू शकते की एक पुस्तकं होईल.. पण खरचं मानलं तर दगडात ही देव दिसतो नाहीतर काहीच नाही.. तसचं सुखाच आहे.. सुख आपल्या मनात असतं.. कुठल्या गोष्टी, कुठली परिस्थिती त्याच्यात बदल घडवू शकते असं मला तर नाही वाटतं..सुखाची कल्पना प्रत्येकाची भिन्न असली तरी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतातच.. तो भरभरून देत असतो प्रत्येकाला.. अर्थातच ते ओळखता आलं पाहिजे.. सुख हे मानण्यावर आहे.. तसचं सुख हे मान्य करण्यावर ही आहे.. माझ्यासाठी तर मन उल्हसित करणारा प्रत्येक क्षण म्हणजे सुख आहे.. आणि असे सुखद क्षण माझ्या आयुष्यात रोज नव्या रुपात माझ्या आयुष्यात येतात आणि हो मला ते कळतात हे माझं भाग्य आहे…

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments