सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्थळ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आपली आवड,आपला कल हे आपले कुटुंबीय,आपली जवळची माणसं आणि आपल्याला पुरेपुर जाणून असणारी आपली मित्रमंडळी हे अगदी नस पकडल्या सारखं जाणतात. ही सगळी आपली माणसं अगदी मनकवडीच असतात असं म्हंटलं तरी चालेल. त्यामुळेच माझी एक आवड म्हणजे भिन्न भिन्न भाषेतील,निरनिराळ्या कलाकारांनी कामं केलेल्या दर्जेदार शाँर्टफिल्म्स बघणे हे जाणून माझी मैत्रीण मधुर कुळकर्णी हीने मला एका शाँर्टफिल्म चे नाव सुचविले. त्या  मराठी शाँर्टफिल्म चे नाव  “शंभरावं स्थळ”.

त्या नावामधील “स्थळ” हा शब्द आमच्या पिढीपर्यंत तरी अगदी परिचीत आणि नवीन पिढीमध्ये “ठरवून लग्नं” यानेकी “अरेंज्ड मँरेज” करणाऱ्या लग्नाळू उपवर मुलामुलींना थोडाफार फँमिलीअर म्हणजे ओळखीचा.

आमच्या पिढीपर्यंत सरसकट अरेंज्ड मँरेज आणि स्पेशल केस म्हणून तुरळक लव्हमँरेज असा रेशो होता. आता रेशो तोच कायम आहे फक्त बाजूंची अदलाबदल झालीयं. आता लव्हमँरेज सरसकट आणि ठरवून लग्न तुरळक असं बघायला मिळतं, कालाय तस्मै नमः, असो.

आमच्या वेळी होत असलेले ते टिपीकल दाखवण्याचे कार्यक्रम, संपूर्ण माहिती असतांना पण त्याबद्दलच ती अगदी ठराविक प्रकारची प्रश्नोत्तरे हे सगळं बघून, अनुभवून प्रकर्षाने जाणवायचं, खरचं इतक्या जुजबी ओळखीवर दोघही हा भलामोठा संसाराचा डाव मांडतोयं खरा,पण खरचं होतील का हे संसार यशस्वी ? 

मग मनात यायचं खरंच ओळखीतून किंवा परिचयातून, एकमेकांना जाणून घेऊन तसेच आचारविचार ह्यांची देवाणघेवाण करुन मग मात्र नक्कीच  संसार यशस्वी होत असतील. पण ज्यांना अरेंज्ड मँरेज करायचेयं त्यांच्या साठी ह्या “कांदेपोहे”कार्यक्रमाशिवाय पर्यायही नव्हता,वा नाही.

जसाजसा काळ बदलला,पिढी खूप जागरुक, स्वतंत्र विचारांची घडायला लागली,तेव्हा मग ठरवून लग्न करतांना काही जास्तीच्या पाय-या जोडल्या गेल्या. त्यात मग मुलामुलींना एकमेकांशी बोलतांना स्पेस,प्रायव्हसी देणं हे प्रकार सुरू झालेत. हे बघितल्यावर असं वाटलं आता नक्कीच असे विचारविनमयांची चर्चा, देवाणघेवाण झाल्यावर परस्परांना नक्कीच एकमेकांचा पूरेपूर अंदाज येऊन मग हा संसाराचा पाया भक्कम उभा राहून सगळीकडे “आनंदी आनंद घडे” हे वातावरण राहील. पण हा अंदाज ही सपशेल चुकला असे काहीसे अनुभव आलेत कारण कितीही स्पेस, प्रायव्हसी मिळाल्यानंतरही चर्चा, विचारविनिमय ह्यांत फक्त स्वतःकडील व्हाईट साईड वा उजवी बाजू ही फक्त प्रत्यक्षात समोरच्याला दाखविली जाते. नंतर प्रत्यक्ष संसार सुरू झाल्यावर मात्र ह्या दोघांमधील डार्क साईड सामोरी येते,जी त्यांना आता नव्याने कळते. आणि मग संसार हा बहरु लागण्याऐवजी ईगोपाँईंटजवळ येऊन हळूहळू कोमेजायला लागतो.

शेवटी मग एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली लग्न हे ठरवून करा की लव्हमँरेज ,हे यशस्वी करण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे तडजोड. कदाचित तडजोडीचे दुसरे नावं संसार असं म्हंटले तरी चालेल. आता फक्त ही जुजबी तडजोड करतांना फक्त दोघांनीही मनात आणायचं, हे आपणं आपल्या जीवाभावाच्या, प्रेमाच्या माणसासाठी करतोय, बस मग पुढे सगळं सुरळीत होतंच. फक्त ह्या तडजोडी जुजबी बाबतीत हव्यात, कारण एकदम पराकोटीच्या तडजोडी दोघांपैकी कुणी करु शकत नाही, आणि खरतरं स्वत्व गमावून तडजोड करुन जगण्यात मजाही नसते.

आता पुढे ह्या शाँर्टफिल्म विषयी पण नक्की लिहेनच. पण नुसतं शाँर्टफिल्म चे नाव वाचले आणि हे विचार भराभर डोक्यातून, मनातून उतरले आणि शब्द बनून बसले.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments