श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “जागा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
जागा हि प्रत्येक गोष्टींची आणि आपलीच असते. शब्द एक आणि रुप अनेक.
राहण्याची असते. राबण्याची असते.
प्रवासात बसण्याची असते.
बाहेर गेल्यावर दुचाकी किंवा चारचाकी लावायची असते.
राजकारणात तर असतेच असते. पण. . . . कार्यक्रमात सुध्दा असते.
जागा. . . . . . .
सर्वसामान्य लोकांसाठी यात जिव्हाळा आहे.
मित्र, नातेवाईक यांच्यासाठी आपुलकी आहे. तर. . . . . .
राजकारणात प्रतिष्ठा आहे.
राजकारणात मिळाली तर टिकवायची, आणि नाही मिळाली तर बळकवायची असा दोनसुत्री कार्यक्रम असतो. मग ती जागा मोक्याची किंवा धोक्याची कोणतीही असो.
राजकारणात जागेसाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर सहज होतो. तर नात्यांमध्ये यांचा विचार गौण असतो. किंबहुना नसतोच.
जागा घेण्यासाठी संघर्ष असतो. तर जागा सोडण्यासाठी तडजोड असते.
व्यक्तीचे वय, वागणं, विचार, आणि ज्ञान यानुसार तो जागा मिळवत असतो.
काही वेळा जागेमुळे माणसाला किंमत असते. तर काही वेळा माणसाला आपली जागा कोणती?. . . . याची किंमतच नसते.
आदराने आणि सन्मानाने बोलवून दिली जाते ती जागा. तर अपमान करुन दाखवली जाते ती सुद्धा जागाच.
गाण्यात असते, नाटकात असते. या जागा बरोबर घेतल्या तर दाद सुद्धा मिळते.
जागा, प्रेक्षणीय असते, पवित्र असते, शांत असते, आणि भयावह सुध्दा असते.
सुपीक असते, नापीक, आणि पडीक सुध्दा असते.
लहानपणी लपंडाव खेळताना आपण सापडूनये म्हणून, आणि आता बऱ्याच ठिकाणी अपराध केल्यावर पोलीसांनी पकडूनये म्हणून शोधली जाते ती जागा.
काही सुरक्षित असतात. तर काही आरक्षित. काही अतिक्रमण केलेल्या असतात, तर काही पुनर्वसन करण्यासाठी देऊ असं आश्वासन असतं. पण असतात जागा.
इतकच काय. . . . मेल्यानंतर सुध्दा नेतात ती सुध्दा एक ठराविक जागाच असते.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈