श्री जगदीश काबरे
☆ “वाद, वितंड आणि चर्चा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
जगातील कोणत्याही दोन व्यक्ती या कधीच पूर्णपणे एकमताच्या असू शकत नाहीत–अगदी नवराबायकोही कितीही एकमेकांच्या जवळ असले तरीसुद्धा त्यांच्यात मतभिन्नता असतेच. मतभिन्नता असणे हे खरे तर जिवंत मनाचे लक्षण आहे. त्यामुळे दोन विचारी माणसे एकमेकात वादसंवाद करू शकतात; तर दोन अविचारी माणसे मात्र फक्त वितंडवाद घालू शकतात. पण विचारी माणसाचा अहं जेव्हा त्याच्या बुद्धीप्रामण्यावर हवी होतो तेव्हा मात्र समोरच्या माणसाने त्याची एखादी क्षुल्लक चूक दाखवली तरी त्याचा अहं दुखावतो आणि मग तो चूक कबूल करण्याच्या ऐवजी त्या चुकीचे समर्थन करायचा प्रयत्न करताना बेताल होत जातो. ‘समोरचा माणूस आपल्या चुका काढतो म्हणजे काय!’, असा अहंकार त्याला बेताल होण्यास भाग पाडतो. खरे तर असे लहानसहान वाद तात्पुरत्या स्वरूपातील असायला हवेत. हे वाद कानाआड करून पुन्हा नव्याने एकमेकांशी नितळ मनाने आपण संवाद साधायला हवा. पण आपल्या मनात मात्र त्या माणसाविषयी आकस ठेवणारा दृष्टिकोन निर्माण होतो आणि भविष्यात त्याच्याशी वागताना याच चष्म्याने त्याच्याकडे बघत आपण बोलत राहतो.
म्हणून मला असे वाटते की, निदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी तरी अहंकाराला आपल्या बुद्धीप्रामण्यावर विजय मिळवून देऊ नये. जसे नवराबायकोमध्ये लहानसहान वाद होतात म्हणून ते लगेच घटस्फोटावर जात नाहीत, तसेच चळवळीच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आपसातील लहानसहान वादांमुळे एकमेकांना शत्रू न मानता आणि मनभेद न करता मतभेद खुल्या मनाने स्वीकारले पाहिजेत. म्हणूनच म्हटले आहे की, ‘वादे वादे जाय ते तत्त्वबोध:’ पण हे केव्हा शक्य होईल, तर वादांकडे आपण मन प्रगल्भ करणारी चर्चा म्हणून पाहू तेव्हाच. पण वादाकडे जर आपण आपला अपमान करणारे शब्द समजायला लागू तर मात्र वाद हे चर्चा न ठरता हारजीतीच्या खेळावर उतरतात आणि त्यांचे वितंडात रूपांतर होते. ज्या वेळेला माणसाला प्रश्न पडत नाहीत, शंका निर्माण होत नाहीत आणि फक्त आदेश पाळणे, आज्ञाधारकपणा हा गुण समजला जातो त्या वेळेला मात्र कुठलाही वाद होण्याची शक्यता नसते. कारण अशी माणसे फक्त यंत्रमानवासारखी असंवेदनाशील सांगकामे असतात. पण विचारी माणसे संवेदनाशील असल्यामुळे सतत प्रश्न विचारत राहतात, शंका उपस्थित करतात म्हणून त्यांच्यात सतत वादविवाद होत असतात. हे वादविवाद माणसाला नवीन काही शिकण्यास आणि प्रगत होण्यास मदत करणारे असायला हवेत, असे वाटत असेल तर अहंकाराला आपल्या काबूत ठेवायला हवे. अन्यथा आज्ञाधारक मेंढरू आणि आपण यात फरक तो काय?
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈