प्रा. भरत खैरकर
🌸 विविधा 🌸
☆ नदीचा काठ… ☆ प्रा. भरत खैरकर ☆
नदीचा काठ आता पहिल्यासारखा स्वच्छ राहिला नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या काठाला आता उसंत नसते. लोक म्हणतात, उन्हाळ्यात नद्या आटतात. मात्र गावची नदी बारमाही सारखीच धो.. धो.. वाहणारी दोन्ही – हातांनी एखाद्या दात्याने भरभरून दान द्यावे. तसं या नदीने आमच्यां गावाला खूप दिलंय. विहिरी आटल्या तरी नदीची धार मात्र खंडत नाही.. शंकराच्या जटेतून निघालेल्या गंगामाईसारखी!! या नदीची काही कहाणी असेलसं वाटत नाही.
दहा बाय दहाच्या खोलीत आपला संसार छानसा थाटावा, तसा या नदीचा उगम अगदी छोट्या जागेत सामावलेला.. गावापासून चंद्रपूर जिल्ह्यातील खुर्सापार या जंगलातून.. एका डोंगरवजा भागात.. तिची उत्पत्ती झाल्याचे आढळुन येते. एक भला मोठा झरा उंचावरून धबधब्यासारखा अव्याहत खाली वाहतो.. चांदण्यात ही दुधाची धार जणू आकाश धरतीच्या पदरात प्रेमाने टाकतोय.. असं वाटते.
आजूबाजूला उंचच उंच सागवनी वृक्ष.. निसर्गाचं हे रूप पाहात कित्येक सालापासून उभे आहेत. त्या परिसरातील सागाच्या झाडांची वाढ कमालीची झाली आहे. जंगलात सर्वत्र फिरून झाल्यावर निसर्ग याच ठिकाणी इतका ‘खुश’ कसा हे शोधलं तर मुळाशी तो उगम दिसेल..
साधारण पन्नासेक फुटावरून खालच्या दगडांवर पडणारी ती जाडशी पाण्याची धार हळूहळू घाटदार वळण घेत संथ होते, छोटसं नितळ पाण्याचं तळं.. ते वलयांमुळे अजूनच उठून दिसतं.. मनात भावनांचे हळूवार तरंग उठावे तसे ह्या पाण्याचे तरंग धारेच्या केंद्रापासून दूरवर काठापर्यंत जाऊन हळूहळू संथ रूप धारण करतात.. मग हे पाणी कड्याकपारीतून मार्ग काढीत. एका नाल्याचं रूप धारण करतं, माणसाचं आयुष्य जसं कधी दुःख तर कधी सुखाच्या अनुभवांनी पुढे पुढे सरकते.. अगदी तस्सच.
या छोट्याशा नाल्याचं, हळूहळू जंगलातून ‘आलेले इतर छोटे छोटे नाले स्वागत करीत त्या नाल्यास येऊन मिळतात, ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे या निसर्ग घटकांना कोणी शिकविले कुणास ठाऊक?
आता ही नदी जंगलातील चार-पाच खेड्यांतून आमच्या गावात येते.. ती सरळ गावाच्या मधोमध घुसते..
नदीच्या या घुसखोरीमुळे उगाच एका मोठ्याशा गावाचे दोन भाग झाले. पूर्वेकडचा ‘सिर्सी’ नि पश्चिमेकडचा ‘काजळी’असं नामकरण झाल.
आता मात्र सिर्सी हेच नाव प्रचलित आहे. तरीही जुन्या माणसांनी ‘कुठं रायतं बाबू?’ म्हटलं का नवीन पोर ‘सिर्सीले रायतो जी !’ उत्तर देतात आणि मग तो माणूस जेव्हा ‘सिर्सी (काजळीच) ना?’ म्हणतो तेव्हा ही पोरं नंद्यांसारखे ‘होजी’ म्हणून होकार भरतात.
नदीमुळे एक बरं झाले.. इतर गावासारखी आमच्या गावाला अजिबात पाण्याची फिकीर करावी लागत नाही. आमच्या लहानपणी आम्ही आईसोबत धुणं धुवायला नदीवर जात होतो.. धुणं धुवायला म्हणजे काय तर तिथं जाऊन काठावरच्या मऊ मऊ रेतीत खेळायला.. पाण्यात पाय ओले करायचे अन् मग आपणच उकीरड्यावर लोळणा-या गाढवासारखं रेतीत लोळायचं.. त्याच्याने ओल्या झालेल्या पायावर रेतीचे मोजे तयार व्हायचे.. जसजशी ऊन तापायची तसतसे त्यातील ओलावा संपल्याने ते मोजे गळून पडायचे! या मोज्याचं आम्हांला तेव्हा भारी अप्रुप वाटायचं.
पायात मोजे घालूनच आमच्या इमारती उभ्या करायचा व्यवसाय चालायचा.. मात्र या इमारती नुसत्या वाळूच्या आणि पाण्याच्या ! हीच त्याची खरी खासियत होती. नानाविध तऱ्हेच्या त्या इमारतीचे ‘स्ल्याब’ मात्र वर्तुळाकारच राहायचे. काही काही इमारतींना कुंपण म्हणून बोटबोटभर.. काड्या सभोवताल लावल्या जायच्या.. त्या रक्षणाचं काम करायच्या… कधीकधी असलाच तर रस्त्यावर सापडलेला सुताचा गुंता येथे तार म्हणून वापरला जायचा.. काहींची घरे एवढी महागडी असायची की त्यांच्या घरात विजेची सोय असायची आणि हे दिवे बाभळीच्या पांढऱ्या काट्यांवर खुपसलेल्या बकरीच्या लेंड्या असायच्या ! काहींच्या घरासमोर किमती मोटारगाड्या.. तुटलेल्या विटांच्या रूपात उभ्या राहायच्या.. रेतीत कोरलेला रस्ता जणू डोंगर पोखरून तयार केल्यासारखा वाटायचा. या सर्व गाड्यांचे डायव्हर मात्र रिमोट कंट्रोलसारखे आपआपल्या जागी बसून फक्त हाताने. गाडी ढकलायचे. बिना ड्रायव्हरचा तो अनोखा प्रवास असायचा.
ज्या कुणाला या चैनीच्या गाडीघोड्यांच्या ‘ लाईफ’ मधे रस नसायचा ते वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करायचे.. नदीकाठाने वाढलेला तरोटा आणि अजून अशाच काही बाही पालेभाजी सदृश वनस्पती उपटून ते ‘मंडई’ मांडत होते.. मग खरेदी करणारे सिगारेटच्या पाकिटच्या, माचीसच्या कव्हरच्या अवमूल्यन न झालेल्या नोटांनी घरच्यासाठी भाजीपाला खरेदी करायचे, काहींचे वावरंही त्या रेतीतच होते. मुख्य म्हणजे रेती चोपडी करून त्यात चौकोनी चौकोनी वाफे करणे खूपच सोपे..
शिवाय उपडलेला काठावरचा तरोटा त्या चौकोनाच्या चौरस्त्यावर एकामागून एक रांगेत लावला की, पाच मिनिटात हिरवंगार शेत दृष्टीस पडे !
असे एक ना अनेक खेळ या नदीकाठावर आम्ही खेळायचो! पडलो, धावलो, मारामाऱ्या सारंसारे येथे केलं. पण मऊशार रेतीवर थोडासाही धक्का कधी लागला नाही. आईने आपल्या पोराला कुशीत घेऊन थोपटावं.. तसंच या काठाने आमचं बालपण जोजावले..
नदीचा काठ आठवला की बालपण ‘फ्कॅशबॅक’ सारखं काठावर जाऊन थांबतं..
नदी, नदीचा उगम, छोटसे तळे, त्यातील तरंग, तिचा गावांपर्यंतचा प्रवास, तिचं गावात प्रवेश करणं.. आम्हां चिमुकल्यांचे तिच्या काठावरचे संसार.. सारं सार
एका पहाटधुक्यासारखे विरळ होत जाऊन गत स्मृतींनी गळा भरून येतो. तेव्हा डोळ्यातील पाणी त्या नदीत जाऊन मिसळत नसेलच कशावरून ??
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈