सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

?विविधा ?

☆ ‘दोन पिढ्यांमधील समन्वय…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

नवीन आणि जुन्या पिढीत वैचारिक मतभेद असणे हे अत्यंत स्वाभाविक आहे, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियमआहे.  काळानुसार जीवनशैली बदलत असते. शिक्षण, विज्ञान, जागतिकीकरण यातून नवीन विचार प्रवाह अस्तित्वात येत असतात. नवीन पिढी हे नवे विचार लवकर आत्मसात करते. तर जुन्या पिढीला हे स्वीकारायला वेळ लागतो. यातून संघर्ष निर्माण होतो आणि अनेकदा तो विकोपाला जाऊन एकमेकांबद्दल कटुता निर्माण होते, दुरावा निर्माण होतो.  याचा परिणाम कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होतो. आज कुटुंबात हा वाद आई-वडील आणि मुलं यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.  त्यामानाने काही अपवाद वगळता, आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्या संघर्षाची तीव्रता कमी आहे.

पूर्वी एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठी कुटुंबातील सदस्य अथवा समाजातील ज्येष्ठ व्यक्तींशी प्रत्यक्ष चर्चा केली जात असे. त्यामुळे वैचारिक देवाणघेवाण करताना एकमेकांशी आपुलकीचे संबंध निर्माण होत.  पण आता गुगलवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या भांडारामुळे हा संवाद हरवत चालला आहे. पाठीवरच्या हातातून मिळणारं पाठबळ व स्पर्शातून व्यक्त होणारं प्रेम, हे दृक्श्राव्य माध्यमातून होणाऱ्या शाब्दिक चर्चेतून कसं मिळणार?कोविडच्या काळात तर अगदी शिशु वर्गातील मुलांना मोबाईल हातात घेऊन शिक्षण घेणं क्रमप्राप्त झालं. आई-वडील लॅपटॉपवर ऑफिसच्या कामात गर्क आणि मुलं अभ्यास आणि नंतर मोबाईलवर गेममध्ये दंग!

पूर्वी एखादा नवीन पदार्थ करायचा असेल तर नवविवाहिता, शेजारच्या एखाद्या काकू, मावशीचा सल्ला घेत असे, माहिती घेत असे.  कालांतराने पाककृतींची पुस्तकं उपलब्ध झाली. आणि आता तर मोबाईलमुळे *कर लो दुनिया मुठ्ठी में *, त्यामुळे देशी-विदेशी कोणत्याही पाककृती काही सेकंदात तुमच्या समोर असतात आणि त्याही दृक्श्राव्य स्वरूपात! केवळ पाककृतीच नव्हे तर कोणत्याही विषयासंबंधी माहिती, मोबाईलवर क्षणात सापडते. या आभासी जगात रमताना कौटुंबिक आणि सामाजिक संवाद हरवत चालला आहे.

जागतिकीकरणामुळे कामाच्या वेळेचा आपल्या स्थानिक वेळेशी मेळ नाही. त्याचाही विपरीत परिणाम शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होत आहे.

आपल्या मुलांनी दिवसभरात चार शब्द आपल्याशी बोलावे, ही घरातील वडील मंडळींची साधीशी अपेक्षा.  पण कामाच्या या विचित्र वेळेमुळे कुटुंबातील ज्येष्ठांची साधी विचारपूस करायलाही तरूण पिढीला वेळ नाही.  मग इतर अपेक्षांची काय कथा!त्यामुळे त्यांच्या परस्पर संबंधात काहीसा दुरावा निर्माण होतो आहे.  लग्न, मुंजीसारखे समारंभ किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात भाग घेणं देखील, त्यांना त्यांच्या कामाच्या वेळेनुसार, अनेकदा शक्य होत नाही. मग नातेवाईक आणि समाजातील अन्य व्यक्तींशी संबंध जुळणार तरी कसे? आपण सुखदुःखाच्या प्रसंगात कोणाकडे गेलो नाही, तर आपल्याकडे तरी कोण येणार? याचा परिणाम नवीन पिढीला एकाकीपणा बहाल करत आहे. वैफल्यग्रस्त बनवत आहे.  त्यांच्या स्वभावातील चिडचिडेपणा वाढवत आहे.

यामुळेही कौटुंबिक कलह निर्माण होऊन, भावनिक दुरावा निर्माण होत आहे.

मग या दोन पिढ्यांत समन्वय साधणार तरी कसा?कारण प्रत्येक पिढीला स्वतःचंच वागणं बरोबर वाटत असतं. त्यांची जीवनशैली व सामाजिक मूल्ये वेगवेगळी असतात. परस्पर संवाद, चर्चा आणि सामंजस्य याद्वारे हा दुरावा, अंतर नक्कीच कमी करता येईल.

जुन्या पिढीतील लोकांनी नवपिढीला परंपरागत, सामाजिक व धार्मिक विचारांचे महत्त्व पटवून द्यावे, परंतु नवपिढीवर ती बंधन म्हणून लादू नये. सातच्या आत घरात, ही पूर्वीची परंपरा. आज शिक्षण, नोकरी, व्यवसाय इ. च्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नवीन पिढीला, हे कसं शक्य होईल?घरी परतायला रात्रीचे ९-१०वाजत असतील तर झोपायला १२ वाजणार, मग पहाटे लवकर उठणं कसं जमणार? आता वटपौर्णिमेला वडाची साग्रसंगीत पूजा आणि उपास केवळ परंपरा म्हणून केला पाहिजे, हे नवीन पिढी ऐकणार नाही. पण वटवृक्षाचं संगोपन, निसर्गाचा समतोल आणि आरोग्य या गोष्टींसाठी ते करावं, हे समजावून सांगितल्यावर आजच्या पिढीतील तरूण आणि तरूणी, दोघंही वृक्षारोपणाचा वसा उचलायला स्वतःहून पुढाकार घेत आहेत.  रोज देवपूजा करणं हा जुन्या पिढीच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग. पण नवीन पिढीला कदाचित तो वेळेचा अपव्यय वाटू शकतो किंवा त्यांच्या कामाच्या घाईगडबडीत त्यांना ते जमवता येत नसेल.  नवपिढी जर प्रामाणिकपणे त्यांचं काम करत असेल, त्यांना जमेल तसं सामाजिक उन्नतीसाठी शारीरिक, आर्थिक, बौद्धिक मदत करत असेल तर, जुन्या पिढीने हे समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान, योगाभ्यासाची आवश्यकता संयतपणे तरूण पिढीला समजावून सांगितली पाहिजे.

आजच्या शिक्षणपद्धतीत जीवनमूल्यांचा अभाव जाणवतो. जीवघेण्या स्पर्धेच्या या युगात झापड लावल्यासारखी अवस्था आहे नवीन पिढीची! जुन्या पिढीतील लोकांनी नवपिढीला जुन्या जीवनमूल्यांचे महत्त्व आणि आजच्या परिस्थितीत त्यांची उपयुक्तता समजावून सांगणे आवश्यक आहे. कारण काळ कितीही बदलला तरी नेहमी खरे बोलणे, प्रामाणिकपणे वागणे, वडीलधाऱ्यांचा आदर आणि सेवा करणे ही शाश्वत मूल्ये कधीच कालबाह्य होत नसतात.

नव्यापिढीचे स्वैर वागणे, मुला-मुलींचे एकत्र फिरणे, रात्री उशिरा घरी परतणे, त्यांची कपड्यांची फॅशन, जुन्या पिढीला आवडत नाही.  जुनी पिढी, पालक अनेकदा या मुलांच्या आवश्यक गरजा पूर्ण करत नाही.  यातून मग वाद निर्माण होतो.  आपल्या वागण्याचं, गरजांचं योग्य समर्थन नवीन पिढीला करता आलं पाहिजे आणि आपल्या विरोधामागची भूमिका, जुन्या पिढीलाही नीट समजावून सांगता आली पाहिजे. अर्थात हे करताना दोन्ही बाजूंनी संयम राखणं खूप आवश्यक आहे. अन्यथा केस कापायला आई-वडिलांनी परवानगी दिली नाही म्हणून मुलीची आत्महत्या, मित्रांबरोबर पार्टी करायला पैसे दिले नाही, म्हणून वडिलांच्या खूनाचा प्रयत्न, मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून वडील आणि भावांनी तिला जीवे मारले, यांसारख्या घटना समाजात घडताना दिसतात.

नवीन पिढीला तंत्रज्ञानाची माहिती आपल्यापेक्षा जास्त आहे, हे वडीलधाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. घरबसल्या मोबाईलच्या मदतीने ते अनेक कामं, अगदी चुटकीसरशी पार पाडतात. मग ते लाईट बील भरणं, औषधं मागवणं, एखाद्या कार्यक्रमाची/प्रवासाची तिकिटे आरक्षित करणं असं काहीही असेल. पण यामुळे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ यांची छान बचत होते. या पिढीच्या उधळपट्टीवर, अवास्तव खर्चावर टीका करणाऱ्या मंडळींनी हेही लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्या शहरात अथवा परदेशात राहणारी अनेक मुलंही वेबकॅम सारख्या उपकरणांचा उपयोग करून आपल्या पालकांची काळजी घेताना दिसतात. त्यांच्या दैनंदिन गरजा आॅनलाईन व्यवहाराद्वारे पूर्ण करताना दिसतात.

 ‘आमच्या वेळी नव्हतं हो असं ‘, हे म्हणणारी पिढी कधीच मागे पडली आहे.  आत्ताचे पन्नाशीच्या आसपासचे आई-वडील अथवा सासू-सासरे बघितले, तर ते नवीन पिढीशी बरंच जुळवून घेताना दिसतात.  मुलांची कामाची वेळ, घरून काम, त्यांचं स्वातंत्र्य यांचा विचार करून, त्यांचं वेगळं राहाणं ते समजून घेतात. शक्य असेल तिथे पालक मुलांच्या लग्नाआधीच त्यांची वेगळं राहण्यासाठी सोयही करून ठेवतात. हे परिवार वेगळ्या घरात राहात असले तरी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात आणि परस्परांना शक्य तेवढी मदतही करतात. आपल्या आचरणातून होणारे संस्कार पुढील पिढीत आपोआप झिरपत असतात. म्हणूनच परदेशात राहणारी अनेक मुलंही आपल्या परंपरा, मातृभाषा आवर्जून जपताना दिसतात.  कदाचित ते जपण्याची त्यांची पद्धत काळानुरूप थोडी वेगळी असेल.  पण हे चित्र नक्कीच आशादायक आहे.

  प्रत्येकाने आनंदात राहावे असे वाटत असेल, तर दोन्ही पिढ्यांनीआपल्या भूमिकेची अदलाबदल करून पाहावी. म्हणजे एकमेकांना समजून घेणं सोपं होईल. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून एकमेकांबद्दल प्रेम, आदर, काळजी व्यक्त झाली पाहिजे. मानवी संवेदनशीलता हरवता कामा नये. दोन्ही पिढीतील सदस्यांनी वैचारिक भिन्नतेचा आदर राखला पाहिजे.

 सामाजिक संबंध सलोख्याचे ठेवण्यासाठीही एकमेकांस समजून घेणे आवश्यक आहे.

एकमेकांच्या भावना, विचारसरणी, सामाजिक मूल्ये समजून जीवन जगले पाहिजे. तेव्हाच दोन्ही पिढ्यांमध्ये समन्वय साधला जाईल.  शिक्षण, चौफेर वाचन, सामाजिक माध्यमांचा योग्य वापर यातून कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर नक्कीच अनुकूल परिणाम दिसून येईल.  आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे अधिक संवेदनशीलतेने आणि सजगपणे बघण्याचा दृष्टीकोन जाणीवपूर्वक जोपासण्याचा प्रयत्न दोन्ही पिढ्या करत आहेत, ही समाधानाची बाब आहे.  शालेय शिक्षणात मूल्य शिक्षण आणि पर्यावरण विषयक जागरूकता यांचा समावेश हे त्यातील एक महत्वाचं पाऊल!याशिवाय अनेक सेवाभावी संस्था आणि गट वृक्षारोपण, रक्तदान, प्लास्टिक हटाव, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याचं वाटप, जुनं प्लास्टिक व मोबाईल सारखा ई-कचरा गोळा करून पुनर्वापरासाठी पाठवणे, असे उपक्रम राबवत आहेत.  या उपक्रमांमध्ये लहान-थोर सगळ्यांना सामील करून घेतलं जातं.  त्यामुळे दोन्ही – तिन्ही पिढ्यांमध्ये प्रत्यक्ष संपर्क, संवाद आणि आपुलकीचं नातं निर्माण होण्यास, खूप छान मदत होत आहे.  

 © सुश्री प्रणिता खंडकर

दि. १८/०७/२०२३

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments